‘‘माझ्या आवडीचं क्षेत्र निवडण्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा होता. मला ‘आर्ट्स’ घ्यायचं होतं. आणि दहावीला ९१ टक्के मार्क मिळाल्यावरसुद्धा तो निर्णय मी कायम ठेवला. तेव्हा तुम्ही पूर्ण पाठिंबा दिलात. तुम्ही म्हणायचात की, ‘‘आयुष्यात असा अभ्यासक्रम निवड की जे काम करताना प्रत्येक दिवस एक सोहळा असेल. रोज सकाळी उठल्यावर तो दिवस उत्साहाने जगावासा वाटेल. आपल्या कामातून हे सुंदर जग अधिक सुंदर आपण बनवायला मदत करतोय, असं समाधान वाटेल.’’ पुढे मी मानसशास्त्राचा अभ्यासक्रम निवडल्यावर तर तुम्ही खूपच खूष झाला होतात. म्हणालात, ‘‘आज समाजाला मानसशास्त्रतज्ज्ञांची खूपच गरज आहे. तू अगदी बरोबर अभ्यासक्रम निवडला आहेस.’’ प्रसिद्ध विज्ञानलेखक लक्ष्मण लोंढे यांच्या लेकीने, ऋचाने जागवलेल्या त्यांच्या आठवणी.. उद्याच्या जागतिक ‘फादर्स डे’ निमित्ताने..

हाय बाबा,
उद्या फादर्स डे. आपल्या आयुष्यात आपल्या वडिलांचं असलेलं स्थान मान्य करून त्यांचे आभार मानायचा हा दिवस. आपल्या संस्कृतीत खरं तर आपण आई-वडिलांचे असे आभार कधीच मानत नाही. पण मला स्वत:ला ही संकल्पना आवडते आणि म्हणूनच उद्याच्या फादर्स डेला तुमच्याकडून मिळालेल्या भरपूर प्रेम आणि कौतुकाबद्दल आणि आयुष्यभर पुरेल अशा शिकवणीच्या आणि अनुभवांच्या शिदोरीबद्दल मी थोडं बोलणार आहे. खरं तर तुम्ही असतानाच हे करायला हवं होतं.. पण माझी खात्री आहे तुम्ही आजही माझ्याबरोबर कुठल्या ना कुठल्या रूपात कुठे न कुठे तरी आहात. सो हीअर इट इज..
भरपूर मोठा मित्रपरिवार गोळा करणं, माणसं जोडणं हे मी आईकडून शिकले असले तरी मैत्री कशी असावी याचे धडे मी नक्कीच तुमच्याकडूनच घेतले. मैत्री मोकळी ढाकळी असावी, ती बंधनकारक नसावी. एक चांगला मित्र आपली मतं दुसऱ्यावर लादत तर नाहीच, उलट आपल्या मित्राच्या मतांचा आदर करतो. मला आठवतंय, मी सात-आठ वर्षांची असताना एकदा आपल्याकडे बाबूकाका तुमचा अगदी कॉलेजपासूनचा मित्र (सुहास लिमये) आला होता. तुमची आणि त्याची कुठल्या तरी विषयावर तात्त्विक चर्चा सुरू झाली. बघता बघता चर्चेचं रूपांतर वादविवादात होऊ लागलं. दोघांचे आवाज वाढत गेले. हातवारे करून तुम्ही एकमेकांना आपलं मत पटवायचा प्रयत्न करत होतात आणि दोघेही काही केल्या आपला मुद्दा सोडायला तयार नव्हतात. त्या दिवशी बाबूकाका आपल्या घरून गेल्यावर मला वाटलं, झालं, आता काही तो परत आपल्याकडे येत नाही. पण दोनच दिवसांत परत बाबूकाका दारात हजर. बाबा, तेव्हा तुम्ही जे बोललात ना ते मला आजही आठवतंय. ‘‘बघितलंस ऋचा, मैत्री ही अशी असावी. मित्र बनायला एकमेकांचं प्रत्येक मत प्रत्येकालाच पटावं लागतंच असं नाही. तात्त्विक मतभेद मैत्रीच्या आड कधीच येत नाहीत. एकदा सूर जुळले तर छोटे-मोठे मतभेद ती मैत्री कधीच बेसूर करू शकत नाहीत.’’
नवीन ओळख झालेले लोक तुम्हाला नेहमी विचारायचे की, तुमची मुलं तुमच्यासारखं लिहीत नाहीत का हो? खरं तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं होतं, ‘हो, नाही लिहीत ती.’ पण तुम्ही कधी ते उत्तर देऊन आम्हाला वाईट वाटायला लावलं नाहीत. तुम्ही नेहमी म्हणायचात की, ‘‘माझ्या मुलांनी त्यांना आवडणारी क्षेत्रं निवडली आहेत.’’ माझ्याबाबतीत तरी मी माझ्या आवडीचं क्षेत्र निवडण्यामध्येसुद्धा तुमचा खूप मोठा वाटा होता. दहावीला कितीही मार्क मिळाले तरी ‘आर्ट्स’ घेणार हे मी आठवीपासून घोकत होते. आणि दहावीला खरंच ९१ टक्के मार्क मिळाल्यावरसुद्धा माझा तो निर्णय मी कायम ठेवला. तेव्हा आपल्या नातेवाईकांपासून ते रुपारेलमधल्या अ‍ॅडमिशन क्लार्कपर्यंत बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पण तुम्ही आणि आईने मला पूर्ण पाठिंबा दिलात. तुम्ही नेहमी म्हणायचात की, ‘‘आयुष्यात असा अभ्यासक्रम निवड की जे काम करताना प्रत्येक दिवस एक सोहळा असेल. रोज सकाळी उठल्यावर तो दिवस उत्साहाने जगावासा वाटेल. आपल्या कामातून हे सुंदर जग अधिक सुंदर आपण बनवायला मदत करतोय असं समाधान वाटेल.’’
पुढे मी माझ्या आवडीनुसार मानसशास्त्राचा अभ्यासक्रम निवडल्यावर तर तुम्ही खूपच खूष झाला होतात. तुम्ही नेहमी मला प्रोत्साहन द्यायचात, म्हणायचात, ‘‘आज आपल्या समाजाला मानसशास्त्रतज्ज्ञांची खूपच गरज आहे. तू अगदी बरोबर अभ्यासक्रम निवडला आहेस.’’ अभ्यासावरून आठवलं. लहान असताना परीक्षेसाठी अभ्यास घेणं, शाळेत पालक-टीचर मीटिंगला हजेरी लावणं, विविध स्पर्धाना घेऊन जाणं ही कामं आपल्या घरात सर्वस्वी आईची होती. तर तुमचं मोठं काम म्हणजे एखाद दिवशी शाळा बुडली की त्या दिवशी वर्गात झालेला अभ्यास आम्हाला शिकवणं -मग विषय कुठलाही असो- भूमितीच्या प्रमेयांपासून भूगोलातल्या टुंड्रा प्रदेशापर्यंत. एखाद्या इंग्रजी कवितेपासून अठराशे सत्तावनच्या महायुद्धापर्यंत. अशा वेळी तुमच्यातला हाडाचा शिक्षक आवर्जून जाणवायचा. तुम्ही जेव्हा शिकवायचात तेव्हा ते निव्वळ परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी नसायचं तर तो विषय, तो धडा समजून घेण्यासाठी. त्यातली गोडी वाढण्यासाठी असायचं आणि त्याचमुळे मग अशा एखाद्या तुम्ही शिकवलेल्या धडय़ाचा परीक्षेपूर्वी वेगळा असा अभ्यास कधी करावाच नाही लागायचा. पुढे मी जेव्हा यू.एस.मध्ये कॉलेजमध्ये शिकवायला लागले तेव्हा मुलांना मानसशास्त्र नुसतं शिकवण्यापेक्षा त्या विषयाची गोडी लावण्याचा माझा कायम प्रयत्न असे. म्हणूनच माझ्या एखाद्या विद्यार्थ्यांनं मला विचारलं, ‘‘इज धिस गोइंग टू बी ऑन द टेस्ट?’’ की मला नेहमी तुमची आठवण यायची आणि हसू यायचं.
नाटक ही तुमची आणि माझी कॉमन आवड. आवड म्हणजे काय थोडय़ा प्रमाणात वेडच! नाटक थोडंफार समजायला लागल्यापासून ते अगदी यू.एस.हून केलेल्या प्रत्येक भारत ट्रीपमध्ये आपण नाटक बघायचो. इतकंच काय पण तुम्ही इकडे आलात की बोस्टनमध्ये पण ‘शेक्सस्पीअर ऑन द कॉमन’ (शेक्सस्पीअरच्या नाटकाचे खुल्या मैदानातले प्रयोग) बघायला आपण जायचो आणि नुसतं नाटक बघून झालं की तो अनुभव संपायचा नाही. तर मग घरी येऊन त्यावर चर्चा. तुम्ही तुमची परखड मतं नेहमीच मांडायचात. केवळ एखादं नाटक खूप गाजत असलं म्हणजे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, असा आपल्या घरी कधीच नियम नव्हता! किंबहुना अगदी वयाच्या १४/१५व्या वर्षांपासून आम्हाला आमची मतं मांडायचा अधिकार आणि स्वातंत्र्य होतं. पण त्याचबरोबर एखादी कलाकृती जर मनाला भावली. मग ती नाटक असो, एखादं चित्र असो किंवा एखादं पुस्तक असो, तर मात्र त्याचं मनापासून भरभरून कौतुक करताना हात आखडता नाही घ्यायचा. एकाच वेळी रसिक आणि समीक्षकाच्या नजरेतून एखादी कलाकृती कशी न्याहाळायची ते तुम्ही शिकवलंत बाबा!
अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट मी तुमच्याकडून शिकले बाबा, ती म्हणजे प्रवास कसा करायचा. आम्ही म्हणजे मी आणि दादा लहान असताना आपण भारतभर हिंडलो, फिरलो. कुठलीही ट्रिप ठरवताना मग ते ठिकाण गोवा असो किंवा ओरिसा असो किंवा सिंगापूर असो, सगळं प्लानिंग तुम्ही करायचात. तेव्हा तर इंटरनेटची सोय पण नव्हती. तर लायब्ररीमध्ये जाऊन, संशोधन करून, नोट्स काढून तुम्ही प्लानिंग करायचात. ट्रिपच्या महिना दोन महिना आधीपासूनच तुमचा अभ्यास सुरू व्हायचा. आई म्हणायची पण, ‘‘अगं, बाबांना विचार जेवायला येतायत की आज बँकॉकच्या पटाया बीचवरच जेवणार आहेत!’’
तुमच्या या नियोजनाचा खूप फायदा व्हायचा. प्रत्येक स्थळ जवळून बघितल जायचं. नुसतं एका जागेला भेट देऊन आलो असं न वाटता तिथला इतिहास, तिथले लोक, त्यांचं जीवन खूप जवळून बघितल्यासारखं वाटायचं. भारतातसुद्धा किती वैविध्य आहे ते अनुभवायला मिळालं. इंटरनेट नसताना, युरोपातला प्रत्येक देशात स्वतंत्र चलन, स्वतंत्र व्हिसा लागत असताना तुम्ही आणि आईने स्वत: प्लान करून १० देशांची ट्रिप केलीत याचं कौतुक मला कायमच आहे!! आपल्या घरातल्या या अशा प्रवास करण्याच्या सवयीतून नवीन ठिकाणी न घाबरता, बेधडकपणे जायचा आत्मविश्वास मनात आपोआप तयार होत गेला आणि उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला जायचं मी ठरवलं तेव्हा त्याचा नक्कीच खूप फायदा झाला. बाबा, आपल्या घरात आम्ही मोठं होत असताना तुम्ही आणि आईने माझे आणि दादाचे खूप लाड केलेत आणि खूप कौतुक केलंत. पण त्याचबरोबर शिस्त आणि नियम यांनाही तितकंच महत्त्व दिलंत. लाड करणं आणि लाडावून ठेवणं यातला समतोल तुम्हा दोघांना छान साधता आला होता. आईने एकदा पूर्वी मला सांगितलं होतं की, दादाच्या जन्मानंतर तुम्ही आईला म्हणाला होतात की, ‘‘आपल्या मुलांना आपण असं बालपण द्यायचं की त्यांना मोठं झाल्यावर त्यांच्या बालपणाकडे मागे वळून बघावंसं वाटलं पाहिजे.’’ खरं सांगू बाबा, मी अनेक वेळा माझ्या बालपणाकडे नुसतं मागे वळून बघत नाही तर मनाने बरेच वेळा तिथे जाते, फेरफटका मारते आणि त्या तेव्हाच्या आठवणीत खूप खूप रमते. आणि मग ‘असंच बालपण आम्हाला आमच्या मुलींना कसं देता येईल याचा सतत विचार करते!!’ आज या ‘फादर्स डे’च्या निमित्तानं मी ‘त्या’ भूतकाळात पोचणार आहे. मला तिकडे भेटायला याल ना?
तुमची ऋचा

ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

ruchalondhe@gmail.com