सचिन तेंडुलकरचा जन्म हा फक्त फलंदाजीसाठी नाही तर क्रिकेटसाठीच झालेला आहे. त्याची फलंदाजी दर्जेदार आहेच, पण त्याच्या असण्याने एक वेगळे चैतन्य येते. सुनील गावस्कर यांच्यानंतर सचिन आला आणि यानंतरही मुंबईचे फलंदाज आंतरराष्ट्रीय दर्जावर येत राहतील. पण सचिनमुळे क्रिकेट प्रत्येक गावामध्ये पोहोचले आणि लहान गावांतूनही देशाला क्रिकेटपटू मिळाले. झारखंडचा महेंद्रसिंग धोनी किंवा सौराष्ट्रचा चेतेश्वर पुजारा ही त्याचीच उदाहरणे आहेत. हे पुस्तक सर्वासाठीच प्रेरणादायी आहे. मुळात सचिन ही व्यक्तीच सर्वासाठी प्रेरणादायी अशीच आहे, असे उद्गार भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने पत्रकार खलीद अन्सारी यांच्या ‘सचिन : बॉर्न टू बॅट’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी काढले.
यावेळी द्रविडने सांगितले की, ‘‘एकदा मुंबईचा संघ रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाचा चेन्नईमध्ये दक्षिण विभागाशी सामना होता. त्यावेळी खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने एखादा फिरकीपटू सामन्यासाठी बोलवायचा का, अशी चर्चा शास्त्री आणि संजय मांजरेकर यांच्यामध्ये चालू होती. तेव्हा सचिनने ‘मैं डालुंगा ना’ (मी फिरकी गोलंदाजी टाकेन ना) असे म्हटले. त्यावेळी ‘ऑफ-स्पिन’, ‘लेग-स्पिन’ काहीही टाकायची त्याची तयारी होती. याचाच अर्थ सचिन संघासाठी फक्त फलंदाजीसाठीच नाही तर कोणत्याही आघाडीवर यायला मागेपुढे पाहत नाही, हे स्पष्ट होते. यावेळी मितभाषी द्रविडने ‘मैं डालुंगा ना’ हे वाक्य सचिनचीच नक्कल करून म्हटले तेव्हा एकच हंशा पिकला.
सचिनचे अजून एक उदाहरण द्रविडने दिले, तो म्हणाला १५ वर्षांखालील दक्षिण विभागाच्या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंमध्ये माझी निवड झाली नव्हती. त्यामुळे मी गुणांकन करत होतो. आमच्या प्रतिस्पर्धी संघात सचिन होता, त्याची फलंदाजी पाहून मी भारावून गेलो आणि आपल्याला कुठपर्यंत मजल मारायची आहे, याची जाणीव झाली. या कार्यक्रमामध्ये माजी क्रिकेटपटूंसह अय्याझ मेमन, क्लेटन मुझ्रेल्लो आदी वरिष्ठ पत्रकारांनीही आपले अनुभव कथन केले.