भारतीय महिला कबड्डी संघाची कर्णधार तेजस्विनी बाईने आगामी विश्वचषक कबड्डी स्पध्रेत सुवर्णपदक भारतच जिंकेल, असा विश्वास प्रकट केला. प्रो कबड्डी लीगमध्ये यंदापासून सुरू झालेल्या महिलांच्या प्रायोगिक स्वरूपातील स्पध्रेमुळे देशातील वातावरण बदलले आहे, असे तिने या वेळी सांगितले.

‘‘इराणचा संघ भारताला आव्हान देतो आहे. थायलंड आणि कोरियासारखे संघ उत्तमरीत्या खेळत आहेत. मात्र भारताला हरवण्याइतपत त्यांचे सामथ्र्य तयार झालेले नाही,’’ असे स्टॉर्म क्विन्सची संघनायिका तेजस्विनीने सांगितले.

‘‘प्रो कबड्डीच्या निमित्ताने महिलांना एक उत्तम व्यासपीठ मिळालेले आहे. आतापर्यंत आम्हाला फारसे कोणी ओळखत नव्हते; परंतु या लीगमुळे आम्हाला लोक ओळखू लागले आहेत,’’ असे फायर बर्ड्सची कर्णधार ममता पुजारीने सांगितले.

‘‘महिलांची लीग युरोशी स्पर्धा करीत आहे, ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. हा आकडा अधिक वाढेल,’’ असा विश्वास आइस दिवाजची कप्तान अभिलाषा म्हात्रेने व्यक्त केला.

महिलांचा अंतिम सामना रविवारी

प्रो कबड्डी लीगची सांगता येत्या रविवारी हैदराबादला होणार असून, अंतिम दिवशी तीन सामन्यांची रंगत क्रीडारसिकांना अनुभवता येणार आहे. या दिवशी सायंकाळी सात वाजता तिसऱ्या स्थानावर उपान्त्य फेरीत पराभूत झालेल्या संघांचा सामना होईल. त्यानंतर रात्री आठ वाजता महिलांचा अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे आणि मग रात्री नऊ वाजता पुरुषांची अंतिम फेरी होणार आहे.