इंटरनेट, स्मार्ट फोन्स, विविध समाजमाध्यमं याने लोकांवर एक प्रकारे गारुड केलं आहे, मात्र तरुणाई त्यात जास्तच भरडली जाते आहे. त्यातली  व्यसनाधीनता अंमली पदार्थाप्रमाणे त्या माणसाला जगण्यातून उठवू पाहते आहे. सेल्फी घेणं आणि ती समाजमाध्यमांवरून ‘व्हायरल’ करणं ही आम बात झालेली आहे. मात्र तरुण पिढीच्या बाबतीत त्याचा अर्थ त्यापलीकडे पोहोचतो आहे. काय आहे यामागचं कारण.. का वाढते आहे ही सायबर व्यसनाधीनता? काय असतं वर्तनात्मक व्यसन? काय सांगते सायबर सायकॉलॉजी या व्यसनाधीनतेविषयी..

अर्जुन भारद्वाज या विद्यार्थ्यांने वांद्रय़ाच्या  हॉटेलच्या १९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने या आत्महत्येच्या तयारीचे चित्रीकरण करून ते फेसबुकवर पोस्ट केले होते. या घटनेची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. तरुण वयात अर्जुनने उचलेलं हे पाऊल आणि त्यापूर्वी केलेलं चित्रीकरण निश्चितच धक्कादायक आहे. आत्महत्येबरोबरच त्याच्या कृतीने अनेक प्रश्न समोर येतात. मुलांमध्ये वाढत असलेला एकलकोंडेपणा, समाजमाध्यमांचं गारूड आणि त्यातून निर्माण होणारे वर्तनात्मक व्यसन (बिहेविअरल अ‍ॅडिक्शन). हे सगळं काय आहे ते समजून घेतलं पाहिजे.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

अर्जुनची ही आत्महत्या आणि त्याने त्याचे चित्रीकरण करणे अशासारखी घटना प्रथमच घडतेय असं नाहीये. यापूर्वीही भारतात त्याचप्रमाणे परदेशात अनेकांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहे, किंवा अनेकांनी तसे केले नसले तरी चित्रीकरण करून ठेवल्याच्या घटना घडल्या आहेत. असे चित्रीकरण करणे आणि ते व्हायरल करणे यामागच्या मानसिकतेचा विचार केला तर लक्षात येईल की, लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाची महत्त्वाची गरज असते ती व्यक्त होण्याची. आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं, आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं, आपण कोणाचं तरी लक्ष वेधून घ्यावं असं वाटत असतं. ही गरज तरुण मुलांमध्ये विशेषत: पौगंडावस्थेतील मुलांमध्ये अधिक प्रमाणात असते. त्यामुळेच समजून घेणारं, त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणी नसेल तर ते नैराश्यामध्येही जाऊ शकतात. त्यातूनच मग ही तरुणाई समाजमाध्यमांद्वारे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. सध्याची जी तरुणाई आहे म्हणजे विशी-पंचविशीतील मुलं, त्यांना अगदी लहान वयातच गॅजेट, समाजमाध्यमांचा परिचय झाला आहे, त्यामुळे सातत्याने समाजमाध्यमांवर असणं ही त्यांच्या दृष्टीने मोठी गोष्ट नाहीये.

सध्याच्या तरुणाईच्या या अशा आत्ममग्न वागण्यावर परदेशामध्ये खूप मोठं संशोधन झालं आहे, करण्यात येत आहे. तिथे ‘सायबर सायकॉलॉजी’ म्हणून संकल्पनाच मांडली गेली आहे. अर्थात त्यावर सातत्याने संशोधन सुरू आहेच. डॉ. मेरी आयकेन यांनी या सायबर सायकॉलॉजीवर संशोधन केले आहे. तरुण पिढीनेच नव्हे तर कुणीही इंटरनेट, मोबाइल किंवा समाजमाध्यमांवर सातत्याने असणं हेही इतर व्यसनांप्रमाणेच घातक असल्याचं म्हटलं आहे. डॉ. मेरी आयकेन यांनी या सगळ्यावर, त्याच्या परिणामांवर ‘सायबर इफेक्ट’ नावाचं

पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी अनेक उदाहरणं घेऊन त्यावर संशोधन करून काही निष्कर्ष मांडले आहेत. त्यात तिने ‘सेल्फी’ या व्यसनाचे उदाहरण देताना एक घटना सांगितली आहे. ही घटना आहे २०१५ मधली. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडलेली. एका शाळेतील एका शिक्षिकेला वर्ग सुरू असतानाच प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिची ती अवस्था पाहून एक मुलगा तिच्याजवळ गेला आणि त्याने तिला मदत करण्याऐवजी सेल्फी काढली. त्याने तिला ‘स्माइल’ देण्यास सांगितले होते, मात्र वेदनेने कळवळत असणाऱ्या शिक्षिकेने तसे करण्यास नकार दिल्यावर त्याने त्याच अवस्थेत सेल्फी काढून ती ‘सेल्फी विथ वुमन इन कॉन्ट्रॅक्शन’ पोस्ट केली. त्या शिक्षिकेला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तो फोटो सगळीकडे व्हायरल झाला. अशी कित्येक उदाहरणे देता येतात. ज्यात एखादा अपघात झाल्यावर लोक मदत करण्याऐवजी सेल्फी काढण्यासाठी धडपडतात. एवढंच कशाला निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर, जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर त्या त्या गोष्टींचा आस्वाद घेण्याऐवजी लोक सेल्फी काढण्यात त्यांचा वेळ वाया घालवतात.

मुलांच्या अशा वागण्याबाबत डॉ. मेरीचं म्हणणं आहे की, पौगंडावस्थेत मुलांची ओळख विकसित व्हायला लागलेली असते. ‘मी कोण?’ हा प्रश्न त्यांना पडतो. त्यातूनच ते स्व-प्रतिमेची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यात शारीरिक बदल घडत असल्याने शरीराबाबत काही न्यूनगंडही तयार व्हायला लागलेले असतात. असे न्यूनगंड अनेकदा स्मार्टफोनच्या, समाजमाध्यमांच्या द्वारे दूर करण्याचा प्रयत्न तरुणाई करताना दिसते. त्यातून मग लक्ष वेधून घेण्यासाठी स्व-प्रतिमा निर्माण करण्यासाठी सेल्फी हा प्रकार वाढतोय की काय अशी शंका मेरी उपस्थित करते.

त्यात डॉ. मेरीने एका संशोधनाचा विस्तृत ऊहापोह केला आहे. ४० वर्षांपूर्वी माकडांवर काही प्रयोग करण्यात आले. जंगली माकडे आणि पाळीव माकडांना आरसे असणाऱ्या पिंजऱ्यात बंद करण्यात आले. प्रथम त्या माकडांना आरशात दिसणाऱ्या त्यांच्या प्रतिमा म्हणजे दुसरे माकड आहे, किंवा आपला स्पर्धक आहे असे वाटल्याने त्यांनी आरडाओरड करणे, आरशांवर मारणे, किंवा तो फोडण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार केले. मात्र दोन-चार दिवसांनंतर त्यांना ती आपलीच प्रतिमा असल्याचे लक्षात आले. अर्थात पाळीव माकडांना हे लवकर लक्षात आले तर जंगली माकडांना हे समजण्यास थोडा अधिक वेळ लागला. एकदा ती आपली प्रतिमा आहे हे लक्षात आल्यावर ते सतत आरशातच बघायला लागले. वेगवेगळे चाळे करून ते त्यातच स्वत:ला पाहण्यात गुंग झाले. त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर माकडांतील त्यांचे स्वारस्य कमी कमी झाले होते.

डॉ. मेरी सेल्फी काढणारे, समाजमाध्यमांमध्येच अडकणारे यांची तुलना माकडांबरोबर करते. ही तुलना करणं बरोबर नसल्याचं तिचंही म्हणणं आहे, मात्र स्व-प्रतिमेच्या प्रेमात पडलेल्या माकडांप्रमाणेच आजच्या तरुणाईची अवस्था झाली आहे. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ कार्ल रॉजर   म्हणतात की, स्वत:च्या प्रतिमेचे ३ भाग असतात. एक म्हणजे स्व-प्रतिमा म्हणजेच स्वत:विषयी आपल्याला काय वाटतं, दुसरा म्हणजे स्व-आदर आणि तिसरा म्हणजे आयडियल सेल्फ किंवा स्वत:ची आपल्या मनातली आदर्श प्रतिमा. सध्याची तरुणाई विशेषत: पौगंडावस्थेतील मुलं या तिन्ही गोष्टींसाठी मोबाइल, इंटरनेट, समाजमाध्यमं यावर अवलंबून आहे. ही मुलं आदर्श प्रतिमेवर कधीच समाधानी नसतात. पूर्वी ते याच गोष्टींसाठी आई-वडील, भाऊ बहीण, शिक्षण, करिअर यांवर अवलंबून असायची. त्यांचे ध्येय त्यांच्यासाठी महत्त्वाचं असायचं. सध्या मात्र मी इन्स्टाग्रामवर, फेसबुकवर किती फोटो अपलोड केले, मला किती लाइक्स मिळाले यातच ते स्व-प्रतिमा, स्व-आदर शोधण्याचा प्रयत्न करतात. यातून मग तुलना, न्यूनगंडाची भावना निर्माण होते. अर्जुन भारद्वाजच्या आत्महत्येमागे कदाचित या सगळ्या गोष्टी परिणामकारक ठरल्या असाव्यात. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ पोस्ट करण्यामागे लोकांचे लक्ष वेधून घेणे हाच प्रकार असावा.

सध्या ‘मुक्तांगण’मध्ये अंमली पदार्थाच्या व्यसनाबरोबर सध्या ‘वर्तनात्मक व्यसन’ म्हणजेच ‘बिहेविअरल अ‍ॅडिक्शन’ यावर उपचार केले जातात, समुपदेशन केले जाते. इंटरनेट, स्मार्टफोनचा मोठय़ा प्रमाणात वापर हे सध्या एक प्रकारचं व्यसनच झालं आहे. खूप कमी वयोगटातील मुलं त्याला बळी पडत आहेत. त्याला ‘आयएडी म्हणजेच इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर’ म्हणतात. ‘मुक्तांगण’मध्ये आलेली काही उदाहरणे इथे सांगते, म्हणजे एकूण या वर्तनात्मक व्यसनाची तीव्रता, दाहकता लक्षात येईल.

एका दहावीतल्या मुलाचे पालक त्याला ऐन परीक्षा सुरू असताना ‘मुक्तांगण’मध्ये घेऊन आले. दहावीतल्या मुलांचे पालक एकतर परीक्षा सुरू होण्यापूर्वी किंवा परीक्षा झाल्यानंतर मुलांना घेऊन येतात. त्या मुलाचे वडील सांगत होते की, त्यांचा मुलगा १० वीची परीक्षा सुरू असतानाही सतत स्मार्टफोनवर गेम खेळत असतो. त्यामुळे त्याला मागचा पेपर अवघड गेला होता. आता दोन पेपरमध्ये असलेल्या सुट्टीतही त्याने गेम खेळणं कमी केलं नव्हतं. ते त्याने कमी करावं म्हणून समुपदेशन करण्यासाठी ते त्याला घेऊन आले होते. त्याला काही तरी असं सांगावं जेणेकरून तो गेम खेळणं एकदम बंद करेल असं त्याच्या वडिलांना वाटत होतं. त्या मुलाशी बोलल्यावर लक्षात आलं की त्याला परीक्षेचा तर ताण होताच शिवाय त्याला त्याच्या भविष्याचाही ताण जाणवत होता. त्यामागे त्याच्या आणि त्याच्या पालकांच्या अपेक्षांमध्ये असणारी तफावत हेही एक कारण होतं. आलेला ताण कमी करण्यासाठी तो गेम खेळत होता.

दुसरं उदाहरण महाविद्यालयात जाणाऱ्या एका तरुणीचं. तिच्या आईने दूध तापायला ठेवलं होतं. तिला गॅससमोर उभी करून ती काही कामानिमित्त बाहेर गेली. ही मुलगी मोबाइलमध्ये इतकी गुंग झाली की दूध तापून उतू गेलं, दूध जळालं, घरभर धूर पसरला, वास पसरला तरी तिला भान नाही. शेवटी तिची आई परतल्यानंतर तिने तो गॅस बंद केला आणि मुलीला भानावर आणलं.

तिसरे एक पालक त्यांच्या महाविद्यालयात जाणाऱ्या मुलाला घेऊन आले होते. त्याचा आजार त्यांच्या खूप उशिरा लक्षात आला होता. तो मुलगा दररोज रात्री जेवण झाल्यावर मला प्रोजेक्टचे काम करायचे आहे, असे सांगून संगणकावर गेम खेळत बसायचा. अर्थात हे त्याच्या आईवडिलांच्या लक्षात यायचं नाही, मात्र आधी रात्री काही तास बसणारा मुलगा त्यांना सकाळीही त्याच अवस्थेत बसलेला आढळायचा. हे त्याचं व्यसन आहे किंवा त्याचं हे वागणं धोकादायक आहे, हे त्यांना कळलं नाही. मात्र एकदा तो त्याच अवस्थेत बसून होता आणि त्याने तिथेच लघवी केली होती, हे त्याच्या लक्षातसुद्धा आले नव्हते. हे पाहिल्यावर मात्र त्याचे पालक हादरले. त्यांनी त्याला फॅमिली डॉक्टरकडे नेले असता त्यांनी त्याला ‘मुक्तांगण’मध्ये नेण्याचा सल्ला दिला.

अशी कितीतरी प्रकरणं ‘मुक्तांगण’मध्ये येत आहेत. हळूहळू अशा वर्तनात्मक व्यसन लागलेल्यांचे प्रमाण वाढत आहे. अर्थात हे व्यसन लगेच लागत नाही. अंमली पदार्थाचे व्यसन एकदम न लागता हळूहळू त्याची तीव्रता वाढत जाते. ‘एकच प्याला’पासून झालेल्या प्रारंभाचा अखेर मग रोजच अंमली पदार्थाचे सेवन करण्यात होतो. त्याला टॉलरन्स वाढला असं म्हटलं जातं. त्यातून मग अंमली पदार्थ मिळाले नाहीत की त्या व्यक्तीला त्रास व्हायला लागतो. त्यामध्ये ‘व्रिडॉल सिम्प्टम्स’ दिसायला लागतात. त्याचा शरीरावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळतो.

साधारणत: अशीच सुरुवात वर्तनात्मक व्यसनामध्ये होते. प्रथम अगदी एकदोन तासच मोबाइल, इंटरनेटचा वापर करणारे कधी त्याच्या आहारी जातात हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. वर्तनात्मक व्यसनात अडकलेल्यांना विरोध केल्यास त्यांच्यामध्येही ‘व्रिडॉल सिम्प्टम्स’ दिसायला लागतात. चिडचिड करणे, दु:खी होणे, कशातच मन न लागणे, एकाग्रता भंग पावणे असे दुष्परिणाम दिसू लागतात. शरीरावरही त्याचे परिणाम होतात. सातत्याने स्क्रीनसमोर राहिल्याने डोळ्यांवर परिणाम होतो, जेवणाकडे दुर्लक्ष झाल्याने वजन कमी होते किंवा स्क्रीनकडे पाहात अति खाल्ल्याने वजन वाढते, पाठीची दुखणी उद्भवतात, तर स्मरणशक्ती कमी होते. एकाग्रता नष्ट होते, हे झाले मानसिक नुकसान, मात्र त्याचबरोबर अशा व्यक्तींचे सामाजिक जीवनही विस्कळीत होते.

समाजमाध्यमांमध्ये शेकडय़ाने मित्र असलेले आणि तिथे अगदी प्रभावीपणे संवाद साधणारे हे वर्तनात्मक व्यसनांचे बळी ठरलेले लोक सामाजिक जीवनात कुणाच्या डोळ्यात डोळे घालून, समोरासमोर संवाद साधू शकत नाहीत. त्यांच्या भावनिक त्याचप्रमाणे सामाजिक बुद्धिमत्तेवर परिणाम झालेला आढळतो. समाजजीवनात ते एकटे एकटे राहायला लागतात. अशा व्यक्ती आपल्या भावना समाजमाध्यमांवर व्यक्त करत राहतात. (उदाहरणार्थ, ‘फीलिंग सॅड’, ‘फीलिंग डिप्रेस्ड’ वगैरे) त्या भावना कुणासमोर बोलून व्यक्त न केल्याने त्या भावनांची तीव्रता कमी होत नाही किंवा त्यांचा निचराही होत नाही. अंमली पदार्थ जितके शारीरिक, मानसिक परिणाम करून घातक ठरतात तितकेच इंटरनेट, मोबाइलचे व्यसन घातक ठरत आहे.

मुलांना अशा व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पालकांची भूमिका यात अधिक महत्त्वपूर्ण आहे. पालकांनी मुलांना क्वॉलिटी टाइम दिला पाहिजे. अनेकदा असं दिसून येतं की पालकच मुलांना इंटरनेट, गेम, मोबाइल अशा ‘खेळण्यांची’ ओळख करून देतात. खरं तर मुलांना गॅजेट हाताळण्यासाठीची योग्य समज आल्याशिवाय त्यांना ती द्यायलाच नकोत. ती दिल्यानंतरही केवळ गरजेनुसार वापर करण्याविषयी आणि त्यांच्या गैरवापराच्या परिणामांची जाणीव त्यांना करून द्यायला हवी. पालक लहान मुलांचे रोल मॉडेल असतात. पालकच जर त्यांच्यासमोर कायम मोबाइल किंवा लॅपटॉपवर असतील तर ते काय शिकतील? त्याऐवजी मुलांना मोकळ्या हवेत खेळण्याची, ट्रेकिंग, अन्य साहसी खेळांची त्याचप्रमाणे वाचन, संगीत यांची ओळख करून दिल्यास ते अशा व्यसनांच्या मागे जाणारच नाहीत. याबाबत अल्बर्ट आइनस्टाइनचे एक वाक्य आहे, ‘आय फिअर द डे दॅट टेक्नॉलॉजी विल सरपास अवर ह्य़ुमन इंटरॅक्शन. द वर्ल्ड विल हॅव अ जनरेशन ऑफ इडियट्स’ कदाचित आपण वेळीच लक्ष दिले नाही तर तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे अशीच पिढी निर्माण होण्याची शक्यता आधिक आहे. त्यामुळे वेळीच सावरले पाहिजे.

(लेखिका पुण्याच्या ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती संस्थेच्या उपसंचालक आहेत.)

मुक्ता पुणतांबेकर muktangancorporate@gmail.com

शब्दांकन – रेश्मा भुजबळ

reshmavt@gmail.com