खेळाचा दर्जा आणि सातत्य कायम राखण्यासाठी कसून मेहनत घेत आहे. मात्र पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील कामगिरी तंदुरुस्तीवर अवलंबून असल्याचे भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने सांगितले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मात्र स्पर्धेदरम्यान माझे एकूण आरोग्य कसे आहे, यावर बरेच काही अवलंबून आहे, असे सायनाने सांगितले.
सायना सध्या बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण अकादमीत विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहे. ‘‘एकूण आठ तास मी सराव करते. अकादमीत असल्याने माझे संपूर्ण लक्ष खेळावर आहे. सर्वोत्तम कामगिरी व्हावी, यासाठी प्रशिक्षक प्रोत्साहन देत आहेत. खेळात सुधारणा व्हावी यासाठी मला सर्व सोयीसुविधा मिळत आहेत,’’ असे सायनाने सांगितले.
सायनाने याच वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याचा मान पटकावला होता. हा पराक्रम करणारी सायना पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली होती. अव्वल स्थान ग्रहण केल्यानंतर सायनाच्या कामगिरीत चढउतार पाहायला मिळाले. यामुळे सध्या ती क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. क्रमवारीतील स्थानाविषयी विचारले असता सायना म्हणाली, ‘‘अव्वल स्थानाचा मानकरी बदलत राहतो. जवळपास वर्षभर अव्वलस्थानी असलेली चीनची ली झेरुईची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. माझ्या कामगिरीत सातत्य राहिले तर मी पुन्हा अव्वल स्थान पटकावू शकेन.’’
माजी प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद तसेच दुहेरीची जोडी ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांच्यातील वादाविषयी भाष्य करण्यास सायनाने नकार दिला. ‘‘तो विषय महिला दुहेरीसंदर्भात आहे. मी दुहेरी खेळण्यावर लक्ष केंद्रित केले नाही. मी एकेरीची खेळाडू आहे,’’ असे सांगत सायनाने थेट भाष्य करणे टाळले.