हाज यात्रेमुळे पहिल्या तीन सामन्यांना मुकलेला वसिम जाफर परतला तोच नवे चैतन्य घेऊन. त्यानंतर बंगाल, सौराष्ट्र, मध्य प्रदेशविरुद्ध त्याने दमदार अर्धशतके झळकावली. यादरम्यान काही कारणास्तव तो पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. पण नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुजरातविरुद्धच्या सामन्यात जाफरची बॅट अधिक तेजाने तळपली. आपल्या भात्यातील अनेक वैविध्यपूर्ण फटक्यांनी जाफरने आपली १७१ धावांची शानदार शतकी खेळी साकारली. त्यामुळे आल्हाददायक थंडीतील हा दिवस मुंबईच्या क्रिकेटसाठी ‘सुहाना जाफर और ये मौसम हसीन..’ असाच होता. याच बळावर मुंबईने ५ बाद ३२९ अशी दमदार मजल मारली आणि रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या ‘अ’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यातील आपले तीन गुण पक्के केले. आता उर्वरित दोन दिवसांत निर्णायक विजयासहित उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा मुंबईचा निर्धार आहे.
कौस्तुभ पवार (१७) आणि आदित्य तरे (२०) बाद झाल्यानंतर मुंबईची २ बाद ७१ अशी अवस्था झाली होती. पण स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या जाफरने हिमतीने किल्ला लढविला. या हंगामात फॉर्मात फलंदाजी करणाऱ्या हिकेन शाहसोबत त्याने छान जोडी जमवली आणि पाहता पाहता गुजरातचा पहिल्या डावातील २४४ धावांचा गड मुंबईने आरामात सर केला. जाफरने थर्ड मॅनला चौकार ठोकून आपले प्रथम श्रेणी शतक साजरे केले आणि मग त्याच रुबाबात चहापानानंतर सातव्या चेंडूला राहुल भटला मिड-ऑनला चौकार ठोकून गुजरातची धावसंख्या मागे टाकली. जाफरने आपले दीडशतकही चौकारानेच साजरे केले.
हिकेन आणि जाफर जोडीने तिसऱ्या विकेटसाठी रचलेली २१३ धावांची भक्कम भागीदारी मुंबईसाठी महत्त्वाची ठरली. शतकाकडे कूच करणाऱ्या हिकेनचा (८२) अडसर समित गोहेलने त्रिफळा उडवून दूर केला आणि ही जोडी फोडली. मुंबईला सुस्थितीत नेल्यानंतर जाफर द्विशतक झळकावणार अशी अपेक्षा होती. पण रुश कलारियाच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये समित गोहेलकडे झेल देऊन जाफर माघारी परतला. ४०८ मिनिटे खेळपट्टीवर टिकाव धरणाऱ्या जाफरने २७९ चेंडूंत २४ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने १७१ धावा काढल्या. मग कलारियाने मुंबईला आणखी एक धक्का देत रणजी पदार्पण करणाऱ्या निखिल पाटीलला भोपळाही फोडू दिला नाही.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईकडे ७९ धावांची आघाडी जमा होती. सूर्यकुमार यादव (२३) आणि अभिषेक नायर (६) मैदानावर असल्यामुळे मुंबईला सोमवारी मोठय़ा आघाडीची अपेक्षा आहे.
संक्षिप्त धावफलक
गुजरात (पहिला डाव) : २४४
मुंबई (पहिला डाव) : ९९ षटकांत ५ बाद ३२३ (वसिम जाफर १७१, हिकेन शाह ८२; रुश कलारिया २/३८).    

शतकाचा आनंद विरळाच -जाफर
यंदाच्या रणजी हंगामात मी चार अर्धशतके साकारली. पण दुर्दैवाने त्या अर्धशतकांचे शतकांमध्ये रूपांतर करता आले नव्हते. मात्र गुजरातविरुद्धच्या सामन्यात शतक साकारल्यामुळे हा आनंद विरळाच आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईचा शतकवीर फलंदाज वसिम जाफरने व्यक्त केली. हाज यात्रेला गेल्यामुळे या हंगामातील पहिल्या तीन सामन्यांना आणि त्यानंतर आणखी एका सामन्याला खेळू शकलो नाही. पण हंगामातील महत्त्वाच्या टप्प्यावर मी मुंबईसाठी खेळतो आहे. चार अर्धशतके आणि एक शतक झाल्यामुळे मी समाधानी आहे, असे जाफर पुढे म्हणाला. तीन गुण मुंबईने नक्की केले आहेत, आता सोमवारी पहिल्या डावातील आघाडी आणखी वाढवून निर्णायक विजयासाठी आम्ही गांभीर्याने प्रयत्न करू, असे जाफरने आवर्जून सांगितले.

कर्नाटकचा धावांचा डोंगर
पुणे : कर्नाटकने महाराष्ट्राविरुद्ध ५७२ धावांचा डोंगर उभारत मोठय़ा विजयाची पायाभरणी केली. ४ बाद ३०६ वरून पुढे खेळणाऱ्या कर्नाटकने ९ बाद ५७२ धावांवर आपला डाव घोषित केला. कर्णधार स्टुअर्ट बिन्नी आणि यष्टीरक्षक मुरलीधरन गौतमने या नाबाद शतकवीरांनी रविवारीही महाराष्ट्राच्या गोलंदाजांची कत्तल केली. गौतमने ३२ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २६४ धावांची खेळी केली. बिन्नीने १९ चौकार आणि २ षटकारांसह १६८ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी केलेली ३४० धावांची भागीदारी कर्नाटकच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. बिन्नी बाद झाल्यानंतर अमित वर्माने गौतमला साथ दिली. त्याने ४२ धावा केल्या. महाराष्ट्रातर्फे समद फल्लाने सर्वाधिक २ बळी टिपले. प्रत्युत्तरादाखल खेळताना महाराष्ट्राने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ बाद ५८ अशी मजल मारली आहे. हर्षद खडीवाले ३१ तर संग्राम अतितकर ६ धावांवर खेळत आहे. महाराष्ट्राचा संघ अजूनही ५१४ धावांनी पिछाडीवर आहे.