‘कै. बुवा साळवी यांच्या कतृत्र्वामुळे भारतात कबड्डीला महत्त्व मिळाले. प्राचीन काळात ‘हुतुतू’ नावाने ओळख असलेल्या या खेळाचे त्यांच्या प्रयत्नाने ‘कबड्डी’त रूपांतर झाले. सध्या ३५ देशांत हा खेळ सुरू आहे आणि आणखी १५ देशांत हा खेळ सुरू झाल्यास ऑलिम्पिकची दारे खुली होतील. ऑलिम्पिकमध्ये कबड्डीचा समावेश होण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत. असे झाल्यास महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मोठी घटना ठरू शकेल,’’ असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.
कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिन अर्थात ‘कबड्डी दिना’चे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, जालना जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १५वा कबड्डी दिन सोहळा बदनापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार किशोर पाटील होते, तर व्यासपीठावर आयोजक दत्ताभाऊ पाथ्रीकर, माजी आमदार अरिवद चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात धुळ्याच्या महेंद्रसिंग रजपूत यांना उत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून मधू पाटील स्मृती पुरस्काराने, तर उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून पुण्याच्या किशोरी शिंदेला अरुणा साटम स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यासह ‘लोकसत्ता’चे विशेष क्रीडा प्रतिनिधी प्रशांत केणी यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कबड्डी दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद, जालना आणि परभणी या भागातील सर्व माजी कबड्डीपटूंचा हृद्य सत्कार करण्यात आला.

कबड्डी महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे. देशात २६ राज्यामध्ये हा खेळ पोहचला. आपल्याकडे अनेक गुणवंत खेळाडू आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यायला हवा. आगामी काळात गुणवंत खेळाडूंना विद्यापीठ  दत्तक घेणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या महा-कबड्डी स्पध्रेसाठी विद्यापीठाचे मदान मोफत देणार आहोत.
–  कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे

या खेळाचे एकत्रीकरण करण्यासाठी बुवा साळवी यांनी पायाला िभगरी लावून कबड्डीची बांधणी केली. देश पातळीवर सर्व जण एकत्र यावे, यासाठी त्यांनी खेळाचे एकत्रीकरण केले. महाराष्ट्राने या खेळाला प्रतिष्ठा मिळवून दिली. प्रसार-प्रचार झाल्याने या खेळात अन्य राज्य बाजी मारत आहे, ही आनंदाची बाब आहे.
 – किशोर पाटील, माजी आमदार

ग्रामीण भागातील खेळाडूंनी कबड्डी जिवंत ठेवली आहे. कबड्डी महर्षी बुवा हे मराठवाडय़ामध्ये असोसिएशन स्थापन करणारे पहिले खेळाडू होते.  त्यांच्या प्रेरणेने मराठवाडय़ात खेळाडू घडले.
– दत्ताभाऊ पाथ्रीकर, आयोजक