इंग्लंडच्या दौऱ्यावरचा लॉर्ड्सवर मिळवलेला ऐतिहासिक विजय आणि त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणारी भारतीय फलंदाजी हे चित्र मग उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळाले. मुळात ट्वेण्टी-२०च्या मुशीत वाढलेल्या या संघाकडून कसोटी खेळण्याची अपेक्षा करणे म्हणजे चुकीचे आहे. कसोटी मालिकेत भारताच्या पदरी अपयश पडलेच होते. पण फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी या राखेतून झेप घेतली. अपयशातून यशाकडे वाटचाल करण्यासाठी फक्त गुणवत्ता असून चालत नाही, तर त्याबरोबर जिद्दही लागते. ही जिद्द भारतीय संघात रवी शास्त्री आणि त्यांच्या साहाय्यक प्रशिक्षकांनी भरली आणि निकाल सर्वासमोर आहे. भारताने एकदिवसीय मालिका बेमालूमपणे खिशात टाकली. पण तरीही सारे काही आलबेल आहे, हे समजणे घोडचूक ठरेल. अजूनही बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणेला वाव आहे आणि या मालिका विजयाने विश्वचषकाचा अंदाज घेणेही कठीणच.
स्पर्धा फक्त गुणवत्तेच्या जोरावर नाही, तर मानसिकतेच्या जोरावर जिंकली जाते. दुसऱ्या सामन्यात सुरेश रैनाचे शतक हे संघाचे मनोबल उंचावणारे आणि मालिका विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करणारे ठरले. रैनाचे शतक हे भारतीय संघामध्ये चैतन्य फुलवणारे, संजीवनी देणारे होते. त्याची शतकी खेळी लाजवाबच होती. तिथून खऱ्या अर्थाने फासे पालटले. भारताने हा सामना जिंकला. या विजयाने भारताचे मनोबल वाढले असले तरी पराभवानंतरच्या जिव्हारी टीकेने इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक निराश झाला. त्याच्यासह इंग्लंडचा संघही निराशेच्या गर्तेत अडकला. दुसऱ्या सामन्यात ८२ धावांच्या सलामीनंतर इंग्लंडचा संघ २२७ धावाच करू शकला. युवा गुणवान फलंदाज अंबाती रायुडूने अर्धशतक झळकावले आणि भारताने सहजपणे हे आव्हान पेलले. चौथ्या सामन्यात तर अजिंक्य रहाणेची शतकी खेळी ही डोळ्यांचे पारणे फेडणारी होती, बऱ्याच दिवसांनी क्रिकेट विश्वात एक दमदार खेळी पाहिल्याचा आनंद चाहत्यांना मिळाला. याच सामन्यात धावांच्या दुष्काळात अडकलेला शिखर धवन धावांच्या पावसात न्हाऊन निघाला. चौथा सामना जिंकत भारताने मालिका खिशात टाकली आणि त्यामुळेच अखेरच्या सामन्याला तसा अर्थ नव्हताच. औपचारिक सामन्यात इंग्लंडने बाजी मारत उरली-सुरली प्रतिष्ठा जपली. भारताला या सामन्यात प्रयोग करण्याची मुभा होती, पण त्यांनी ते टाळले.
या मालिकेत भारताच्या काही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामध्ये रहाणे, रैना, रायुडू यांची नावे घेता येतील, पण अन्य फलंदाजांना आपली गुणवत्ता दाखवता आली नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये भारताचा सर्वोत्तम फलंदाज असे बिरूद मिरवणाऱ्या विराट कोहलीला दौऱ्यात अर्धशतकाची वेस एकदाही ओलांडता आली नाही. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर मोठय़ा अपेक्षेने लोक त्याच्याकडे पाहात होते. भारताचा भावी कर्णधार म्हणून त्याचे नाव नेहमी चर्चेत असायचे, पण त्याने अपेक्षाभंगच केला. ‘बॅड पॅच’ प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत येतो, हे मान्य केले तरी यामधून बाहेर पडण्याचे प्रयत्न त्याच्याकडून झाले नाहीत. फलंदाजीतली गंभीरता त्याच्याकडून दिसली नाही. अशीच काहीशी बाब धवनचीही. चौथ्या एकदिवसीय सामन्यातील ९७ धावांची खेळी सोडल्यास त्यालाही फारसे काही करता आले नाही. रवींद्र जडेजाला फलंदाजीच्या अपेक्षांची पूर्ती करता आलेली नाही. पाचव्या औपचारिक सामन्यात त्याने चुणूक दाखवली, पण अन्य सामन्यांमध्ये कामगिरीचा दर्जा तकलादूच होता. महेंद्रसिंग धोनीला चार सामन्यांमध्ये फक्त ८१ धावाच करता आल्या. ‘सामना जिंकून देणारा’ म्हणून त्याची असलेली ओळख या मालिकेत दिसली नाही. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांना छाप पाडता आली नाही. शमीने अखेरच्या षटकांमध्येही भेदक मारा करत इंग्लंडच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम केले, पण भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, उमेश यादव यांच्याकडून मात्र स्वैर मारा पाहायला मिळाला. आर. अश्विन व रवींद्र जडेजा यांनी अचूक फिरकी मारा करत प्रत्येकी सात बळी मिळवले.
या दौऱ्याच्या बळावर भारतीय संघ विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे म्हटले जात असले तरी त्यामध्ये तथ्य नाही. काही महिन्यांपूर्वीचा न्यूझीलंडच्या दौऱ्यात भारताचे पानिपतच झाले होते. चेंडू वळत नसल्याने अश्विन आणि जडेजा यांचे फिरकी अस्त्र बोथट झालेले पाहायला मिळाले. तीन सामन्यांमध्ये धोनीने सामना फिरवण्याचा प्रयत्न केला, पण एकदाही त्याला यश आले नाही. त्यामुळे भारताची न्यूझीलंड दौऱ्यात नाचक्की झाली होती. इंग्लंडचा एकदिवसीय संघ काही तगडा नव्हता. मुळात त्याच्या फलंदाजीला कणाच नव्हता. कुक, इयान बेल, इऑन मॉर्गन, मोइन अली यांच्यावर संघाची भिस्त होती. पण एकालाही कामगिरीत सातत्य दाखवता आले नाही. गोलंदाजीमध्ये जेम्स अँडरसनला जास्त यश मिळाले नाही. अन्य गोलंदाजही सुमार दर्जाचेच होते. त्यामुळे या इंग्लंडच्या संघाविरुद्ध मालिका जिंकल्याने मिरवण्यासारखे काहीही नाही. विश्वचषकापूर्वीचा ऑस्ट्रेलियाचा दौरा खऱ्या अर्थाने भारताची परीक्षा पाहणारा असेल. कारण फिरकी गोलंदाजीवर पोसलेल्या भारतीय संघाच्या फिरकीपटूंना जर मदत मिळाली नाही, तर भारताची पुन्हा ससेहोलपट सुरू होऊ शकते. शास्त्री यांनी संघामध्ये जो ‘खडूस’ आत्मविश्वास दिला, तो मोलाचा ठरला. त्यांच्या पावलांनी भारताला यशाचा मार्ग सापडल्याने आता विश्वचषकापर्यंत त्यांची नियुक्ती करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे, मग डंकन फ्लेचर यांचे नेमके काय होणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. कारण संघाबरोबर फिरणारा बाहुला, अशी त्यांची काहीशी ओळख निर्माण झाली आहे. ही मालिका जिंकल्यावर आपण काही विश्वचषकाचे प्रबळ दावेदार वगैरे नक्कीच होत नाही. पण प्रबळ दावेदार होण्याची क्षमता भारतीय संघात आहे, फक्त त्यासाठी जास्तीचा अभ्यास आणि मेहनत करण्याची तयारी त्यांनी ठेवायला हवी.