‘‘मी अजूनही आशा नाही सोडलेली, देवावर माझा विश्वास आहे, माझ्यातल्या पित्याची हाक परमात्मा नक्की ऐकणार. ऑल इज नॉट लॉस्ट टिल यू गिव्ह अप..’’ दाराआड उभं राहून ऐकलेले एका पित्याचे ते बोल, नि:शब्द करून गेले मला! मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या आपल्या मुलासाठी हा पिता एका योद्धय़ासारखा उभा होता. प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला आणि घटनेला तो शौर्याने आणि संयमानं सामोरं जात होता.. एका खऱ्याखुऱ्या पित्याच्या अढळ श्रद्धेविषयी.. खास उद्याच्या फादर्स डे निमित्ताने..

‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा. उघड दार देवा आता, उघड दार देवा’ रुग्णालयाच्या पायऱ्या चढताना, सतत याच ओळी मनांत पिंगा घालत होत्या. समोरून येणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं आणि हृदयातून परत आवाज आला, ‘खरंच देवा दार उघड आता..’ माझ्यासमोर उभे असलेले गोरेकाका, एका तीस वर्षांच्या तरुणाचे, आदित्यचे वडील होते. डोळ्यात दु:ख, चेहऱ्यावर अनुभवाच्या आणि अभावाच्या सुरकुत्या, तरीही बोलण्या-चालण्यामध्ये कुठेही निराशावाद नव्हता. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायचा जणू काही निर्धार होता त्यांचा. काय कथा होती त्यांची?
काकांच्या मुलाने, म्हणजेच आदित्यने, दारूच्या व्यसनापायी स्वत:च्या तब्येतीचा नायनाट करून घेतला होता. रिकरन्ट पॅनक्रियाटायटीस या आजारासाठी तीन-चारदा रुग्णालयामध्ये येऊन उपचार घेऊन गेलेला होता. या वेळेला मात्र तो त्याच्या अगदी शेवटच्या स्थितीत म्हणजेच अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये आमच्या आय.सी.यू.मध्ये दाखल झाला. आम्ही सगळे आणि आमचे गॅस्ट्रेएंटरोलॉजिस्ट त्याच्या उपचारामध्ये लागलो. अतिशय देखणं, बोलकं आणि सतत आम्हाला प्रश्न विचारून हैराण करणारं असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. गेल्या काही महिन्यांत चांगला परिचयही झाला होता त्याच्याशी.. त्यालाही मृत्यूची चाहूल लागलेली होती आणि आजाराचं गांभीर्य काकांनाही स्पष्टपणे माहीत होतं. प्रत्येक वेळेला ‘प्रयत्नान्ति परमेश्वर’ याच भावनेनं ते आमच्याकडे बघून मान डोलवायचे. पोटच्या पोरासाठी असलेलं प्रेम एखाद्या व्यक्तीला किती खंबीर बनवू शकतं त्याचं काका म्हणजे मूर्तिमंत उदाहरण होतं.
आदित्यच्या वडिलांना बघितलं की मला माझ्या बाबांची आठवण येई. त्यांच्या धाकात आणि शिस्तीत मी लहानाची मोठी झाले. जिवापाड मायेसोबत नेहमीच एका आधारस्तंभासारखे ते पाठीशी उभे असायचे आणि आजही असतात. अशा त्या माझ्या आयुष्यातल्या हिमालयाला मी एकदाच कोसळताना पाहिलं आहे. माझ्या प्रसूतीच्या वेळी. वेदना मला होत होत्या पण त्याचा त्रास बाबांना होत होता. अकस्मात, भूकंपामुळे एखादी इमारत कोसळावी, तशी त्यांची अवस्था झाली होती. त्या दिवशी मला जाणीव झाली होती की बाहेरून कठोर दिसणारे हे बाप लोक, नारळासारखे असतात, बाहेरून कठीण आणि आतून तितकेच मृदू हृदयाचे आणि आजच्या परिस्थितीत अशा आणखी एका वडीलरूपी हिऱ्याचे दुसरे रूप बघत होते.
आदित्यला सुद्धा एव्हाना लक्षात आलं होतं की, आपणच आपल्या हातानेच आपलं आयुष्य संपवलं आहे. पण आता खूप उशीर झाला होता. सतत चुळबुळ करणारा आमचा आदी हळूहळू शांत व्हायला लागला होता. जशी प्रकृती गंभीर व्हायला लागली, त्याच्या वेदनाही वाढू लागल्या, पण त्याहीपेक्षा त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाच्या वेदना अधिक तीव्रतेने दिसू लागल्या. काकांनी मात्र ना कधी एका शब्दाने निराशा व्यक्त केली ना राग. करतीलही कसे, वडील नावाच्या त्या माणसाच्या शब्दकोशात ते शब्द नव्हतेच मुळी. त्यांच्या त्या धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाकडे पाहून आदीही अस्वस्थ व्हायचा.. काही न बोलता एकटक त्यांच्याकडे बघत राहायचा.. जणू आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांची मूक माफी मागायचा.. कधी कधी झोपल्या झोपल्याच त्यांचा हात गच्च धरायचा आणि तेव्हा हाताची ती घट्ट मिठी शब्दाविनाच म्हणायची, ‘‘बाबा मला भीती वाटते आहे.’’ काका ते समजून आदित्यला म्हणत, ‘‘मी आहे बाळा, सगळं ठीक होईल.’’ त्या बापाच्या हृदयात होता फक्त सूर्योदय. अस्त नव्हताच. रोज मुलाला भेटल्यावर, काका माझ्याजवळ समुपदेशनासाठी यायचे, तेव्हा आशेच्या किरणांनी त्यांचे डोळे चकाकत असायचे. त्या तेजात अश्रूंचे थेंब पण बरेचदा न्हाहून निघायचे. सहसा रुग्णाशी व्यावसायिक वागणारी मी काकांशी बोलताना मात्र हलून जायची.. माझ्यातली आई मनोमन त्या पित्याच्या धैर्याला वंदन करायची.
हळूहळू आदित्यची प्रकृती खालावत गेली. त्याच्या शरीरात सगळीकडे इन्फेक्शन पसरू लागलं होतं. एकेक अवयव.. आतडे, फुप्फुसं निकामी होऊ लागले. शेवटी त्याला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं. तीनदा शस्त्रक्रिया करून आतडय़ातला पू काढावा लागला. मृत्यूशी चाललेली झुंज, आदीच्या चेहऱ्याला हळूहळू निस्तेज करू लागली.. तसतशी आमच्या मनातली घालमेल वाढत होती. त्याची आई, बायको या सगळ्यांनी त्याचा अंत स्वीकारला होता. दोघीही शांतपणे त्याला भेटायला यायच्या आणि त्याला निपचित, सगळ्या उपकरणासोबत झोपलेला बघून, अश्रूंचा बांध फुटायच्या आधीच निघून जायच्या. हळूहळू त्या रोजच्या ऐवजी तीन-चार दिवसांतून एकदा भेटायला येऊ लागल्या. तो औषधांच्या गुंगीत, आता वेगळ्याच विश्वात रमला होता. पण काका मात्र ठामपणे उभे. ‘तुम्ही तुमचे उपचार जोमाने चालू ठेवा,’ हेच त्यांचे ब्रीदवाक्य. कमालीचा विश्वास होता त्यांचा आमच्यावर. सगळी वस्तुस्थिती जाणूनसुद्धा विलक्षण आशावाद होता त्यांच्या वागणुकीत. आय.सी.यू.मध्ये असलेल्या बाकी गंभीर आजारी रुग्णांच्या नातेवाईकांना ते स्वत:चं उदाहरण सांगून धीर देत.
त्याच सुमारास एक अठरा वर्षांचा मुलगा अपघातग्रस्त होऊन आमच्या आय.सी.यू.त दाखल झाला होता. अतिशय गंभीर जखमा होत्या त्याच्या. बरगडय़ा तुटल्या होत्या, छातीमध्ये रक्त जमा झालेलं, दोन्ही हाताची हाडं तुटलेली आणि माकडहाडाजवळ अतिशय खोल जखम झाली होती. त्या मुलाची ही प्रकृती जीवन मरणामध्ये झुलत होती, पण अनुभव सांगत होता की वेळ लागला तरी त्याचा जीव वाचेल. त्याच्या वडिलांचा मात्र धीर सुटू लागला होता. मुलाचा जीव राहील ना, ही भीती त्यांना सारखी सतावत होती. तेव्हा काकांनी पुढे होऊन त्यांना सावरलं. ते म्हणाले, ‘‘अहो माझ्याकडे बघा. तुमचा मुलगा कमीत कमी शुद्धीवर आहे आणि डॉक्टरांना अजूनही त्याची परिस्थिती हातात आहे असं वाटतं. माझ्या मुलाची प्रकृती कधीच हाताबाहेर गेली आहे, तो गुंगीत आहे, मी त्याच्या जवळ आहे याची शुद्धसुद्धा नाहीये त्याला. कशी गंमत आहे बघा, आधी दारूची गुंगी होती म्हणून माझ्या अस्तित्वाची शुद्ध नव्हती आणि आज आजारामुळे. मी जणू त्याच्यासाठी नेहमी असून नसल्यासारखाच राहिलो. पण मी आशा नाही सोडली, देवावर माझा विश्वास आहे, काही तरी चमत्कार होणार, माझ्यातल्या पित्याची हाक परमात्मा नक्की ऐकणार.’’ ते म्हणाले, ‘‘दादा, ऑल इज नॉट लॉस्ट टिल यू गिव्ह अप..’’ दाराआड उभं राहून ऐकलेले ते बोल, नि:शब्द करून गेले मला! एक पिता आपल्या मुलासाठी एका योद्धय़ासारखा उभा होता. प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला आणि घटनेला तो शौर्याने आणि संयमानं सामोरं जात होता.
आज सकाळी रुग्णालयासाठी निघतानाच मला फोन आला की आदित्यला रक्तस्राव सुरू झालाय. परिस्थिती हाताबाहेर गेली होती आणि करण्यासारखं काहीच उरलेलं नव्हतं. रुग्णालयात पोहोचले. काकांना समोरून येताना पाहिलं आणि त्यांनी म्हटलेल्या, ‘‘गुड मॉर्निग मॅडम’’मध्ये कुठेही त्यांचा तो विश्वास डळमळलेला दिसला नाही. थोडंथोडकं नव्हे तर जीवन मृत्यूच्या झुंजेत डॉक्टरांवर पराकोटीचा विश्वास ठेवणं, हे आजच्या काळात खरोखर दुर्मीळ आहे. तो पिता आम्हाला आशावाद आणि पितृशक्तीचा वेगळाच धडा शिकवत होता. पिता झाल्यावर माणूस हा देवरूपी का दिसायला लागतो, याची प्रचीती मला पुरेपूर होत होती.
माझ्या मनांत विचारांचे दोन चरखे सुरू होते. आमच्या आदित्यला होणारा त्रास आणि एकंदर निष्पन्नाची कल्पना असल्यामुळे एकीकडे वाटत होतं, ‘उघड दार देवा आणि सुटका कर या जिवाची.’ तर दुसरीकडे काकांचा विश्वास पाहून वाटत होतं, ‘उघड दार देवा आणि होऊ दे विजय एका पित्याच्या श्रद्धेचा.’ मन वेडं असतं. माहीत असतं काळाच्या समोर आपण विवश आहोत, तरीही कुठे तरी ध्यास सुरूच, ‘उघड दार देवा आता. उघड दार देवा!..’
(लेखातील व्यक्तींची नावे बदलली आहेत.)
swapna.khanzode@gmail.com