जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांना विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे अग्रमानांकन देण्यात आले आहे. इंग्लंडची आशा असलेल्या अँडी मरेला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. दोन स्वतंत्र गटात असल्याने अंतिम लढतीपर्यंत हे दोघे समोरासमोर येण्याची शक्यता नाही.

विम्बल्डन स्पर्धेचे एकूण चौथे आणि सलग तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी जोकोव्हिच उत्सुक आहे. दुर्मीळ असा कॅलेंडर स्लॅमचा विक्रमही जोकोव्हिचला खुणावत आहे. दुसरीकडे मरे कारकीर्दीतील तिसरे ग्रँड स्लॅम पटकावण्यासाठी आतुर आहे. २०१३च्या विम्बल्डन स्पर्धेत मरेने जोकोव्हिचला नमवत इतिहास घडवला होता. तब्बल ७७ वर्षांनंतर मरेच्या रूपात इंग्लंडच्या खेळाडूने विम्बल्डन जिंकण्याची किमया केली होती.

मरेने जोकोव्हिचविरुद्धच्या शेवटच्या १५ पैकी १३ लढती गमावल्या आहेत. यामध्ये यंदाच्या ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेचा समावेश आहे. मात्र ग्रास कोर्टवरील शेवटच्या दोन लढतीत मरेने जोकोव्हिचला हरवले आहे. मरेने काही दिवसांपूर्वीच क्वीन्स क्लब स्पर्धेचे पाचवे जेतेपद पटकावले.

दुखापतीमुळे फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार घ्यावे लागलेल्या रॉजर फेडररला तृतीय मानांकन देण्यात आले आहे. १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या फेडररला गेल्या तीन वर्षांत एकही ग्रँड स्लॅम पटकावलेले नाही. ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी फेडरर उत्सुक आहे. मात्र पाठीचे दुखणे आणि गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे फेडररचे आव्हान कमकुवत झाले आहे. मात्र लाडक्या अशा विम्बल्डन स्पर्धेद्वारे दमदार पुनरागमन करण्यासाठी फेडरर आतुर आहे. स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला चौथे तर केई निशिकोरीला पाचवे मानांकन देण्यात आले आहे.

३४व्या वर्षीही युवा खेळाडूंच्या ऊर्जेने खेळणारी सेरेना अपवाद आहे. मात्र यंदा अद्याप सेरेनाला एकाही ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा करता आलेला नाही. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत अँजेलिक कर्बरने तर फ्रेंच खुल्या स्पर्धेत गार्बिन म्युगुरुझाने सेरेनाचे जेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. २२ ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी सेरेना प्रयत्नशील आहे. विम्बल्डन स्पर्धेची सहा जेतेपदे सेरेनाच्या नावावर आहेत. म्युगुरुझाला द्वितीय तर अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काला तृतीय मानांकन देण्यात आले आहे. इंग्लंडच्या जोहाना कोन्टाला १७वे मानांकन देण्यात आले आहे. १९८४नंतर पहिल्यांदाच इंग्लंडच्या महिला खेळाडूला या स्पर्धेत मानांकन मिळाले आहे.