ट्रॅक अँड फिल्ड अर्थात अ‍ॅथलेटिक्स विश्वाला यंदा उत्तेजकांनी ग्रासले आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटना महासंघाच्या अध्यक्षपदी सेबॅस्टियन को यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचारविरहित प्रक्रियेवर भर दिला. यातूनच रशियाच्या अ‍ॅथलेटिक्सपटूंचे सरकार पुरस्कृत उत्तेजक सेवन प्रकरण उघडकीस आले. खेळप्रतिमेला बट्टा लावणाऱ्या याप्रकरणामुळे रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाच्या अ‍ॅथलेटिक्सपटूंवर बंदी घालण्यात आली आहे. हे नकारात्मक चित्र बदलण्यासाठी जगातला  वेगवान धावपटू उसेन बोल्ट उत्सुक आहे. बोल्ट १००, २०० तसेच ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकासाठी प्रयत्नशील आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने रशियाच्या ६७ अ‍ॅथलेटिक्सपटूंचा दावा फेटाळून लावला. यामध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती पोल व्हॉल्टपटू येलेना इसिनबायेव्हा, ११० मीटर अडथळा शर्यत पदक विजेती सर्जेय शुबेनकोव्ह आणि उंच उडीत पदकविजेती मारिया कुचिना यांचा समावेश आहे. लांब उडीत रशियाचे प्रतिनिधित्त्व करणारी मात्र अमेरिकास्थित असलेल्या दार्या क्लिशिना केवळ हिलाच ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

उत्तेजक प्रकरणाचे वास्तव जगासमोर आणण्यात जागल्याची भूमिका बजावणारी रशियाची धावपटू युलिया स्टेपानोव्हाने तटस्थ खेळाडू म्हणून खेळण्याची संधी मिळावी अशी विनंती आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडे केली होती. मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने संविधानानुसार ही विनंती मान्य करण्यास नकार दिला.

अ‍ॅथलेटिक्स विश्वाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी जगातला वेगवान धावपटू उसेन बोल्ट आतूर आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या रशियाच्या सर्वच अ‍ॅथलेटिक्सपटूंवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे बोल्टने समर्थन केले होते. ‘बंदीमुळे गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या मनात भीती बसेल तसेच खेळातील गैरव्यवहारांचे निर्मूलन करण्यासाठी महासंघ कटिबद्ध आहे याची जाणीव होईल. हे वाईट आहे. पण नियम नियम आहेत. मी निर्णय घेत नाही. मात्र संपूर्ण संघावर बंदी घालणे योग्य वाटते तर मी या कारवाईचे समर्थन करतो’, अशा शब्दांत बोल्टने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

‘रिओमध्ये इतिहास घडू शकतो. संपूर्ण जगासमोर सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी मी आतूर आहे. ही माझी शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे’, असे उसेन बोल्टने सांगितले.  दुखापतीविषयी विचारले असता बोल्ट म्हणाला, ‘शंभर टक्के तंदुरुस्ती गाठण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न आहे. मला आता ताजेतवाने वाटते आहे. मला थोडा वेळ लागेल. मी रिओमध्ये दाखल झालो आहे. ऑलिम्पिक पदक कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. सध्या कोणतीही दुखापत नाही हे महत्त्वाचे आहे’.