भारतीय टेनिसमध्ये खेळापेक्षा वाद, अहंकार, बंडाळ्या यांचीच चर्चा अधिक रंगते. वर्षांनुवर्षे भारतीय टेनिस लिएण्डर पेस, सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा यांच्यापुरते मर्यादित आहे. रिओवारीसाठी सुदैवाने वादरहित संघनिवड झाली आहे. या त्रिकुटाच्या जोडीला महाराष्ट्राची प्रार्थना ठोंबरे असणार आहे. वाद बाजूला ठेवून निर्भेळ ‘सव्‍‌र्हिस’ होणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

लंडन ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस संघाच्या निवडीवेळी अभूतपूर्व तमाशा झाला होता. अखिल भारतीय टेनिस संघटनेने (आयटा) पदकाची शक्यता लक्षात घेत लिएण्डर पेस आणि महेश भूपतीची दुहेरी प्रकारासाठी निवड केली होती. ऑलिम्पिकमध्येही ही जोडी पूर्वीचा सूर कायम राखत यश मिळवेल या तर्कासह आयटाने या दोघांना एकत्र खेळण्यास सांगितले. पेस-भूपती या जोडीने १९९९ पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला. मात्र अहंकार, व्यावसायिक हितसंबंध आणि अन्य कारणांमुळे या दोघांनी एकत्र खेळण्याचे थांबवले. ऑलिम्पिकमध्ये एकत्र खेळता येईल या उद्देशाने २०१२ वर्षांच्या सुरुवातीपासून महेश भूपती आणि रोहन बोपण्णा जोडीने एकत्र खेळण्यास सुरुवात केली. मात्र आयटाने भूपतीला पेससह खेळण्यास सांगितले. या निर्णयाला नकार दिल्याने आयटाने भूपतीवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी दिली. मात्र त्याच वेळी बोपण्णानेही पेससह खेळण्यास नकार दिला. सानिया मिर्झासह मिश्र दुहेरीत कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने प्रश्न आणखी चिघळला. सानिया आणि भूपती एकत्र खेळल्यास पेसची मिश्र दुहेरीत आणि एकूणच ऑलिम्पिकवारीची शक्यता दुरावणार होती. या प्रकरणी आयटाने सानियाला कोणासह खेळायचे आहे किंवा नाही याचा विचारच केला नाही. मिश्र दुहेरीत सक्तीच्या सहकाऱ्यासह खेळावे लागणार असल्याने सानियाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. दरम्यान सर्व स्तरांवर पुरेशी नाचक्की झाल्यानंतर आयटाने पुरुष दुहेरीसाठी भारताचे दोन संघ पाठवण्याचे निश्चित केले. पेससह युवा विष्णू वर्धन खेळेल असे जाहीर करण्यात आले. इतक्या अननुभवी खेळाडूसह एकत्र खेळावे लागणार नसल्याने पेस नाराज झाला. संघ निवडताना ऑलिम्पिक, टेनिस संघटना आणि क्रमवारीच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याने विष्णू वर्धनसह खेळण्यावर पेसला राजी करण्यात आले. या सगळ्या नाटय़ाचा परिणाम टेनिसपटूंच्या कामगिरीवर झाला. बोपण्णा, भूपती, पेस, वर्धन, सानिया यांच्यासह सोमदेव देववर्मन, युकी भांब्री या सगळ्यांना झटपट गाशा गुंडाळावा लागला.

रिओ ऑलिम्पिकसाठी संघ निवडतानादेखील वाद ओढवण्याची शक्यता होती. भूपतीने निवृत्ती स्वीकारली नसली तरी स्पर्धात्मक टेनिसमध्ये तो सहभागी होताना दिसत नाही. पेस आणि बोपण्णा एकत्र येणार का हा प्रश्न होता. त्यातच संघनिवडीपूर्वी बोपण्णाने जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावले. यामुळे ऑलिम्पिकमध्ये सहकारी निवडण्याची मुभा बोपण्णाला मिळाली. त्यानुसार बोपण्णाने साकेत मायनेनीच्या नावाला पसंती दिली. आयटाला आपला निर्णय कळवला. मात्र यंदा आयटाने पेससह बोपण्णा खेळेल असे जाहीर केले. नकोशा पेससह खेळावे लागणार नसल्याने बोपण्णा भडकण्याची शक्यता होती. मात्र आयटाकडून झालेल्या मुत्सद्दी डावपेचांमुळे बोपण्णाने पेससह खेळणार असल्याचे जाहीर केले आणि संभाव्य गोंधळ टळला. यामुळे पेसची विक्रमी सातवी ऑलिम्पिकवारी प्रत्यक्षात साकारणार आहे. मात्र मिश्र दुहेरीत त्याला खेळण्याची संधी नाही. सानियाच्या बरोबरीने रोहन बोपण्णा खेळणार आहे.

महिला दुहेरीत सानियाने प्रार्थना ठोंबरेच्या नावाला पसंती दिली. आयटाने प्रार्थनाची निवड केल्याने तिचा बार्शी ते रिओ असा ऐतिहासिक प्रवास प्रत्यक्षात साकारणार आहे. टेनिस म्हणजे खासगी जिमखाने, क्लब यांची मक्तेदारी. सोलापूरजवळच्या बार्शीमध्ये टेनिस खेळण्यासाठी कोणतीही मूलभूत व्यवस्था नसतानादेखील प्रार्थनाने या खेळाची निवड केली. केवळ सरावासाठी रोज चार ते पाच प्रवास करावा लागणाऱ्या प्रार्थनाने टेनिसप्रतीची आवड कमी होऊ दिली नाही. तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टप्पा गाठणारी प्रार्थना देशभरातल्या खेळांकडे वळणाऱ्या युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरू शकते. २०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत सानियाने प्रार्थनासह सुवर्णपदकाची कमाई केली होती. गेले वर्षभर हैदराबाद येथे सानिया मिर्झा अकादमीत तिच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या प्रार्थनाने १६ पैकी १२ स्पर्धामध्ये जेतेपदावर नाव कोरले आहे. ऑलिम्पिकमध्ये जगभरातल्या मातब्बर खेळाडूंविरुद्ध ही जोडी उभी ठाकणार आहे. सानियाचा प्रदीर्घ अनुभव आणि प्रार्थनाची युवा ऊर्जा हे समीकरण यशस्वी ठरल्यास गुरू-शिष्य जोडीच्या नावावर ऑलिम्पिक पदक होऊ शकते. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेणाऱ्या सानियाने सहा ग्रँड स्लॅम जेतेपदांवर कब्जा केला आहे. मात्र बीजिंग आणि लंडनमध्ये पदकाने सानियाला दूर ठेवले. यंदा सानियाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकते.

वाढत्या वयासह मंदावणाऱ्या हालचाली, धुसर होणारी दृष्टी, दुखापती, वैयक्तिक आयुष्यातील दु:ख या सगळ्या गोष्टी बाजूला सारत ४२वर्षीय चिरतरुण पेस विक्रमी सातवी ऑलिम्पिकवारी करण्यासाठी सज्ज झाला आहे. १९५२ मध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत पटकावलेल्या पदकानंतर तब्बल ४४ वर्षे ऑलिम्पिकमधील वैयक्तिक पदकासाठी प्रतीक्षा करावी लागली. आता दुहेरीचा विशेषज्ञ असलेल्या पेसने तेव्हा एकेरी प्रकारात कांस्यपदक पटकावत इतिहास घडवला. अनेक वर्षे खेळूनही बोपण्णा दुसऱ्या फळीतला खेळाडू राहिला आहे. ऑलिम्पिकच्या निमित्ताने कौशल्य सिद्ध करण्यासाठी बोपण्णा आतुर आहे.

भारतीय टेनिस संघ

  • सानिया मिर्झा
  • लिएण्डर पेस
  • रोहन बोपण्णा
  • प्रार्थना ठोंबरे

ऑलिम्पिकमध्ये मिळालेले पदक

  • लिएण्डर पेस १९९६ अटलांटा  पुरुष एकेरी-कांस्यपदक

parag.phatak@expressindia.com