‘‘जेव्हा दुखापत होते, तेव्हा तुमचा विश्रांतीचा काळ किती लांबेल हे सांगता येणे कठीण असते. फलंदाजाऐवजी आणखी एका गोलंदाजाला भारतीय संघात प्राधान्य दिल्यामुळे चार वर्षांपूर्वी मला विश्वचषक स्पध्रेने हुलकावणी दिली होती. परंतु आता विश्वचषक काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना मला ही संधी दवडायची नाही,’’ असे बुधवारी छातीठोकपणे सांगणाऱ्या मुंबईच्या रोहित शर्माने गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात तितक्याच त्वेषाने शतकी खेळी साकारून भारतीय संघात पुनरागमनासाठी दार ठोठावले आहे. रोहित (१४२) आणि मनीष पांडे (नाबाद १३५) यांची शतके आणि कर्ण शर्माची लाजवाब फिरकी (४/४७) या बळावर भारत ‘अ’ संघाने ब्रेबॉर्न स्टेडियमवरील सराव सामन्यात श्रीलंकेवर ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना बोटाला झालेल्या दुखापतीमुळे रोहितला चार आठवडय़ांची विश्रांती घ्यावी लागली होती. परंतु नंतर खांद्याच्या दुखापतीमुळे हा विश्रांतीचा काळ आणखी लांबला.  परंतु पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाबाबत रोहित गंभीर आहे. त्यामुळेच निवड समितीचे लक्ष वेधणारी आत्मविश्वासपूर्ण खेळी रोहितने साकारली. १११ चेंडूंत १८ चौकार आणि एका षटकारासह त्याने १४२ धावा केल्या आणि भारत ‘अ’ संघाला ५ बाद ३८२ असा धावांचा डोंगर उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
रोहितला तोलामोलाची साथ लाभली ती कर्नाटकच्या २५ वर्षीय मनीष पांडेची. रोहित आणि पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी २१४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पांडेने १५ चौकार आणि एका षटकारासह ११३ चेंडूंत नाबाद १३५ धावा केल्या. त्याआधी रोहितने उन्मुक्त चंदच्या साथीने ९६ धावांची सलामी नोंदवली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सराव सामन्यांत अनुक्रमे नाबाद ७९ आणि १०१ धावा काढणाऱ्या उन्मुक्तने गुरुवारी ५४ धावा करीत आपले एकदिवसीय क्रिकेटमधील सातत्य दाखवून दिले.
भारत ‘अ’ संघाची धावांची बरसात रोखण्यासाठी श्रीलंकेच्या संघाने आपल्या सर्वच (१५) खेळाडूंचा क्षेत्ररक्षण करताना सोयिस्करपणे वापर केला. याचप्रमाणे लंकेच्या दहा गोलंदाजांनी गोलंदाजी केली. उपुल थरंगाच्या अर्धशतकी खेळीव्यतिरिक्त पाहुण्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाला फार काळ टिकाव धरता आला नाही आणि त्यांना निर्धारित षटकात नऊ बाद २९४ धावा करता आल्या. रेल्वेचा २७ वर्षीय गोलंदाज कर्ण शर्माने ४७ धावांत ४ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ : ५० षटकांत ५ बाद ३८२ (उन्मुक्त चंद ५४, रोहित शर्मा १४२, मनीष पांडे नाबाद १३५, मनोज तिवारी ४६; धम्मिका प्रसाद ३/५७, लाहिरू गमगे २/४१) विजयी वि. श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २९४ (उपुल थरंगा ७६, कुमार संगकारा ३४, महेला जयवर्धने ३३; कर्ण शर्मा ४/४७, धवल कुलकर्णी २/४१, परवेझ रसूल २/५६).
दुखापतीमुळे रोहित शर्मा गेले दोन महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळू शकला नव्हता. परंतु यातून सावरणारी खेळी त्याने साकारली आहे. रोहितने शतकी खेळीनिशी आपल्या फलंदाजीचा दर्जा दाखवला आहे आणि तंदुरुस्तीसुद्धा त्याने सिद्ध केली आहे.
– संजय बांगर, भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षक
३,२४० रुपयांत पाहा फेडरर आणि जोकोव्हिचला