फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत माजी विजेता रॉजर फेडररने धडाकेबाज विजय मिळवत चौथ्या फेरीकडे वाटचाल केली. भारताच्या लिअ‍ॅण्डर पेसने कॅनडाच्या डॅनियल नेस्टॉर याच्या साथीत दुहेरीची तिसरी फेरी गाठली. महिलांच्या एकेरीत अ‍ॅना इव्हानोव्हिक व एकतेरिना माकारोवा यांनी अपराजित्व राखले.
विजेतेपदाचा दावेदार असलेल्या फेडररने बोस्नियाचा खेळाडू दामिर झुमहूरचा ६-४, ६-३, ६-२ असा दणदणीत पराभव केला. त्याने पासिंग शॉट्स व बेसलाईन व्हॉलीजचा सुरेख खेळ करीत हा सामना सहज जिंकला. रिचर्ड गास्केट या अनुभवी खेळाडूला पोर्तुगालच्या जोओ पॉसाविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. त्याने हा सामना ३-६, ६-३, ६-१, ४-६, ६-१ अशा संघर्षपूर्ण लढतीनंतर जिंकला व चौथ्या फेरीकडे आगेकूच केली.
महिलांच्या एकेरीत सातव्या मानांकित इव्हानोव्हिकने क्रोएशियाच्या डोना व्हेकिकला ६-०, ६-३ असे सरळ सेटमध्ये निष्प्रभ केले. एकतर्फी लढतीत तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. नवव्या मानांकित माकारोव्हाने रशियाच्या एलिना व्हेसनिनाचा ६-२, ६-४ असा पराभव केला. झेक प्रजासत्ताकची खेळाडू ल्युसी साफारोवाला सॅबिनी लिसिकीविरुद्ध विजय मिळविताना शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला. हा सामना तिने ६-३, ७-६ (७-२) असा जिंकला. स्थानिक खेळाडू अ‍ॅलिझी कॉर्नेटलादेखील झुंजावे लागले. तिने उत्कंठापूर्ण लढतीत मिर्जाना लुकिकवर ४-६, ६-३, ७-५ असा रोमहर्षक विजय मिळविला.
पेस व नेस्टॉर या दहाव्या मानांकित जोडीने आंद्रे बेगेमन (जर्मनी) व ज्युलियन नॉवेल (ऑस्ट्रिया) यांच्यावर मात केली. चुरशीच्या लढतीत त्यांनी ७-६ (७-३), ६-२ असा विजय मिळविला.