आयसीसी महिला विश्वचषकात इंग्लंडने भारतावर ९ धावांनी मात करत विश्वचषक आपल्या खिशात घातला. भारताने मात्र आपल्या हातातला सामना गमावल्यामुळे पुन्हा एकदा भारतीय चाहते नाराज झाले होते. मात्र मिताली राज आणि तिच्या संघाने केलेला खेळ हा नक्कीच वाखणण्याजोगा होता. बलाढ्य संघांवर मात करत अंतिम फेरीत मिळवलेला प्रवेश हा मिताली राजच्या यशस्वी कर्णधारपदाची एक पावतीच म्हणायला हवी. कर्णधार मिताली राजच्या विश्वचषकातल्या खेळीचा आयसीसीने तिच्यावर एक खास जबाबदारी सोपवत सत्कार करायचं ठरवंलय. आयसीसी महिला विश्वचषकाच्या संघाची जबाबदारी मिताली राजवर सोपवण्यात आली आहे. संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या संघातील निवडक खेळाडूंची आयसीसीच्या संघात निवड होत असते.

मिताली राजने या संपूर्ण स्पर्धेत ४०९ धावा केल्या. यात न्यूझीलंडविरुद्ध महत्वाच्या सामन्यात केलेली शतकी खेळी, साखळी सामन्यात इंग्लंडविरुद्ध केलेलं अर्धशतक अशा धडाकेबाज खेळींचा समावेश आहे. मिताली राज व्यतिरीक्त हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा या भारतीय खेळाडूंचाही आयसीसीच्या या संघात समावेश करण्यात आला आहे.

याव्यतिरीक्त मालिकावीराचा किताब पटकावणारी इंग्लंडची टॅमसिन बेमाँट, अंतिम सामन्यात ६ बळी घेण्याचा भीमपराक्रम करणारी अॅना शर्बसोल, यष्टीरक्षक सारा टेलर, फिरकीपटू अॅलेक्स हार्टली या चार इंग्लिश महिला क्रिकेटपटूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरीक्त दक्षिण आफ्रिकेच्या ३ आणि ऑस्ट्रेलियाच्या एका महिला क्रिकेटपटूला या संघात जागा मिळाली आहे.

आयसीसीच्या महिला विश्वचषकाचा संघ आणि त्यांच्या कामगिरीवर एक नजर –

टॅमसिन बेमाँट – इंग्लंड –  ४१० धावा

लॉरा वोल्वार्ड – दक्षिण आफ्रिका –  ३२४ धावा

मिताली राज ( कर्णधार ) – भारत –  ४०९ धावा

एलिस पेरी – ऑस्ट्रेलिया –  ४०४ धावा आणि ९ बळी

सारा टेलर ( यष्टीरक्षक ) – इंग्लंड –  ३९६ धावा, ६ बळी ( ४ झेल आणि २ यष्टीचीत )

हरमनप्रीत कौर – भारत –  ३५९ धावा आणि ५ बळी

दिप्ती शर्मा – भारत –  २१६ धावा आणि १२ बळी

मॅरिझेन काप – दक्षिण आफ्रिका –  १३ बळी

डेन वॅन निकेर्क – दक्षिण आफ्रिका –  ९९ धावा आणि १५ बळी

अॅना शर्बसोल – इंग्लंड –  १२ बळी

अॅलेक्स हार्टली – इंग्लंड –  १० बळी

नतालिया सिवर ( १२ वी खेळाडू ) – इंग्लंड –  ३६९ धावा आणि ७ बळी