27 July 2017

News Flash

विस्तवाशी खेळ

२०१९ वर डोळा ठेवून कमालीच्या थंडपणाने खेळलेला तो पद्धतशीर ‘गेम प्लान’ आहे..

संतोष कुलकर्णी | Updated: March 20, 2017 12:35 AM

योगी हे  मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसले तरी आधीपासूनच तेच  मुख्यमंत्री होणार अशी असंख्य भित्तिचित्रे पूर्वाचलमध्ये लागलेली होती.

बहुमताला बहुसंख्याकवाद समजून उत्तर प्रदेशची सूत्रे योगी आदित्यनाथांसारख्या अखंड विद्वेषकारी व्यक्तिमत्त्वाकडे देण्याचा निर्णय नरेंद्र मोदी व अमित शहांनी घेतलाय. त्यावरून गहजब उडणे स्वाभाविक आहे; पण २०१९ वर डोळा ठेवून कमालीच्या थंडपणाने खेळलेला तो पद्धतशीर ‘गेम प्लान’ आहे.. 

उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहांची ‘११, अशोका रोड’ या मुख्यालयात पत्रकार परिषद होती. भाजपच्या अभूतपूर्व यशाचे कोडे सर्वाना सतावत होते. सरकारविरोधी जनमत, धार्मिक ध्रुवीकरण, प्रचारयंत्रणा आदी विजयाचे घटक होतेच; पण मिळालेला कौल यापेक्षा आणखी काही तरी कारण असल्याचे सांगत होता. शहांनी ते कारण सांगितले. देशातील गरीब आणि नरेंद्र मोदी यांच्यामधील अतूट नात्याचा ल्युटेन्स दिल्लीला अंदाज आलेला नसल्याचे विश्लेषण ते करीत होते. मुस्लीमबहुल मतदारसंघांमधील भाजपच्या विजयाकडे बोट दाखवीत ते सांगत होते की, उत्तर प्रदेशातील मतदार हिंदू-मुस्लीम मानसिकतेतून कधीच बाहेर पडलाय. आता या सभागृहातील मंडळींनी (म्हणजे माध्यमांनीही) त्या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. त्यांच्या तोंडी कामगिरीआधारित राजकारणाची (पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स) भाषा होती. नवा मुख्यमंत्री ‘योग्यतेच्या आधारा’वर निवडणार असल्याचे ते सांगत होते. दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी ‘न्यू इंडिया’ची भाषा केली. बहुमताने नव्हे, तर सर्वमताने – सहमतीने सरकार चालविण्याचे त्यांचे शब्द होते. विजयानंतर माणूस नम्र होतो, असे म्हणतात. त्या दिवशीचे मोदींचे भाषण त्या पठडीतील होते.

..पण मोदी आणि शहांचे ते शब्द शनिवारी सायंकाळी फसवे बुडबुडे वाटले. पाच वेळा खासदार बनलेल्या योगी आदित्यनाथांच्या हाती उत्तर प्रदेशची सूत्रे देण्याचा त्यांचा धक्कादायक निर्णय सर्वाना कात्रजचा घाट दाखविणारा होता. गोरखपूर मठाचे महंत असलेले आदित्यनाथ कडव्या, विद्वेषी हिंदुत्वाचे ‘पोस्टरबॉय’. त्यांची धगधगती भाषणे ऐकून एक तर चेतविलेल्या भावना चरणसीमेला पोहोचतात किंवा थरकाप तरी उडतो. ‘कैरानाचे काश्मीर होऊ देणार नाही’, ‘एका हिंदूला मुस्लीम केल्यास शंभर मुस्लिमांचे धर्मातर करू’, ‘योगाला विरोध करणाऱ्यांनो पाकिस्तानात जा’.. यांसारख्या भडकावू भाषणांच्या फैरीच ते झाडत असतात. देशातील सर्वात मोठय़ा राज्याचे नेतृत्व सोपविण्याएवढी कोणती ‘योग्यता’ मोदी-शहांनी या व्यक्तीमध्ये शोधली असावी? ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ची अजिबात अ‍ॅलर्जी नसणाऱ्या मध्यमवर्गीयांनासुद्धा जर योगींबद्दल धाकधूक वाटू शकते, तर सुमारे वीस टक्के मुस्लिमांच्या मनांमध्ये टोकाची भीती निपजणारच. एकपंचमांश समाजघटक भीतीखाली, दडपणाखाली राहणार असेल तर ‘सब का साथ, सब का विकास’ कसा काय साध्य होईल? गुजरात दंगलींचा डाग असणाऱ्या मोदींच्या उदयानंतर राम मंदिरासाठी रथयात्रा काढणारे आणि बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले लालकृष्ण अडवाणी मवाळ वाटत आहेत. पण आता योगींच्या उदयानंतर दस्तुरखुद्द मोदीसुद्धा मवाळ वाटू लागलेत.. अवघ्या ४४ वर्षांच्या योगींचे व्यक्तिमत्त्व इतके तालेवार, दुधारी आणि विभाजनकारी आहे! गोरखपूरमधील त्यांची समांतर सत्ता ही त्यांच्या ‘कर्तृत्वा’ची साक्ष. गोरखपूरला फक्त दोनच गोष्टी थांबवू शकतात. एक म्हणजे आदित्यनाथ किंवा ‘जापनीज इन्सेफालिटीज’ हा संसर्गजन्य रोग.. असे उगीचच नाही म्हटले जात.

मुख्यमंत्रिपदासाठी घेतल्या जात असलेल्या दहा-बारा नावांमध्ये योगींचेही नाव होतेच. त्यासाठी त्यांच्या समर्थकांचा जोरदार दबाव होता. पण त्यांची निवड खचितच दबावापोटी झालेली नाही. त्यांच्यासारख्या अक्राळविक्राळ चेहऱ्याचा मतांपुरता वापर करून घेणे वेगळे आणि अभूतपूर्व यश मिळाल्यानंतरसुद्धा त्यांनाच उत्तर प्रदेशचा चेहरा बनविणे वेगळे. त्यामुळे त्यांचे नाव चघळायला चांगले; पण प्रत्यक्षात त्यांची निवड होणार नसल्याचा सर्वाचाच होरा होता. पण मोदी आणि शहांनी सर्वानाच पुन्हा चकवा दिला.

मोदींच्या खेळींचा अंदाज बांधणे खरोखरच अवघड. भाजपच्या ‘डीएनए’त हिंदुत्व आहे. सौम्य वाजपेयींमुळे त्याला एक प्रकारची मध्यममार्गी झालर लागायची. पण सध्याचा भाजप मोदी आणि शहांचा. मोदी काही वाजपेयी नाहीत. एक तर माझ्या बाजूने, नाही तर थेट विरोधात असा त्यांचा खाक्या. ठरावीक साच्याच्या ‘मळलेल्या वाटे’वरून जातीलच किंवा ‘पोलिटिकली करेक्ट’ वागतीलच, याचा भरवसा नाही. पण सर्व निर्णय कमालीच्या थंड डोक्याने.  विरोधकांना अंदाज येण्यापूर्वीच चार पावले पुढे. प्रचाराचा अजेंडा स्वत: ठरविणारे आणि इतरांना प्रतिक्रियावादी बनविणारे. योगींची निवड त्या कमावलेल्या प्रचारकौशल्याचा सर्वोच्च आविष्कार. लक्ष्यभेदी कारवाई आणि नोटाबंदीचा निर्णय ही त्याची यापूर्वीची उदाहरणे.

स्वाभाविकपणे योगींच्या निवडीने एकच गहजब माजला आहे, पण त्याची फिकीर मोदी-शहा कशाला करतील? कारण सोपे. योगींवरून आता अरण्यरुदन करतील, अशांनी भाजपला मते दिलेली नाहीत. ज्यांनी मते दिलीत, ते एक तर खूश आहेत किंवा निष्कर्षांवर उडी मारण्यापूर्वी योगींना काही वेळ देण्याची त्यांची तयारी असल्याचे भाजपचे समीकरण आहे. म्हणूनच ज्यांची मते नाहीत, त्यांची फिकीर मोदी-शहांना नाही. एकदम रोकडा व्यवहार. ही टिपिकल व्यापारी मानसिकता. सहमतीची भाषा पोपटासारखी बोलायला ठीक; पण व्यवहारात पक्का हिशेबीपणा. म्हणून तर होणाऱ्या टीकेची पूर्ण कल्पना असतानाही मोदींनी योगींना राजयोगी बनविले आणि एकाच दगडात अनेक पक्षी मारले. वय योगींच्या बाजूने आहे, संन्यासी असल्याने व्यक्तिगत स्वार्थाची शक्यता कमी. परिणामी तुलनेने भ्रष्टाचारमुक्त शासन देण्याची शक्यता वाढते. जोडीला २४ तास झोकून देण्याचा स्वभाव आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची लोकप्रियता या सगळ्या योगींच्या जमेच्या बाजू. याउपर त्यांच्या निवडीमधील सणसणीत संदेशाने संघ परिवारातील कडवे घटक एकदम खूश. उत्तर प्रदेशातील कौल सकारात्मक असल्याचे अनेकांना वाटत असले तरी प्रत्यक्षात ही गेल्या दोन-तीन दशकांतील मुस्लीम तुष्टीकरणाविरोधातील टोकदार प्रतिक्रिया आहे, असा निष्कर्ष भाजपने काढला. त्यामुळे योगींची निवड तात्कालिक नाही. ती हिंदू बहुसंख्याकवादाला जाणीवपूर्वक खतपाणी घालणारी आहे. २०१९ वर डोळा ठेवून केलेला तो पद्धतशीर ‘गेम प्लान’ आहे. एकाही मुस्लिमाला उमेदवारी न देऊन या ‘गेम प्लान’ची चुणूक दाखविली होती. पण तेव्हा त्यामागचा ‘व्यापक अर्थ’ कोणाच्या लक्षात आला नव्हता.

भाजपचे यश पाहून विरोधक हेवेदावे विसरून एकत्र येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने तर बिहारच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षाला घेऊन महाआघाडीचे प्रयत्न चालू केलेत. मोदींच्या धसक्याने अखिलेशसिंह यादव व मायावती ही ‘बबुआ’ आणि ‘बुआ’ची जोडी एकत्र आलीच तर उत्तर प्रदेश कदाचित बिहारच्या मार्गाने जाऊ  शकतो. ही शक्यता एकदम ठाशीव आहे. म्हणून तर तिला प्रत्युत्तर देण्यासाठी योगींची नियुक्ती असावी. कारण त्यांच्या नुसत्या व्यक्तिमत्त्वाने, नुसत्या उपस्थितीनेसुद्धा धार्मिक ध्रुवीकरणाची शक्यता कैकपटींनी वाढते. नेमके हेच भाजपला अपेक्षित असावे. कारण महाआघाडीशी दोन हात करताना नुसता विकासाचा अजेंडा सत्तेपर्यंत पोहोचण्यास पुरेसा नसल्याचे भाजपने चाणाक्षपणे हेरले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील जनतेच्या मोठय़ा अपेक्षांचे ओझे २०१९ पर्यंत पेलता येणे अशक्य असल्याची कबुलीही आहे. म्हणून मग विकासकामांपेक्षा भावनिक व धार्मिक राजकारणाचा मार्ग सोपा. योगींची निवड तीच रणनीती अधोरेखित करते. याशिवाय मोदी कदाचित उत्तर प्रदेशच्या आणखी विभाजनाचा ‘मास्टरस्ट्रोक’ही खेळू शकतात. उत्तर प्रदेशचे चार भाग केले की अखिलेशसिंह फक्त अवधपुरतेच मर्यादित राहतील, मायावतींचे अस्तित्व फक्त पश्चिम उत्तर प्रदेशापुरतेच राहू शकते. मग योगी पूर्वाचलचे, उमा भारती बुंदेलखंडच्या, केशवप्रसाद मौर्य किंवा दिनेश शर्मा अवधचे आणि संजीव बालियान पश्चिम उत्तर प्रदेशचा चेहरा असू शकतात. मोदी हा डाव जरूर खेळू शकतात.

मोदींनी आपल्या ‘ब्रँड’मध्ये विकास आणि ‘सॉफ्ट’ हिंदुत्वाचे बेमालूमपणे मिश्रण केले होते; पण योगींच्या निवडीने तो मुखवटा गळून पडला. म्हणून तर योगींच्या निवडीमध्ये ‘मेथड इन मॅडनेस’ असली तरी तो विस्तवाशी खेळ आहे. लोकसभेत ८० सदस्य पाठविणाऱ्या राज्यात खेळलेला जुगार आहे. नोटाबंदीचा जुगार निवडणुकीत यशस्वी ठरल्याने वाढलेल्या धारिष्टय़ातून योगींना आणले गेले, पण जुगाराचा डाव प्रत्येक वेळी यशस्वी होतोच, असे नाही. बोटे भाजू शकतात. योगींच्या प्रत्येक गोष्टींवर माध्यमांचे बारीक लक्ष असेल. विरोधक टपून बसलेले असतील. आतापर्यंत त्यांच्या जहाल भाषेकडे दुर्लक्ष केले गेले. पण मुख्यमंत्रिपदी असताना प्रत्येक शब्द तोलूनमापून बोलावा लागेल. सत्ता स्थापनेनंतर त्यांच्या तोंडी ‘सब का साथ, सब का विकास’ हे शब्द आले. पण त्यांच्यासारख्या बेफाम व्यक्तीला संयमाचे हे ढोंग कितपत जमेल? त्याकामी  मोदींसारखे कौशल्य मिळविण्यास त्यांना बराच वेळ लागेल. तोपर्यंत ढोंगाचा मुखवटा टराटरा फाटण्याची शक्यता अधिक. जुगार खेळला आहे खरा, पण त्याची एक किंमत आहे आणि ती चुकविण्याची तयारी मोदी, भाजपला ठेवावी लागेल. बहुमताला बहुसंख्याकवाद समजण्याचा हा काळ आहे. पंतप्रधानांच्या स्वप्नातील ‘न्यू इंडिया’ची संकल्पना अद्याप स्पष्ट व्हायची आहे; पण योगींच्या निवडीने ‘न्यू भाजप’चे रंगरूप ठाशीवपणे समोर आले आहे..

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com

 

 

First Published on March 20, 2017 12:35 am

Web Title: uttar pradesh cm yogi adityanath 2
 1. K
  kumar
  Mar 20, 2017 at 5:37 am
  इतर mainstream..so called Left/liberal media प्रमाणे परिणामांबद्दल/administration विषयी मते मांडायची खूपच घाई झालीये असं दिसतंय. हा बऱ्याच वर्षाचं काँग्रेस/सपा/बसपा च्या काही विशिष्ट समाजाच्या मताच्या अनुयायांचा परिपाक आहे. त्या विषयी पण विस्तारपूर्वक लिहिले असते तर. UP मध्ये असं काय झालं ? ...जरा UP च्या interior भागात गेल्या शिवाय ,अभ्यासल्या शिवाय कळेल का ? लेख फक्त वर वर विचार करून लिहलंय असं वाटत. UP राजकारण has come full Circle बहुजन हिंदू-> ,OBC/BC->यादव/मुसलीम -> बहुजन हिंदू
  Reply
 2. P
  Pankaj
  Mar 20, 2017 at 5:00 pm
  बहुमताला बहुसंख्याकवाद समजण्याचा हा काळ आहे. हीच लोकशाही आहे ना?
  Reply
 3. M
  Manish
  Mar 20, 2017 at 4:04 am
  Totally standard opinion, no thinking behind article, I think Loksatta need to change their representative in Delhi
  Reply
 4. M
  Manish
  Mar 20, 2017 at 4:05 am
  Very ordinary and standard article . Loksatta need to change there representative in Delhi
  Reply
 5. विश्वनाथ गोळपकर
  Mar 21, 2017 at 5:01 pm
  "लोकांनी नव्हे तर पक्षातील सभासदांनी दबाव आणून दापटलेले नेते आहेत." हे वाक्य, निवडून देणाऱ्या मतदारांचा अपमान करणारे आहे.
  Reply
 6. विश्वनाथ गोळपकर
  Mar 21, 2017 at 4:53 pm
  खूपच छान ! . भुक्कड लेखावर आपले उत्तर सुंदर !!!BTW, ५०० characters पेक्षा मोठी प्रतिक्रिया लिहिण्यासाठी काय करावे लागते ?
  Reply
 7. P
  pamar
  Mar 20, 2017 at 9:19 am
  किती हा जळफळाट? आधी अडवाणींना शिव्या देऊन झाल्या. मग त्यांना पुढे करून मोदींना शिव्यांची लाखोली वाहिली. पण प्रत्यक्षात गेल्या २.५ वर्षात काहीही अघटित घडले नाही. पण मोदींची लोकप्रियता शिगेला पोचली. आता योगींच्या नावाने बोटे मोडा. पण त्यांनी ६-८ महिने कारभार हाकल्यावर काय ते म्हणा. पण तेव्हडी हि उसंत नाही.
  Reply
 8. R
  Ramesh Shete
  Mar 20, 2017 at 3:02 pm
  "याशिवाय मोदी कदाचित उत्तर प्रदेशच्या आणखी विभाजनाचा ‘मास्टरस्ट्रोक’ही खेळू शकतात." ... हे व्हायला हवं कारण त्यामुळे त्या प्रांताचा झपाट्याने विकास होईल. पुढच्या २-३ वर्षात राम मंदिर बनवण्यापेक्ष उत्तर प्रदेशचे ४ छोट्या राज्यांमध्ये परिवर्तन करणे जनतेला आणि भाजपला, दोघांनाही खूप फायद्याचं ठरेल. बऱ्याच तज्ज्ञ मंडळींचा आधीपासून ह्या मुद्याला पाठिंबा आहे. काही वर्षांपासून मायावती सुद्धा ह्याच्या समर्थनात आहेत!
  Reply
 9. R
  rahul
  Mar 20, 2017 at 3:36 am
  Completely misleading article. What is our experience in last 2.5 years of BJP govt in centre? Has it in any ways pro-hindutva? Yes, it has not chosen the path of appeat of Muslims.... Strengthening majority middle cl in India is govt 's motto.... They would succeed in it in UP too. Cm is just an administrator, directions come from centre - rightly so. The direction that we have experienced in last 2.5 yrs is of development and transparency. It's a time to come out of Hindu and Muslim etc. Nobody other than media talks about it. Citizens of India except media has shown strong maturity to understand what's happening in India. It's time for media to mature....
  Reply
 10. R
  rajendra
  Mar 20, 2017 at 2:24 am
  नवे मुख्यमंत्री हे संन्यासी असल्याने असीम निस्वार्थीपणा त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त शासन देण्याची शक्यता १०० टक्के वाढते. २४ तास झोकून देणे व कार्यकर्त्यांमध्ये ती वृत्ती बिंबविणे अश्या सगळ्या जमेच्या गोष्टींची प्राथमिक गरज आज ह्या देशाला व सर्व समाजघटकांना आहे. ती गरज भाजपचे राष्ट्रीय व राज्यिय नेते सध्या सक्षमरित्या पुरवीत आहेत. तेव्हा ब्रिटिशांचा फोडा,तोडा व सुशेगात सत्ता भोगा हाच वक्रमार्ग अनेक वर्षे अनुसुरीत असलेलं काँग्रेस,डावे आदी पक्ष व त्यांचे अ'संतोषी' पित्ते चांगलेच तोंडघशी पडले कि !!
  Reply
 11. R
  Ranjeet
  Mar 20, 2017 at 4:59 am
  मी कोणी योगी समर्थक नाही, पण ते आदित्यनाथ योगी असून चांगले विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत.त्यामुळे अति प्रखर हिंदुत्व त्यानि ग्रहण केलेल्या पदाला पोषक असणार नाही याची कल्पना त्यांना नक्कीच असावी.त्यामुळे हिंदुत्वची कास धरून ते इतर धर्मियांना त्रासदायक होणार नाही किंवा इतर कडव्या धार्मिक वादाचा त्रास हिंदूंना होणार नाही.याची काळजी घेऊन ते UP ची पूर्वीची प्रतिमा बदलतील याची आशा तेथिल जनतेचं असावी.
  Reply
 12. R
  ratnakar kekatpure
  Mar 21, 2017 at 7:04 am
  लोकमान्य,लोकशक्ती असे बिरूद मिरवणाऱ्या लोकसत्तेच्या संपादक मंडळाला लोकांची नाड कधीच कळली नाही.हस्तिदंती मनोऱ्यात बसून लोकशाही मार्गाने मिळालेल्या प्रचंड बहुमताचा अनादर करणार्यानी सध्या वाहत असलेल्या हवेपासून बोध घ्यावा.नाही तर वाचकच तुम्हाला घरी बसवतील .
  Reply
 13. S
  Sudhir Karangutkar
  Mar 20, 2017 at 6:18 am
  अगदी समतोल लेख पण भाजपच्या शहाणपणाला झोडपाण्याचा एकही प्रयत्न सोडला नसल्यामुळे थोडा एकांगी वाटतो बहुमताने आलेल्या सरकारवर पिवळी पत्रकारिता लोकशाहीच चौथा स्तंभ म्हणविणारे लाडू शकत नाही हे मोदी शहांच्या निर्णयामुळे सिद्ध झाले हे नक्की
  Reply
 14. अभय
  Mar 29, 2017 at 12:31 pm
  संपादक व्हावे लागते
  Reply
 15. S
  Shriram
  Mar 20, 2017 at 6:23 am
  नेहेमीप्रमाणे लोकसत्ता-प्रतिनिधी आदित्यनाथ हे चांगले मुख्यमंत्री ठरणार नाहीत हे ठरवून मोकळे झाले. दोन अडीच वर्षात लोकसत्ताने केलेले अनेक दावे, अनेक निष्कर्ष, अनेक भाकिते खोटी ठरून त्यांना करारा जवाब मिळाला आहे. त्यात याचीही भर पडेल अशी शक्यता आहे. "कैरानाचे काश्मीर होऊ देणार नाही" हे विधान 'संतोष कुलकर्णी' यांना का खटकावे ? का त्यांना तसे व्हावे असे वाटत आहे ? स्वयंप्रज्ञेचा माणूस मुख्यमंत्री झाला तर याना का खटकावे ? मोदीच ज्यांना पंतप्रधान होण्यालायक वाटत नाहीत त्यांना असेच वाटणार.
  Reply
 16. उर्मिला.अशोक.शहा
  Mar 20, 2017 at 2:16 am
  वंदे मातरम- मीडिया चे सतत लक्ष्य असल्यावर योगी ला सावधान होऊन कारभार करावा लागेल.भाजप ची इमेज सुधारण्या साठीच योगी ला पुढाकार दिला आहे. सगळ्यांनी टिके ची झोड उठवली आहे पण मुसलमान समाजा कडून त्या ची प्रतिक्रिया आली नाही याचा अर्थ काय असू शकतो कुलकर्णी महोदय. उ प्र च्या राजकारण ने दाखवून दिले कि या पुढे तुष्टीकरण हे हत्यार होऊ शकणार नाही आणि जनतेला विकास हवा वीज पाणी आणि मकान ची व्यवस्था योगी नि पुढारी घेतला कि लो स २०१९ आणि नंतर राममंदिर चा मार्ग मोकळा योगी मुळे कदाचित तडजोड हि शक्य जा ग ते र हो
  Reply
 17. उर्मिला.अशोक.शहा
  Mar 20, 2017 at 2:06 am
  वंदे मातरम- योगी ची निवड विस्तवाशी खेळ नसून वास्तवाशी तडजोड.आता कडवे हिंदुत्ववादी राममंदिर करिता हातघाईवर येणार नाहीत.लो स २०१९ पर्यंत राममंदिर थंड्या बस्त्यात ची हि खेळी.योगी फायर ब्रँड जरी असला तरी त्याला मुसलमान समाजा ित सर्वा करिता काम करावे च लागेल कारण २०१९ लो स. असे धाडसी निर्णय घेणारे च इलेक्शन चे युद्ध जिंकू शकतात. योगी ची निवड टिके चे लक्ष्य व्हावी म्हणूनच त्या मुळे इतर सर्व विवादित प्रश्ना कडे दुर्लक्ष्य विरोधकांना एकत्र येण्या करीत उत्तम मुद्दा पण लक्ष्यात कोण घेतो जा ग ते र हो
  Reply
 18. S
  sanjay telang
  Mar 20, 2017 at 6:13 am
  अत्यंत जहाल माण सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी केलेली खेळी , एकदम बरोबर घाव आहे. मतांसाठी सपा, बसपा, व इतर एकत्र येऊ शकतात, पण भाजपने 'मतांसाठी' हिंदूंना एकत्र केले तर ते जहाल हिंदुत्व कसे होते?? गोड बोला आणि मागून वार करा, ते चालेल हि नीती एका दमात बदलली. अनेक वर्षे कायदे कानून चे राज्य ना करत 'हा माझा, हा तुझा' चे राज्य आता पक्का व्यापार झाला. perform or perish भाजपाला लागू पण लांगुलचालन नीती कशी योग्य??मुसलमान, दलितांना वापरून फेकलेल्यांचा का पुळका? हीच का ती धर्मनिरपेक्षता ??
  Reply
 19. V
  vikas
  Mar 20, 2017 at 8:02 am
  लोकसत्ता चे विश्लेषण पातळी दिवसेंदिवस घसरतच जात आहे , जनमत कदाचित समजतच नाही आहे
  Reply
 20. V
  vikrant dhavale
  Mar 20, 2017 at 9:27 am
  कुठलीही माहिती नसताना अंदाज व्यक्त करणे अवगढ आहे. गजेंद्र चौहान यांना जेव्हा FTTI चा अध्यक्षा केले तेव्हाही सर्वांनी टीका केली, पण प्रत्यक्षत त्यांच्या पूर्वसूरींपेक्षा त्यांचे काम खूपच चांगले झाले. त्यांनी FTTI चा फायदाच झाला. तेव्हा वाट पाहणे योग्य.
  Reply
 21. विनोद
  Mar 20, 2017 at 3:35 am
  "बुवा" ---माणसे खपाट खंगलेली, आतुन आतुन भंगलेलीअदृष्य्य दहशतीने तंगलेली , आधार नाही !प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा,जो काढील सार्‍या उवा, मनातल्या चिंतेच्या !आधि म्हणे 'जय साई',मगच अधिकारी लाच खाई ,अजुन पकडला गेला नाही,कृपा म्हणे बाबांची !आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही,आपण भिडायचे नाही, आयुष्याला !कणा झिजुन गेला पार, शिरजोरापुढे सर्व लाचार,बुवा नाम जपाचा उच्चार, नशा देई !- मंगेश पाडगावकर
  Reply
 22. Load More Comments