पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर बलाढय़ ऑस्ट्रेलियाला चीतपट करत दक्षिण आफ्रिकेने कसोटी क्रमवारीतील अढळस्थानावर शिक्कामोर्तब केले. गेल्या दोन दशकांत लढवय्या ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत सलग दोन दौऱ्यात नमवण्याचा भीमपराक्रम ग्रॅमी स्मिथच्या आफ्रिकन संघाने नावावर केला. सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय साकारत दक्षिण आफ्रिकेने २००वी कसोटी संस्मरणीय केली. मात्र अखेरच्या कसोटीत रिकी पॉन्टिंगला चांगली कामगिरी करता आली नाही. आठ धावांवर बाद होत पॉन्टिंगने कसोटी क्रिकेटला अलविदा केला.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अ‍ॅडलेड आणि ब्रिस्बेन कसोटी अनिर्णीत सुटल्याने दक्षिण आफ्रिकेला अव्वलस्थान राखण्यासाठी पर्थ कसोटीत विजय मिळवणे किंवा कसोटी अनिर्णीत राखणे आवश्यक होते. मात्र विजयासाठी ६३२ धावांचे प्रचंड लक्ष्य दिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला ३२२ धावांत गुंडाळत आफ्रिकेने मालिकेत १-० अशा दिमाखदार विजयाची नोंद केली.
चौथ्या दिवशी बिनबाद ४० धावांवरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आफ्रिकन गोलंदाजांनी ठरावीक अंतराने माघारी धाडले. शेवटची कसोटी खेळणारा रिकी पॉन्टिंग (८) आणि जबरदस्त फॉर्मात असलेला मायकेल क्लार्क (४४) तसेच भरवशाचा माइक हसी (२६) झटपट बाद झाल्याने चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा पराभव अटळ होता. मात्र दहाव्या विकेटसाठी नॅथन लिऑन आणि मिचेल स्टार्कने ८७ धावा जोडत पराभव लांबवला. डेल स्टेनने लिऑनला बाद करत ऑस्ट्रेलियाचा प्रतिकार संपुष्टात आणला. डेल स्टेन आणि रॉबिन पीटरसन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. हशीम अमलाला सामनावीर तर मायकेल क्लार्कला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. २००६नंतर दक्षिण आफ्रिकेने परदेशी दौऱ्यात एकही मालिका गमावलेली नाही. वाकाच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने गेल्या तीन सामन्यांत दोन विजय आणि एक सामना अनिर्णीत राखला.    

अखेरच्या कसोटीत पॉन्टिंग अपयशी
गेल्या काही कसोटीत धावांसाठी झगडणाऱ्या रिकी पॉन्टिंगला शेवटच्या कसोटीतही समाधानकारक कामगिरी करता आली नाही. अखेरच्या कसोटीत पॉन्टिंगकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती मात्र दोन खणखणीत चौकार लगावल्यानंतर रॉबिन पीटरसनच्या गोलंदाजीवर जॅक कॅलिसकडे झेल देत पॉन्टिंग बाद झाला. त्यानंतर आफ्रिकन खेळाडूंनी हस्तांदोलन करून पॉन्टिंगला शुभेच्छा दिल्या तर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याला मानवंदना दिली. वॉटसन बाद झाल्यानंतर पॉन्टिंग मैदानात उतरला त्या वेळी पॉन्टिंगला दक्षिण आफ्रिकन संघाने ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी एका ओळीने उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.