चायना खुली बॅडमिंटन स्पर्धा :
गतविजेत्या सायना नेहवालने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा सरळ गेममध्ये पराभव करून सात लाख डॉलर्स पारितोषिक रकमेच्या चायना खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेची उपान्त्य फेरी गाठली आहे.
सायनाने ४२ मिनिटे रंगलेल्या लढतीत नोझोमीला २१-१६, २१-१३ असे पराभूत केले. आता अव्वल मानांकित सायनाची उपान्त्य फेरीत यिहान वांगशी गाठ पडणार आहे. २०११चे विश्वविजेतेपद आणि २०१२च्या लंडन ऑलिम्पिक स्पध्रेची रौप्यपदक विजेती यिहान ही सायनाची कट्टर प्रतिस्पर्धी मानली जाते. तिने सायनाला आतापर्यंत नऊ वेळा हरवले आहे.
मात्र चालू वर्षांत ऑल इंग्लंड अजिंक्यपद आणि विश्व अजिंक्यपद या दोन्ही स्पर्धामध्ये सायनाने तिला हरवले आहे. हैशिया ऑलिम्पिक क्रीडा केंद्र येथे झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात सायनाने प्रदीर्घ रॅलीज आणि ताकदवान फटक्यांवर भर दिला. पहिल्या गेममध्ये सायनाने ५-२ अशी आघाडी घेतली होती, परंतु ओकुहाराने तिला सडेतोड उत्तर देताना ५-५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सायनाने आपल्या खेळाचा स्तर उंचावत सहा गुणांची कमाई केली, तर ओकुहाराला केवळ तीन गुण कमावता आले. ११-८ अशा आघाडीनंतर सायनाने गुणांची भर टाकत पहिला गेम २१-१६ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला ओकुहाराने सायनाला झुंज दिली, परंतु सायनाच्या आक्रमक स्मॅशेससमोर तिला तग धरता आला नाही. सायनाने ११-३ अशा आघाडीसह सामन्याचे चित्र स्पष्ट केले होते. ओकुहाराने गुणांची कमाई करताना हा फरक कमी करण्याचा प्रयत्न केला. सायनाने मात्र लक्ष विचलित न होऊ देता दुसरा गेमही २१-१३ असा जिंकून उपान्त्य फेरीत स्थान निश्चित केले.