तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे संपूर्ण तामिळनाडूवर शोककळा पसरली आहे. राज्य सरकारने संपूर्ण आठवडाभर दुखवटा पाळण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

१६-२० डिसेंबर रोजी चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध भारताचा पाचवा कसोटी सामना होणार आहे. जयललिता या अत्यवस्थ झाल्यापासूनच चेन्नई दुःखात बुडाली होती. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तिथे कसोटी सामना कसा होणार असा प्रश्न आहे.
याबाबत बीसीसीआयने अद्याप कुठलीही भूमिका घेतली नसल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

चेन्नईमधील परिस्थिती आम्ही समजू शकतो परंतु आम्ही त्याबाबतीत अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे बीसीसीआयचे पदाधिकारी शिर्के यांनी म्हटले आहे.

बीसीसीआय या बाबतीत लवकरच एक बैठक घेईल आणि पुढील निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केले. बीसीसीआय तेथील स्थानिक आयोजकांसोबत आधी बोलेल आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेईल असे शिर्के यांनी म्हटले.

अद्याप आम्ही कुठलाही निर्णय घेतला नाही त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण येऊ शकते असे त्यांनी म्हटले. जर चेन्नईमध्ये सामना झाला नाही तर दुसरीकडे कुठे हलविण्यात येईल याबाबत देखील बीसीसीआयने मौन बाळगले आहे. परिस्थिती थोड्या-थोड्या वेळाने बदलत आहे. नेमके काय होईल हे अद्याप सांगता येणे कठीण आहे तेव्हा यावर भाष्य करणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. जर चेन्नईला सामना झाला नाही तर बीसीसीआयकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत असे देखील ते म्हणाले. परंतु, बीसीसीआयची बैठक होईपर्यंत नेमके काय होईल हे सांगणे कठीण आहे.