परिसरातली घाण खाऊन पर्यावरण स्वच्छ राखणाऱ्या मोठा क्षत्रबलाक या दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्याच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांकरिता संशोधक आणि पर्यावरण-अध्यापक पौर्णिमादेवी बर्मन यांना यंदाचा ‘ग्रीन ऑस्कर’ पुरस्कार मिळाला आहे. स्त्रिया आणि पर्यावरण यांच्यातल्या नात्याचा हा गौरव आहे. निसर्गाचं, परिसंस्थेचं आरोग्य टिकलं तरच आपलं अस्तित्व टिकू शकेल, हा विश्वास पौर्णिमादेवींनी आसाममधील स्त्रियांच्या मनात निर्माण केला आहे. या पुरस्कारामुळे २२ मेचा जागतिक जैवविविधता दिन आणि ५ जूनचा जागतिक पर्यावरण दिन हे दोन्ही दिवस भारतासाठी या वर्षी अर्थपूर्ण ठरले आहेत.

आसाममधल्या प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ आणि वन्यजीव आणि संवर्धन-जीवशास्त्राच्या अभ्यासक पौर्णिमादेवी बर्मन यांना ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून ओळखलं जाणारं प्रतिष्ठेचं ‘व्हीटले अ‍ॅवार्ड’ नुकतंच मिळालं आहे. जगभरातल्या ६६ देशांमधल्या १६६ संशोधकांमधून बर्मन यांची निवड झाली आहे. निसर्गसंवर्धनासाठी भरीव आणि दीर्घजीवी योगदान देणाऱ्या विकसनशील देशांमधल्या एका व्यक्तीला दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो. ‘व्हीटले फंड फॉर नेचर’तर्फे दिला जाणारा हा पुरस्कार या वर्षी मोठा क्षत्रबलाक (Greater Adjutant Stork) या दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्याच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांकरिता पौर्णिमादेवी बर्मन यांना मिळाला आहे. या पुरस्कारामुळे २२ मेचा जागतिक जैवविविधता दिन आणि ५ जूनचा जागतिक पर्यावरण दिन हे दोन्ही दिवस भारतासाठी या वर्षी अर्थपूर्ण ठरले आहेत.

prasad oak shared his first national award memories
“राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण, दुसरीकडे माझं घर विकलं”, प्रसाद ओकने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाला, “बँकेचे हप्ते, कर्ज…”
90s filmfare award show viral video
90’s चे सिनेस्टार! नव्वदच्या दशकातील फिल्मफेअर पुरस्काराचा VIDEO व्हायरल, नेटकरी म्हणाले, “हा बॉलीवूडचा सुवर्णकाळ..”
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी

पौर्णिमादेवी बर्मन यांना मिळालेला हा पुरस्कार इतरही अनेक कारणांमुळे विशेष ठरला आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१५च्या अहवालानुसार पर्यावरणीय गुन्ह्य़ांच्या बाबतीत ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आसाम पहिल्या क्रमांकावर आहे आणि या संदर्भात संपूर्ण देशातल्या पहिल्या आठ राज्यांमध्येही आसामचा समावेश आहे. (राजस्थान पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे). मुख्यत: वन कायदा, १९२७ आणि वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ खालीच आसाममधल्या या गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. या पाश्र्वभूमीवर आसाममधल्या मोठय़ा क्षत्रबलाकांच्या या संवर्धन-प्रकल्पाचं यश आणखी महत्त्वाचं आहे.

‘अरण्यक’ या गुवाहाटीस्थित स्वयंसेवी संस्थेमध्ये संशोधक आणि पर्यावरण-अध्यापक म्हणून पौर्णिमादेवी बर्मन गेली अनेक र्वष काम करत आहेत. मुळात त्या प्राणिशास्त्र आणि संवर्धनशास्त्राच्या अभ्यासक आहेत. ‘अरण्यक’ ही संस्था पर्यावरणाच्या क्षेत्रात १९८९ पासून काम करते आहे. दिब्रु- सईखोवा पक्षी अभयारण्यातल्या बदकाची एक प्रजात तस्करांना बळी पडून नामशेष होण्याच्या मार्गावर होती. या बदकाला संरक्षण देण्यासाठी दिब्रुगडमधल्या ‘अरण्यक’ या नावानं एकत्र आलेल्या एका उत्साही निसर्गप्रेमी गटानं न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. ही लढाई जिंकली आणि या गटानं आणखी हिरिरीनं कामाला सुरुवात केली. तेव्हापासून ‘अरण्यक’नं मागे वळून पाहिलेलं नाही. संशोधनावर आधारित जैववैविध्य आणि वन्यजीव संवर्धन करण्यावर ‘अरण्यक’चा मुख्य भर आहे. नैसर्गिक साधनसंपदा आणि स्थानिक नागरिकांची उपजीविका यांचं अतूट नातं लक्षात घेऊन स्थानिक लोकसमूहांमध्ये या संपदेविषयी जागरूकता निर्माण करणं आणि त्यांच्या सहभागातून संरक्षण-संवर्धनाचे प्रकल्प राबवणं, अशा पद्धतीनं ही संस्था काम करते आहे. मोठय़ा क्षत्रबलाकांच्या संवर्धनाचा हा प्रकल्प पौर्णिमादेवी बर्मन यांच्या पुढाकारानं जुलै २००९ मध्ये सुरू झाला. मोठा क्षत्रबलाक हा एके काळी संपूर्ण आग्नेय आशियाई देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळणारा पक्षी होता. भारतासह नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, कंबोडिया आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये त्यांच्या पारंपरिक वसाहती होत्या. आता मात्र फक्त कंबोडिया आणि भारतात आसाम राज्यात त्याचं अस्तित्व उरलं आहे. पाणथळ जमिनी आणि कचरा गाडला जाणाऱ्या जमिनींच्या आसपासच्या झाडांवर हा पक्षी घरटी करतो. परिसरातली घाण खाऊन पर्यावरण स्वच्छ राखणारा पक्षी म्हणून क्षत्रबलाक ओळखला जातो. पण अधिवासांचा ऱ्हास झाल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये त्याची संख्या घटत गेली आहे. बलाकाच्या एकूण २० प्रजातींपैकी मोठा क्षत्रबलाक हा सर्वात धोक्यात आलेला पक्षी आहे. शिवाय या पक्ष्याचा अभ्यासही कमी झालेला असल्यामुळे तो दुर्मीळ होण्याची शक्यता अधिक आहे. भारत आणि कंबोडिया या दोन्ही देशांत मिळून मोठय़ा क्षत्रबलाकांची संख्या सध्या जेमतेम एक हजारच्या घरात आहे आणि त्यांपैकी ऐंशी टक्के क्षत्रबलाक आसामच्या ब्रह्मपुत्रा खोऱ्यात आढळतात. यातलेही पन्नास टक्के पक्षी कामरूप या लहान जिल्ह्य़ातल्या दोन-तीन गावांत तग धरून आहेत.

क्षत्रबलाकच्या संवर्धनाचं काम कामरूप जिल्ह्य़ातल्या ज्या दादरा, पचारिया आणि हिंगीमरी या गावांमध्ये पौर्णिमा देवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलं तिथे गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार हे पक्षी १८ वर्षांपासून घरटी करताहेत. क्षत्रबलाकाची ही घरटी एकटी-दुकटी नसतात. घरटय़ांच्या अनेक लहान लहान वसाहती म्हणजे समूह असतात. पण काही वर्षांपासून यातल्या बऱ्याच वसाहती नाहीशा झाल्याचं आणि पक्षी दिसण्याचं प्रमाण कमी झाल्याचं पक्षीनिरीक्षक सांगत होते. घरटी असलेली ही झाडं उपजीविकेसाठी तोडण्याचं प्रमाणही काही वर्षांपासून वाढलं होतं. शिवाय वसाहती बांधणाऱ्या या पक्ष्यांची घरटी सामान्यत: खासगी मालकीच्या झाडांवर असल्यामुळे आसाम राज्याच्या वनखात्याकडे मोठय़ा क्षत्रबलाकाच्या संवर्धनाच्या दृष्टीनं विशेष माहिती नव्हती. संरक्षक वनक्षेत्राबाहेर वसाहती करणारा, स्थानिक स्तरावर ‘हारगिला’ नावानं ओळखला जाणारा हा पक्षी त्यामुळे आणखी दुर्लक्षित होता.

ही आव्हानं लक्षात घेऊन पौर्णिमादेवींनी क्षत्रबलाकाच्या संवर्धनाचं काम सुरू केलं. या पक्ष्याविषयी माहिती गोळा करणं, त्याच्या अधिवासांचं निरीक्षण करणं, पक्ष्यांची संख्या कमी होण्याची कारणं निश्चित करणं, गावकऱ्यांच्या भेटी घेणं, पक्ष्यांच्या वसाहतींचं घरटी बांधण्याच्या काळात सातत्यानं सर्वेक्षण करणं, शालेय विद्यार्थ्यांपासून स्थानिक स्त्रिया आणि पुरुष अशा सगळ्यांनाच पक्ष्याच्या संवर्धनाबाबत जागरूक करणं, सरकारी यंत्रणेला संवर्धन प्रकल्पाची माहिती देऊन शासकीय अधिकाऱ्यांना कामात सहभागी करून घेणं, या संवर्धनप्रकल्पाद्वारा सुरू असलेल्या प्रयत्नांना माध्यमांमध्ये प्रसिद्धी देणं आणि त्या योगे संवर्धनाच्या या कामाला अधिकाधिक घटकांचा पाठिंबा आणि सहभाग मिळवणं, या पद्धतीनं त्यांची टीम काम करत गेली.

क्षत्रबलाकाविषयी स्थानिक लोक अलिप्त नसले तरी इंधनासाठी, घरासाठी किंवा इतरही काही गरजांसाठी या पक्ष्यांची घरटी असलेली झाडं काही वेळा तोडली जात होती. शिवाय घरटय़ातून पडलेली पिल्लं दगावण्याचं प्रमाणही जास्त होतं. जखमी अवस्थेतली ही पिल्लं उपासमारीनं मरून तरी जायची किंवा रस्त्यावरची भटकी कुत्री त्यांचा फडशा पाडायची. पण काझीरंगातल्या एकशिंगी गेंडय़ाप्रमाणेच हा पक्षी आसामचं, कामरूप जिल्ह्य़ाचं आणि विशेषत: त्या गावाचं भूषण असल्याची जाणीव ‘अरण्यक’ टीमच्या सततच्या गाठीभेटी आणि बैठकांमुळे गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली. या पक्ष्याचं परिसंस्थेतलं महत्त्व आणि त्याचं संवर्धन करण्याची आवश्यकता त्यांना समजावून सांगितली गेली. हे महत्त्व अधोरेखित करणारी पोस्टर्स आणि इतर शैक्षणिक साहित्यही गावात वाटण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या पदयात्रा काढून प्रत्येक घटकापर्यंत संवर्धन मोहिमेविषयी माहिती पोहोचवली गेली. शासकीय अधिकाऱ्यांना प्रकल्पात समाविष्ट करून घेतल्यामुळे क्षत्रबलाकाची घरटी असलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी त्यांनीही स्थानिक लोकांना मार्गदर्शन केलं. या पक्ष्यांचा अधिवास असणाऱ्या या भागातल्या पाणथळ जमिनी वाचविण्याची आवश्यकता स्थानिक गावकऱ्यांना समजावून सांगण्याचं काम पौर्णिमा देवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. या जमिनी अतिक्रमणापासून वाचवाव्यात असं आवाहन शासकीय यंत्रणेला करण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.

जखमी पिल्लांवर उपचार करून त्यांना परत निसर्गात मुक्त सोडण्यासाठी पौर्णिमादेवी आणि ‘अरण्यक’ टीमनं मार्गदर्शन आणि मदतही केली. प्रख्यात आसामी चित्रपट कलावंतांना क्षत्रबलाकांची घरटी पाहण्यासाठी आमंत्रित केल्यामुळे गावकऱ्यांच्या मनातला आपल्या गावाविषयीचा अभिमान वाढायला मदत झाली. शिवाय ज्या झाडांवर या पक्ष्यांची घरटी होती, त्या झाडांच्या मालकांचे सत्कार केल्यामुळे त्यांच्या मनात त्या झाडांविषयी आणि पक्ष्यांविषयी मालकी हक्काची आणि आपुलकीची भावना निर्माण झाली. या पक्ष्यामुळे जागतिक नकाशावर आपल्या गावाचं नाव ठळक झालं आहे, हा अभिमान आणि आनंद या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे सगळ्या गावात पसरला.

विशेषत: गावातल्या स्त्रियांना हाताशी धरून क्षत्रबलाकांच्या मोहिमेला गती देण्याचं काम पौर्णिमादेवी यांनी केलं. इंधन असो किंवा उपजीविकेची साधनं असोत, स्त्रियांचा नैसर्गिक स्रोतांशी जास्त निकटचा संबंध असतो, हे लक्षात घेऊन त्यांनी या पक्ष्यांची घरटी असणारी झाडं वाचविण्याबाबत स्त्रियांना जागरूक केलं. हे पक्षी, त्यांची घरटी सांभाळणारी झाडं आणि सभोवतालच्या पाणथळ जमिनी यांचं त्या परिसंस्थेतलं महत्त्व त्यांना समजावून सांगण्याचं कामही त्यांनी केलं. परिसंस्थेचं आरोग्य टिकलं तरच आपलं अस्तित्व टिकू शकेल, हा विश्वास त्यांनी या स्त्रियांच्या मनात निर्माण केला. त्यामुळे आपल्या घरातले सदस्य असावेत, अशी या पक्ष्यांविषयीची माया गावातल्या सगळ्याच स्त्रियांच्या मनात उमटली. ही भावना हळूहळू इतकी गडद झाली की ‘गमोसा’ या आसामी स्त्रियांच्या पारंपरिक वस्त्रावरही क्षत्रबलाकाची आकृती विणायला या स्त्रियांनी सुरुवात केली. गावात भेटीला येणाऱ्या पाहुण्यांना ही वस्त्रं आवडली. आता क्षत्रबलाकाची आकृती असलेल्या ‘गमोसा’ला हळूहळू बाजारपेठ मिळू लागली आहे आणि त्याद्वारे या स्त्रियांना लहानसा रोजगारही उपलब्ध होतो आहे.

धोक्यात आलेल्या आणि त्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या क्षत्रबलाकांच्या संवर्धनाचा हा प्रकल्प पौर्णिमादेवी बर्मन यांच्या समन्वयाखाली २००९ ते २०११ अशी दोन र्वष चालू होता. ‘अति परिचयात् अवज्ञा’ या उक्तीप्रमाणे गावात नेहमी मुक्कामाला असणाऱ्या क्षत्रबलाकांकडे पूर्वी झालेलं स्थानिक लोकांचं दुर्लक्ष या कालावधीत पौर्णिमादेवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक आणि जाणत्या प्रयत्नांमुळे पुन्हा वेधलं गेलं. पक्ष्यांच्या अधिवासाला आणि घरटय़ांना संरक्षण मिळाल्यामुळे बलाकांची ही जमात नामशेष होण्यापासून वाचली आहे. मुख्य म्हणजे या पक्ष्यांची घरटी असलेल्या वृक्षांबाबत त्यांच्या मालकांच्या मनातली मालकीहक्काची जाणीव जागविणं आणि ती कायम ठेवणं हा या संपूर्ण प्रकल्पातला कळीचा मुद्दा होता. गावातल्या स्त्रियांशी बोलून, त्यांना जागरूक करून ही जाणीव तर त्यांनी दृढ केली आहेच पण स्त्रिया आणि पर्यावरण यांच्यातलं विरळ झालेलं पारंपरिक नातंही पुन्हा एकदा घट्ट  करण्याचं काम त्यांनी या प्रकल्पाद्वारे केलं आहे.

त्यांना मिळालेला ‘ग्रीन ऑस्कर’ पुरस्कार हा स्त्रिया आणि पर्यावरण यांच्यातल्या या नात्याचा गौरव आहे. शिवाय शासनाच्या कार्यक्रमपत्रिकेवर नसणारा या पक्ष्यांच्या संवर्धनाचा विषयही पौर्णिमादेवी यांनी या प्रकल्पाच्या निमित्तानं आसाम सरकारसमोर मांडला आहे आणि शासकीय यंत्रणेला त्याच्याकडे अग्रक्रमानं पाहायला लावलं आहे. शिवाय एरवी पर्यावरणाच्या प्रश्नांकडे विशेष गांभीर्यानं न पाहणाऱ्या माध्यमांना, ठळक प्रसिद्धी देऊन क्षत्रबलाक संवर्धनाला समाजाच्या सगळ्या स्तरांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी पेलायला लावली आहे. स्थानिक नागरिकांचा सहभाग, शासनाचा पाठिंबा आणि संशोधनदृष्टी आणि कार्यकर्ते यांचं उत्तम पाठबळ असणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचा समन्वय हे तीनही घटक एकत्र आले तर निसर्गसंवर्धनाला गती मिळू शकते आणि ते शाश्वत टिकूही शकतं, हे पौर्णिमादेवी बर्मन यांना मिळालेल्या ग्रीन ऑस्कर पुरस्कारानं सिद्ध झालं आहे. या पुरस्कारानं देशात इतर ठिकाणी चालू असलेल्या संवर्धन प्रयत्नांना प्रेरणा मिळेल आणि शासनाला आपल्या निसर्गसंवर्धनाच्या बाबतीतल्या भूमिकेची जाणीव होईल अशी आशा आहे.

वर्षां गजेंद्रगडकर 

varshapune19@gmail.com