गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २४६ धावांची मजल मारली. शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या ब्रेंडन मॅक्क्युलमने २७ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. मार्टिन गप्तीलने ५९ तर ग्रँट एलियटने ५० धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल मार्शने सर्वाधिक ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाचा डाव १९१ धावांतच आटोपला. उस्मान ख्वाजाने ४४ तर मिचेल मार्शने ४१ धावा केल्या. मॉट हेन्रीने ३ तर कोरे अँडरसन आणि इश सोधीने प्रत्येकी २ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. इश सोधीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.