लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या रशियन कुस्तीपटूची उत्तेजक चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे हे पदक योगेश्वरला देण्यात येणार आहे. योगेश्वरच्या कांस्यपदकाचे रुपांतर आता रौप्य पदकात होणार असल्याने अनेकांनी योगेश्वरचे कौतुक केले आहे.
माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वेगळ्या शैलीत योगश्वरच्या रौप्य पदकाबाबतची माहिती दिली. #Upgrade हा हॅशटॅग वापरून सेगवागने एक ट्विट केले आहे. क्रिकेट आता अमेरिकेत देखील पोहोचले, नेहराजी देखील स्मार्टफोनवर अपग्रेड झाले आणि आता योगेश्वर दत्तचे लंडन ऑलिम्पिकमधील कांस्य पदकाचे रुपांतर आता रौप्य पदकात होणार आहे, असे ट्विट सेहवागने #Upgrade या हॅशटॅगसह ट्विट केले आहे.

क्रिकेटच्या मैदानात तडफदार फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱया क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आता निवृत्तीनंतर सोशल मीडियावर जोरदार फलंदाजी सुरू केली आहे. नुकतेच रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंवर टीका करणाऱया शोभा डे यांना ‘साक्षी के गले मे मेडल कितना ‘शोभा दे’ रहा है’, असे ट्विट करून सेहवागने शोभा डे यांना स्ट्रेट ड्राईव्ह प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर त्याने आज योगेश्वर दत्तचे कौतुक केले.

लंडन ऑलिम्पिकमध्ये ६० किलोग्रॅम फ्री स्टाइल वजनी गटात रशियाच्या बेसिक कुदुखोव्हला रौप्य तर योगेश्वरला कांस्य पदक मिळाले होते. कुदुखोवचा २०१३ साली वयाच्या २७ व्या वर्षी रशियामध्ये अपघातात मृत्यू झाला आहे. परंतु याच महिन्यात रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिक सामन्यापूर्वी आयओसीने लंडन ऑलिम्पिक दरम्यानच्या खेळाडूंच्या सॅम्पलची पुन्हा एकदा तपासणी केली होती. हे सॅम्पल १० वर्षांपर्यंत ठेवले जाते. जर एखाद्या खेळाडूने चुकीच्या पद्धतीने यश मिळवले असेल तर या चाचणीतून ते समोर येईल असा आयओसीचा उद्देश आहे. या नियमांतर्गतच कुदुखोव्हच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे रौप्य पदक योगेश्वर दत्तला मिळेल. हे पदक मिळाल्यानंतर योगेश्वरही भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशीलकुमार, नेमबाज विजयकुमार यांच्या पंक्तीत जाऊन बसेल.