संगीता बनगीनवार मूळच्या विदर्भातल्या, मात्र गेली २८ वर्षे पुण्यात राहात आहेत. शालेय शिक्षण विदर्भात झाले. नंतर बी.एस्सी. गणित विषय घेऊन केलं व एम.एस्सी. आयआयटी मुंबईमधून केलं. त्यानंतर ६ र्वष इंजिनीअिरग कॉलेजमध्ये गणित विषयाच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर ८-९ र्वष आयटी क्षेत्रात काम केलं. २००८ पासून त्यांनी सामाजिक संस्थेत काम सुरू केलं असून गेल्या ८ वर्षांपासून ‘स्रोत’ या संस्थेच्या माध्यमातूनही त्या काम करीत आहेत. साडेपाच वर्षांपूर्वी निमिषा दत्तक प्रक्रियेतून त्यांच्या आयुष्यात आली आणि त्यानंतर पालकत्व आणि शिक्षण याचा अभ्यास सुरू झाला, त्यातूनच आता मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन आणि मुलांना समुपदेशन करण्याचे काम त्या करीत आहेत.

पालकत्वाचं आणखी एक प्रगल्भ क्षितिज म्हणजे दत्तक पालकत्व. एकही मूल नाही म्हणून मूल दत्तक घेणारे जसे पालक आहेत तसे एक मूल असूनही दुसरं दत्तक घेणारेही अनेक जण आहेत. परंतु या पालकत्वालाही विविध आयाम आहेत, विविध पदर आहेत. काही कडू तर काही गोड अनुभव आहेत. त्या साऱ्यांचा ऊहापोह करणारं हे सदर दर पंधरवडय़ाला.

निमिषा, माझी सहा वर्षांची लेक जी दत्तक प्रक्रियेतून माझ्या आयुष्यात आली. गेल्या साडेपाच वर्षांचा तिचा हा सहवास. खूप काही भरभरून देणारा. प्रत्येक क्षण सार्थकी लावण्याची प्रेरणा देणारा! मी दत्तक प्रक्रियेतून पालक झालेय हे ती घरी आली त्या क्षणापासून मला माहीत होतं, आहे आणि म्हणूनच या वेगळ्या पालकत्वाचे जे काही अनुभव आहेत ते मी मनापासून जगण्याचा प्रयत्न करते आहे. या संपूर्ण साडेपाच वर्षांच्या प्रवासात निमिषाच्या निमित्ताने वेगवेगळे पालक आणि मुलं संपर्कात आली जी या प्रक्रियेचा भाग आहेत. त्याचं जगणं, अनुभव हेच माझ्या या सदराच्या लेखनाचे प्रेरणास्रोत आहेत, काही आदर्शवत तर काही अस्वस्थ करणारे!

काही पालक आपल्या या पाल्याला अगदी भरभरून प्रेम देत आहेत, आपली जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळत आहेत तर काहींच्या बाबतीत त्या वेळची गरज म्हणून बाळ घरी येतं, परंतु नंतर सगळीच गणिते बिघडलेली दिसतात. काहींच्या बाबतीत सगळं छान चालू असतं पण मधेच एखादा कठीण काळ येतो, सत्वपरीक्षेचाच काळ जणू, पण त्यातूनही त्यांचं नातं घट्ट होत जातं. खूप काही आहे ‘दत्तक’ या शब्दात.. कायदा आहे, नियम आहेत, नाती आहेत, नात्यांची सत्त्वपरीक्षा आहे, पण त्याही पलीकडे आहे ते त्यातून पुरून उरणारं माणूसपण! कधी कसाला उतरवणारं तर कधी पराभूत करणारं! त्याच अनुभवांचं जगणं म्हणजे हे सदर..

दत्तक प्रक्रियेतील बाळ म्हणजे कोण?

अनेकदा, जन्मदात्रीला नको असलेली गर्भधारणा झाली की बाळाला जन्म देऊन त्यातून सुटका मिळण्याची ती आणि तिचे पालक जणू वाटच बघत असतात. कारण कुमारी मातेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन घृणास्पद आहे. अनेकदा ते बाळ जन्माला आलं की  कचराकुंडीत किंवा तत्सम ठिकाणी टाकून तरी दिलं जातं किंवा अनाथपणाचा ठप्पा लेवून अनाथाश्रमात पाठवलं जातं. इतर बोटांवर मोजता येतील एवढय़ा मुलांत मुलगी झाली म्हणून, काही व्यंग आहे म्हणून किंवा आईचा मृत्यू झाला म्हणून त्या बाळाला अनाथाश्रमात आणलं गेलेलं असतं. यानंतर कमीत कमी ६० दिवस प्रत्येक मूल हे अनाथाश्रमात असतं. मग त्यातले काही दत्तक प्रक्रियेद्वारा अनेकांच्या घरी जातात.

दत्तक प्रक्रियेतून पालक होऊ इच्छिणारे कोण?

लग्नानंतर दोन ते तीन वर्षांत मूल झालं नाही की समाजाची त्या स्त्रीकडे बघण्याची दृष्टी बदलते. मग सुरू होतात वैद्यकीय उपचार. जवळपास ८० टक्के पालक अनेक वर्षे वैद्यकीय उपचार घेऊन शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा खचून नंतर दत्तक प्रक्रियेसाठी येतात. १८-१९ टक्के पालक स्वखुषीने, फारसे वैद्यकीय उपचार न करता आलेले असतात तर १-२ टक्के एकल पालक दत्तक प्रक्रियेसाठी येतात. अशा सगळ्या गुंतागुंतीतून जेव्हा बाळ घरी येतं, तेव्हा ते कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालं असं त्या कुटुंबाला वाटतं. त्या बाळाला जसे आई-बाबा आणि घर मिळतं त्याहीपेक्षा महत्त्वाचं ठरतं ते त्या बाळामुळे त्याचं आई-बाबा होणं आणि घराला घरपण येणं!

माझ्या स्वत:च्या काही अनुभवांना सोबत घेऊन प्रवासाला सुरुवात करू या..

निमिषा घरी आली तेव्हा फक्त पाच महिन्यांची होती. आज ती रोज नवीन खेळ, नवीन करामती करत मोठी होतेय. रोजच्या गमतीजमतींसोबत कधीतरी विचार करायला लावेल असे प्रश्न किंवा कधी कधी स्वत:ची मतं मांडते. तिची प्रगल्भता बघून भारावून जायला होतं. ती चार वर्षांची असतानाची गोष्ट. एकदा चिऊ ताई आणि तिच्या पिल्लाची ‘तूच का गं माझी आई’ गोष्ट सांगत होते. गोष्टीमध्ये चिमणीचं पिल्लू अंडय़ातून बाहेर येणार असतं, चिमणीला वाटतं की पिल्लाला भूक लागेल आपण पिल्लासाठी काहीतरी खायला घेऊन येऊ या, ती उडून जाते आणि तितक्यात पिल्लू बाहेर येतं. आपली आई कुठे दिसत नाही म्हणून ते विचार करतं, आपणच शोधू या आईला, उडायला तर जमत नाही, निघतं आपलं चालत चालत, वाटेत जे कुणी भेटेल, कोंबडी, गाय, मांजर, कार, विमान, जहाज..सगळ्यांना विचारतं, ‘‘तूच का गं माझी आई?’’ पण आई काही भेटत नाही, शेवटी एका क्रेनवर ते चढतं तर क्रेन त्या पिल्लाला उचलून अलगद घरटय़ात ठेवतं, तितक्यात त्याची आई येते आणि ती विचारते, ‘‘पिल्लू माहीत आहे मी कोण आहे ते?’’ पिल्लू म्हणतं.. ‘‘तू कोंबडी नाही, गाय नाही, कार नाही, मांजर नाही, विमान नाही, तूच माझी आई.’’ हे ऐकून निमिषा मला म्हणाली, ‘‘आई मी पण अशीच अंडय़ातून बाहेर आले, मग तू मला भेटलीस तेव्हा मी तुला म्हणाले, ‘‘तूच माझी आई’’ त्यावर मी तिला म्हटलं, ‘‘अगं, माणसाचं पिल्लू तर आईच्या पोटातूून बाहेर येतं आणि ते जन्माला येतं तेव्हा पिल्लू असतं.’’ तर मला म्हणाली, ‘‘तसं नाही गं, मी ज्या संस्थेमध्ये होते ना ते अंडं, तू तिथे आलीस आणि मग मी त्या अंडय़ामधून बाहेर आले आणि मी तुला म्हणाले, ‘‘तूच माझी आई.’’ आजही हे लिहिताना अंगावर रोमांचं उभे राहतात आणि डोळ्यांत पाणी येतं..

ती दोन-अडीच वर्षांची असल्यापासून मला विचारते, ‘‘आई मला बाबा का नाहीत?’’ मी लग्न केलेलं नसल्यामुळे साहजिकच मी तिला नेहमी उत्तर देत आले, ‘‘निमिषा आईनं लग्न केलं नाही म्हणून तुला बाबा नाहीत.’’ पाच वर्षांची असताना मला एक दिवस ती म्हणाली, ‘‘आई तू म्हणतेस ना मुलगा आणि मुलगी मोठे झाल्यावर लग्न करतात तेव्हा एक मूल जन्माला येतं, म्हणजे मी ज्या आईच्या पोटातून आले तिनं लग्न केलं असणार ना? म्हणजे जसं आपल्याला हे माहीत नाही की माझी ती आई कुठे आहे तसंच माझे बाबा पण कुठे आहेत ते आपल्याला माहीत नाही, पण मला बाबा आहेत.’’ त्या दिवशी मला जाणीव झाली की आपण विचार करतो तो किती अपूर्ण आहेत, मी तिची अक्षरश: माफी मागून रडले त्या दिवशी आणि म्हणाले, ‘‘बाळा मला नाही गं लक्षात आलं हे, खरंच की तुला बाबा आहेत, फक्त आपल्याला माहीत नाही की ते कुठे आहेत.’’

ती निश्चिंत झाली आणि माझं ते पिल्लू कुशीत येऊन शांतचित्तानं झोपलं!

असे अनुभव आम्हा दोघींना मोठं तर करतातच शिवाय आमचं नातं अधिक घट्ट करतात. असेच खूप सारे वेगवेगळे पालक आणि मुलं ज्यांनी दत्तक पालकत्वाचा हा प्रवास अनुभवला आहे, अनुभवत आहेत, त्यांना घेऊन तुमच्याशी संवाद साधायचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. या प्रवासात मी एक आई म्हणून नक्कीच समृद्ध होणार आहे, तुम्ही सगळे वाचक या प्रवासात कधी अंतर्मुख व्हाल, कधी हतबल तर कधी नाराजही.. तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्कीच आवडेल मला!

संगीता बनगीनवार sangeeta@sroat.org