न्यूझीलंडचा संघ चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी नुकताच रांची येथे दाखल झाला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची हमर कार पाहून न्यूझीलंडचे आवाक झाले. धोनीला असेलेली बाईक्स आणि कारची आवड सर्वांनाच माहिती आहे. धोनीच्या गाड्यांच्या ताफ्यात विविध लक्षवेधी कार आणि बाईक्सचा समावेश आहे. चौथा एकदिवसीय सामना आपल्या घरच्या मैदानात होत असल्याने धोनीने विमानतळावरून आपल्या स्वत:च्या कारमधून रवाना होणे पसंत केले. तेही धोनीने स्वत: कार चालवली. त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ देखील विमानतळावर दाखल झाल्यानंतर खासगी बसने हॉटेलच्या दिशेने रवाना होत होता. न्यूझीलंडचे खेळाडू ज्या बसने जात होते, त्या बसच्या बाजूने धोनी आपली कार घेऊन जात होता. धोनीच्या ‘एच २ २००९’ या हमर कारने न्यूझीलंडच्या खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले. न्यूझीलंडचे खेळाडू रॉस टेलर आणि टॉम लॅथम आपल्या बसमधून धोनीची कार न्याहाळत असताना कॅमेरात कैद झाले.
धोनीकडील कारच्या ताफ्यात २००९ साली ‘हमर’ ही आलिशान कार दाखल झाली. त्याच्या ताफ्यात ११ लाखांची महिंद्रा स्कर्पिओ, ५२ लाखांची लँड रोव्हर फ्रीलँडर, ४८ लाखांची जीएमसी, २२ लाखांची पजेरो यासोबत ७७ लाखांची ऑडी क्यू ७, २.६ कोटी किमतीची पोर्श ९११ आणि १.५ कोटींची फरारी अशा आलिशान गाड्यांचा समावेश आहे.