एका वर्षांमध्ये पाच आंतरराष्ट्रीय पदके पटकावणारा पहिला भारतीय नेमबाजपटू ठरलेला जितू रायची पदकांची भूक अजूनही शमलेली नाही. रिओमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकपर्यंत कामगिरीमध्ये सातत्य राखण्यावर माझा भर असल्याचे जितूने सांगितले. त्याचबरोबर आशियाई स्पर्धेत नक्कीच पदक पटकावेन, असा विश्वासही त्याने या वेळी व्यक्त केला. ग्रेनेडा येथे सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत जितूने रौप्यपदक पटकावत ऑलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली. ‘‘विश्व अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावत मी ऑलिम्पिकसाठी जागा निश्चित केली आहे. सध्याचा माझा फॉर्म चांगला असून २०१६ च्या ऑलिम्पिकपर्यंत कामगिरीत सातत्य राखण्यावर माझा भर असेल. ऑलिम्पिकमध्ये माझ्याकडून या वेळी नेत्रदीपक कामगिरी होईल. पण त्यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धा ही माझ्यासाठी चांगली संधी आहे आणि नक्कीच या संधीचे सोने मी करीन. या स्पर्धेत पदक पटकावून देशाचे नाव उंचावेन,’’ असा विश्वास जितूने या वेळी व्यक्त केला.