क्रीडा मंत्रालयाने बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. सिंधूने काही दिवसांपूर्वीच कोरियन ओपन सुपर सिरीजचे अजिंक्यपद पटकावले आहे. या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान सिंधूने मिळवला. यंदाच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली सिंधू ही दुसरी खेळाडू आहे. याआधी काही दिवसांपूर्वीच क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

कोरियन ओपनच्या जेतेपदावर नाव कोरणाऱ्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र या सामन्यात पराभव पत्कराव्या लागल्याने सिंधूचे अजिंक्यपद थोडक्यात हुकले. याच जबरदस्त कामगिरीमुळे सिंधूच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. याआधी मार्च २०१५ मध्ये सिंधूला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

यंदाच्या हंगामात सिंधूने शानदार कामगिरी करत अनेक महत्त्वाच्या स्पर्धा गाजवल्या आहेत. २२ वर्षांची सिंधू सध्या चांगल्या फॉर्मात असून तिने कोरियन ओपनसोबतच इंडिया ओपन सुपर सिरीज आणि सईद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशीप या स्पर्धांची विजेतेपदे पटकावली आहेत. जागतिक क्रमवारीत सिंधू सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्यपदकाची कमाई केली होती. याआधी कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावता आलेले नाही.

पी. व्ही. सिंधूच्याआधी क्रीडा मंत्रालयाने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. याशिवाय २०११ मध्ये विश्वचषक पटकावला होता. या दोन्ही स्पर्धांमध्ये धोनीने संघाचे नेतृत्त्व केले होते. यामुळेच २० सप्टेंबरला बीसीसीआयने धोनीच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी केली आहे.