फ्रान्सिस तिआफोईवर संघर्षपूर्ण विजय

ऑस्ट्रेलियन ओपन विजेता रॉजर फेडरर याने फ्रान्सिस तिआफोई याच्याविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळविला आणि मियामी टेनिस स्पर्धेत विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली.

पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविलेल्या फ्रान्सिस याने फेडरर याला कौतुकास्पद झुंज दिली. फेडरर याने सुरुवातीच्या चिवट लढतीनंतर हा सामना ७-६ (७-२), ६-३ असा जिंकला. फ्रान्सिस याला जागतिक क्रमवारीत १०१ वे स्थान आहे. पहिल्या सेटमध्ये त्याने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये त्याला सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण राखता आले नाही. फेडरर याने यापूर्वी या स्पर्धेत २००५ व २००६ मध्ये अजिंक्यपद पटकाविले आहे.

अमेरिकन ओपन विजेता स्टानिस्लास वॉवरिन्क याने दिमाखदार प्रारंभ करताना अर्जेन्टिनाच्या होरासिओ झेबलोस याच्यावर ६-३, ६-४ अशी सरळ सेट्समध्ये मात केली. वॉवरिन्क याला पुढच्या फेरीत टय़ुनेशियाच्या मलेक जाझिरी याच्याशी खेळावे लागणार आहे. मलेक याने स्पेनच्या फेलिसिआनो लोपेझ याच्यावर ६-३, ४-६, ६-३ असा विजय मिळविला.

महिलांच्या विभागात द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा हिने कझाकिस्तानच्या युलिया पुतिन्तेसेवा हिला ७-५, ६-३ असे हरविले. स्लोवाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोवा हिने बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकेन्स हिला सरळ दोन सेट्समध्ये पराभूत करीत आव्हान राखले.

बल्गेरियाकडून नेदरलँड्सचा पराभव

पॅरिस : रशियात पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान मिळविण्याच्या नेदरलँड्सच्या अपेक्षांना धक्का बसला. तीन वेळा उपविजेतेपद मिळविणाऱ्या बल्गेरियाने त्यांना २-० असे पराभूत केले. अन्य एका सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो याने कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय सामन्यात सत्तरावा गोल नोंदवत संघाला हंगेरीविरुद्ध ३-० असा विजय मिळवून दिला.

साखळी गटातील या पराभवामुळे नेदरलँड्सचा संघ आघाडी स्थानावर असलेल्या फ्रान्सपेक्षा सहा गुणांनी पिछाडीवर गेला आहे. त्यांच्याविरुद्धचे हे दोन्ही गोल स्पेस दिलेव्ह याने करीत बल्गेरियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. फ्रान्सने लक्झेम्बर्ग संघावर ३-१ अशी मात करीत आघाडी स्थान आणखी बळकट केले. ऑलिव्हर गिरौड याने सुरुवातीलाच फ्रान्सचे खाते उघडले. तथापि ३४ व्या मिनिटाला लक्झेम्बर्ग संघाच्या ऑरिलिन जोकिम याने पेनल्टी किकचा उपयोग करीत गोल नोंदविला व १-१ अशी बरोबरी साधली. फ्रान्सविरुद्ध गेल्या ३९ वर्षांमध्ये लक्झेम्बर्गकडून झालेला हा पहिलाच गोल आहे. लक्झेम्बर्गला बरोबरीचा आनंद फार वेळ टिकविता आला नाही. अन्तोनी ग्रिझमन याने पुन्हा फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ७७ व्या मिनिटाला बेंजामिन मेन्डी याने दिलेल्या पासवर गिरौड याने गोल करीत फ्रान्सला ३-१ असा विजय मिळवून दिला.

अन्य सामन्यात रोनाल्डो याने कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय सामन्यात सत्तरावा गोल नोंदविला. त्याच्या कौतुकास्पद खेळामुळे पोर्तुगाल संघाने हंगेरी संघाचा ३-० असा धुव्वा उडविला. साखळी ‘ब’ गटात पोर्तुगाल संघाने स्वित्र्झलडखालोखाल दुसरे स्थान राखले आहे. उत्कंठापूर्ण झालेल्या अन्य लढतीत रोमेलु लुकाकू याने शेवटची दोन मिनिटे बाकी असताना केलेल्या अप्रतिम गोलमुळेच बेल्जियमला ग्रीसविरुद्ध १-१ अशी बरोबरी राखता आली.