भारत विजयाच्या द्वारापाशी येऊन ठेपला आहे. फक्त या दरवाजापाशी मोझेस हेन्रिक्स नामक अडसर दरवाजा अडवून समर्थपणे उभा आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी विजयासाठी भारतीय क्रिकेटरसिकांना पाचव्या दिवसाचा विलंब सहन करावा लागणार आहे. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या हेन्रिक्सने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही जिद्दीने किल्ला लढविला. भारत आणि विजय यांच्यात अडथळ्याप्रमाणे उभ्या राहणाऱ्या हेन्रिक्सची नाबाद ७५ धावांची झुंजार खेळी ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी वस्तुपाठ ठरली.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव लवकर गुंडाळून सोमवारी चौथ्या दिवशीच विजय करण्याचे मनसुबे भारतीय संघाने आखले होते. पण भारतीय फिरकीसमोर नतमस्त होणे हेन्रिक्सला मुळीच मंजूर नव्हते. तो तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन लढला. ११व्या क्रमांकावरील फलंदाज नॅथन लिऑनसोबत त्याने १०व्या विकेटसाठी नाबाद ५७ धावांची भागीदारी रचली आहे. यातील लिऑनचा वाटा आहे तो फक्त ८ धावांचा. या दोघांनी भारतीय त्रिकुटाचा समर्थपणे सामना करीत १८.१ षटके खेळपट्टीवर ठाण मांडले. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर ४० धावांची आघाडी जमा आहे.
सोमवारी ऑफ-स्पिनर अश्विनने या कसोटीत दुसऱ्यांदा पाच बळी घेण्याची किमया साधताना ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या आणि मधल्या फळीला हादरे दिले. अश्विनने दुसऱ्या डावात ९० धावांत ५ बळी घेतले असून, आता या सामन्यात त्याच्या खात्यावर १२ बळी जमा आहेत. त्यामुळेच हेन्रिक्स-लिऑन यांनी तारण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ९ बाद १७५ अशी दैना उडाली होती.