भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करत विजयी सलामी दिली. भारतीय संघाला विजयी सुरुवात करुन देताना कर्णधार मिताली राजने अनेक विक्रमांनादेखील गवसणी घातली. मात्र भारतात पुरुषांच्याच क्रिकेटला ग्लॅमर मिळत असल्याने मितालीच्या कामगिरीची दखल फारशी कोणीही घेतलेली नाही. मिताली राजची महिला क्रिकेट विश्वातील कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

काल (शनिवारी) झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांमध्ये २८१ धावांचे आव्हान उभे केले. पुनम राऊत (८६) आणि स्मृती मंधाना (९०) यांनी पहिल्या विकेटसाठी १४४ धावांची भागिदारी रचली. पुनम आणि स्मृतीने रचलेल्या पायावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार मिताली राजने कळस चढवला. मिताली राजने ७१ धावांची खेळी साकारली. प्रत्युत्तराखल इंग्लंडचा डाव ४७.३ षटकांमध्ये २४६ धावांमध्ये आटोपला आणि भारताने ३५ धावांनी विजय मिळवला.

कर्णधार मिताली राजने इंग्लंडविरुद्ध ४७ वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय अर्धशतक झळकावले. मिताली राजने इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्सचा सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढला. एडवर्ड्सच्या नावावर ४६ अर्धशतके जमा आहेत. मात्र इंग्लंडविरुद्धचे अर्धशतक साजरे करत मितालीने नवा विक्रम प्रस्थापित केला. इंग्लंडविरुद्धचे अर्धशतक हे मिताली राजचे लागोपाठ सातवे अर्धशतक आहे. आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही. मितालीने मागील सात डावांमध्ये नाबाद ७०, ६४, नाबाद ७३, नाबाद ५१, ५४, नाबाद ६२ आणि ७१ धावा (कालच्या सामन्यात) केल्या आहेत. याआधी इंग्लंडची शार्लट एडवर्ड्स, लिंडसे रिलर आणि एलिस पेरी (दोघीही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू) यांनी सलम सहा अर्धशतके केली होती. मात्र यातील कोणालाही लागोपाठ सात अर्धशतके करता आलेली नाहीत. कोणालाही न जमलेली ही कामगिरी मिताली राजने करुन दाखवली आहे.

मिताली राजचे विक्रम इतक्यावरच संपत नाहीत. ३ डिसेंबर १९८२ रोजी राजस्थानमधील जोधपूरात जन्मलेली मिताली गेल्या १६ वर्षांपासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करते आहे. मिताली राज आतापर्यंत १७८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळली आहे. यामध्ये मिताली राजने ५२.२५ च्या सरासरीने ५ हजार ८५२ धावा केल्या आहेत. १०० हून अधिक सामने खेळलेल्या महिला क्रिकेटपटूंमध्ये मिताली राजइतकी सरासरी कोणत्याही क्रिकेटपटूला राखता आलेली नाही.

मितालीने आतापर्यंत १७८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५ हजार ८५२ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक सामने यांचा विचार करता इंग्लंडची निवृत्त खेळाडू शार्लट एडवर्ड्स मितालीच्या पुढे आहे. एडवर्ड्सने १९१ सामन्यांमध्ये ५ हजार ९९२ धावा केल्या आहेत. त्यामुळे लवकरच मिताली राज एडवर्ड्सच्या नावावर जमा असलेले हे दोन्ही विक्रम मोडीत काढू शकते.