भारताने पहिल्या कसोटीत आम्हास चारी मुंडय़ा चीत केले आहे, त्याचे श्रेय भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या कल्पक नेतृत्वास द्यावे लागेल, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क म्हणाला.
क्लार्कने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करीत सांगितले, विराट कोहलीने सुरेख शतक ठोकून संघाच्या डावाची पायाभरणी केली मात्र धोनीच्या द्विशतकामुळे सामन्यास कलाटणी मिळाली. त्याच्या या द्विशतकी खेळीचा आमच्यावर खूप विपरीत परिणाम झाला. त्याचे नियोजन यशस्वी करण्यात त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला यथार्थ साथ दिली. भारतीय खेळाडूंनी आम्हाला पूर्णपणे निष्प्रभ केले.  
फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने सामन्यात एक डझन बळी घेतले. त्याचे कौतुक करीत क्लार्क म्हणाला, अश्विनने पहिल्या डावात सात बळी घेतले तर दुसऱ्या डावातही त्याने पाच मोहरे बाद केले. कोहली, धोनी व अश्विन या तीनच खेळाडूंनी आम्हाला सपशेल निष्प्रभ केले.
भारतीय खेळाडूंच्या कमकुवतपणावर आम्ही लक्ष केंद्रित करू शकलो नाही. जर दुसऱ्या डावात आम्ही २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य ठेवू शकलो असतो तर कदाचित आम्ही हा सामना जिंकलाही असता. निदान खेळपट्टी किती खराब झाली आहे हे आम्ही दाखवू शकलो असतो. भारताच्या विजयात येथील खेळपट्टीचाही मोठा वाटा आहे. अर्थात मी जेवढी अपेक्षा केली होती, तेवढी येथील खेळपट्टी वाईट नव्हती. आमच्या गोलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही. या खेळपट्टीवर भारताने पाचशे धावांचा डोंगर रचला. आम्ही दुसऱ्या डावात खूपच खराब फलंदाजी केली. असेही क्लार्कने सांगितले.