पहिल्या डावातील आघाडी आणि दुसऱ्या डावातील दमदार फलंदाजीच्या जोरावर बडोद्याविरुद्धच्या रणजी सामन्यामध्ये मुंबईच्या संघाला विजयाची नामी संधी असेल. मुंबईला विजयासाठी आठ बळींची गरज आहे, तर दुसरीकडे बडोद्याला विजयासाठी आणखी ३४१ धावांची गरज असून त्यांच्यासाठी हे आव्हान जवळपास अशक्यप्राय असेच असेल.
दुसऱ्या डावात मुंबईच्या संघाची ४ बाद ८४ अशी अवस्था असताना श्रेयस अय्यरने १२ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ९० धावांची खेळी साकारत संघाला सावरले. श्रेयसबरोबरच सिद्धेश लाड (४८) आणि निखिल पाटील (५०) यांनीही दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला. हरमीत सिंगने ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३० चेंडूंत ३५ धावांची खेळी साकारली आणि मुंबईने ३०४ धावांवर दुसरा डाव घोषित
केला.
मुंबईच्या ४०८ धावांचा पाठलाग करताना बडोद्याची २ बाद १० अशी बिकट अवस्था होती; पण त्यानंतर सौरभ वाकसरक (नाबाद ३३) आणि दीपक हुडा (नाबाद ३०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला सावरले असून तिसऱ्या दिवसअखेर त्यांनी २ बाद ६७ अशी मजल मारली आहे.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : २८७ आणि ६७ षटकांत ९ बाद ३०४ (डाव घोषित)
(श्रेयस अय्यर ९०; युसूफ पठाण ५/८०) वि. बडोदा : १८४ आणि २० षटकांत २ बाद ६७ (सौरभ वाकसरक खेळत आहे ३३, दीपक हुडा खेळत आहे ३०; बलविंदरसिंग संधू (कनिष्ठ) १/७).