चालू मोसमाची सांगता झाल्यानंतर मँचेस्टर युनायटेड संघाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बचावपटू रिओ फर्डिनांड याने स्पष्ट केले आहे. सततच्या दुखापतींमुळे गेल्या दोन वर्षांपासून फर्डिनांडचे युनायटेड संघातील स्थान डळमळीत झाले आहे. त्यामुळेच तो मँचेस्टर युनायटेडमधून बाहेर पडणार, हे जवळपास निश्चित होते.
इंग्लंडचा बचावपटू असलेल्या फर्डिनांडचा युनायटेडसोबतचा करार जुलै महिन्यात संपुष्टात येणार आहे. आपल्याऐवजी फिल जोन्स, जॉनी इव्हान्स आणि ख्रिस स्मॉलिंग यांना बचावपटू म्हणून संघात स्थान मिळत असल्यामुळे करार पुढे वाढवणार नसल्याचे फर्डिनांडने जाहीर केले आहे. ‘‘गेली १२ वर्षे जगातील सर्वोत्तम क्लब असलेल्या मँचेस्टर युनायटेडचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून माझे संघातील स्थान अनिश्चित झाले होते,’’ असे फर्डिनांडने आपल्या संकेतस्थळावर म्हटले होते. फर्डिनांडच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात मँचेस्टर युनायटेडने सहा वेळा इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद तसेच दोन वेळा लीग चषक तसेच प्रत्येकी एक वेळा चॅम्पियन्स लीग आणि क्लब विश्वचषकाचे जेतेपद मिळवले आहे.