आपले आईबाबा, भावंडे, मुलंबाळं, जिवलग या जिवाभावाच्या माणसांबद्दलही आपल्याला आदर, माया, कृतज्ञता सर्व काही वाटतं, पण का कुणास ठाऊक ते बोलून दाखवायला मात्र आपण कचरतो, कदाचित इथेही आपण त्यांना गृहीतच धरतो बहुतेक. तोंडभर हसून, यांच्यापैकी प्रत्येकाला प्रेमाने जवळ घेऊन ‘थँक्स’ दिले तर कौतुक, आपुलकी सगळं सगळं त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट उमटलेलं दिसेल तुम्हाला. त्यांच्याशिवायही चराचरातील इतर अनेक महत्त्वाचे घटक, वस्तू, गोष्टी आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य समृद्ध केलं आहे. त्यांच्या अस्तित्वाबद्दलही आभार मानायला हवेत, कृतज्ञ असायलाच हवं..

नुकताच, २४ नोव्हेंबर हा दिवस ‘थँक्स गिव्हिंग डे’ अर्थात ‘कृतज्ञता दिवस’ म्हणून साजरा झाला. तसं पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीसाठी ‘कृतज्ञता’ ही संकल्पना काही नवीन नाही, उगवत्या सूर्याला अध्र्य देऊन, त्या नैसर्गिक अक्षय्य ऊर्जास्रोताला नमन करणाऱ्या, ‘देवा अन्न दिलेस तू मज तुझे आभार मानू किती’ असा श्लोक म्हणत, पहिला घास तोंडात घालण्याआधी, चित्राहुती घालून जेवणाच्या ताटाभोवती रेंगाळणाऱ्या किडामुंग्यांच्या उदरभरणाची काळजी घेणाऱ्या, शेतीसाठी जमिनीला नांगर लावण्यापूर्वी मायधरित्रीची पूजा करणाऱ्या, मासेमारीला सुरुवात करण्याआधी समुद्राला नारळ अर्पण करणाऱ्या, बैलपोळा, नागपंचमी, वसुबारस अशा अनेक लहान-मोठय़ा सणांच्या निमित्ताने, आपल्या संपन्नतेसाठी झटणाऱ्या मुक्या जनावरांची आठवण ठेवणाऱ्या आणि दरवर्षी पितृपक्षात पितरांचे स्मरण ठेवून दानधर्म करणाऱ्या आपल्या पूर्वजांनी कृतज्ञतेचं महत्त्व नक्कीच जाणलं होतं. इतकंच नव्हे तर अशा पूर्वापार परंपरांतून, ‘कृतज्ञता’ या संकल्पनेला त्यांनी दिनचर्येत सामावून घेतलं असं म्हणायला हरकत नाही.

Earth Day History and importance in Marathi
Earth Day 2024 : जागतिक वसुंधरा दिनाची सुरुवात का आणि कधी झाली? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
Mary Kom, Olympic, Olympic team captain,
विश्लेषण : मेरी कोमने ऑलिम्पिक पथकप्रमुखपद का सोडले?
Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024
सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज
Aditya Thackeray
‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

अर्थात या ‘थँक्स गिव्हिंग’च्या पाश्चात्त्य संकल्पनेलासुद्धा ऐतिहासिक परंपरा लाभली आहे असं लक्षात येतं. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे १६२१ मध्ये प्लायमाऊथ वसाहती आणि वँम्पनॉग जमातीचे रहिवासी यांनी त्या वर्षीच्या सुगीच्या हंगामात एकत्र मेजवानीचा बेत केला होता. थँक्स गिव्हिंगच्या निमित्ताने साजरे झालेले हे पहिलेवाहिले ज्ञात ‘सेलिब्रेशन’ असावे. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे १८६३ मध्ये, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी २४ नोव्हेंबर हा दिवस ‘थँक्स गिव्हिंग नॅशनल हॉलिडे’ म्हणून जाहीर केला.

थोर कवी लेखक आणि विचारवंत जी.के. चेस्टरटन म्हणतात, ‘आय वूड मेंटेन दॅट थँक्स आर द हायेस्ट फॉर्म ऑफ थॉट अँड दॅट ग्रॅटीटय़ुड इज हॅप्पिनेस डबलड् बाय वंडर.’ जोपर्यंत हे विचार आपण प्रत्यक्ष कृतीत उतरवत नाही, तोपर्यंत त्या विचारांमधल्या भावना आपल्या मनापर्यंत पोहोचणारच नाहीत. म्हणजे आता हेच पाहा ना, आपल्याला मदत करणाऱ्या एखाद्या परोपकारी व्यक्तीला आपण न विसरता मनापासून ‘थँक्स’ दिले तर त्याला आनंद तर होईलच, शिवाय आणखी कोणाच्या तरी मदतीला धावून जाण्याची इच्छाही होईल. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याच्या आपल्या केवळ एका कृतीने, मदतीचा आणि आनंदाचा झरा दुपटीने पुढे वाहता राहील.

मला वाटतं, दुसऱ्याप्रति कृतज्ञ असणाऱ्या आणि तो व्यक्तही करणाऱ्या व्यक्ती इतरांपेक्षा जास्त आनंदी जीवन जगतात. राग, चिडचिड, निराशा, कंटाळा या नकारात्मक भावनांचा उद्रेक त्यांच्या बाबतीत तुलनेने कमी वेळा झालेला दिसतो. अपेक्षाभंग, एकटेपण त्यांना अभवानेच जाणवते. कारण माणसाचा आनंद दुसऱ्याला आनंदी पाहण्यातही आहे आणि मदत करणाऱ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूनआपल्याला तो सहज मिळवता येतो. थोडक्यात कृतज्ञ राहण्याची आपली इच्छा जितकी जास्त, तितका अधिक आनंद असं साधं-सोपं समीकरण आहे.

प्रत्यक्षात मात्र आपण एकमेकांना फार ‘गृहीत’ धरतो. अगदी सकाळी उठल्यापासून, रात्री झोपेपर्यंत आपण कोणासाठी किंवा कोणीतरी आपल्यासाठी काही ना काही करतच असतो. पण दिवसाकाठी ना आपण कोणाचे आभार मानत ना कोणी आपल्याला धन्यवाद देत. थोडक्यात सगळा मामला परस्परांना ‘गृहीत’ धरण्याचा. मग प्रश्न पडतो हे असं गृहीत धरणं कधी आणि कसं थांबणार? आपल्या मनात कृतज्ञतेसारख्या मृदू आणि ऋजू भावनेची जोपासना करायची तरी कशी? तर माझ्या मते सर्वात आधी दुसऱ्याला गृहीत धरण्याची आपली मानसिकता बदलायला हवी. आपलं कुटुंब, मित्र, देश, आपले स्वातंत्र्य या सर्वाबद्दल आपल्या मनात खूप आदर, कृतज्ञता असतेच पण या गोष्टींव्यतिरिक्त आसपासच्या, चराचरातील इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी, घटक, वस्तू आहेत ज्यांच्या अस्तित्वाबद्दलही आभार मानायला हवेत. निदान ते आपल्या आनंदी जगण्याचा भाग आहेत, हे तरी आपल्याला जाणवेल.

जन्मापासून आतापर्यंत आपल्या संपर्कात अनेक व्यक्ती येऊन जातात, फक्त आपले जन्मदातेच नाही तर असंख्य नातेवाईक, शेजारी, मित्र, परिचित, शाळासोबती, आजी-माजी शिक्षक, सहकारी यातल्या प्रत्येकाकडूनच आपण काहीना काही घेतलेले असते, विचार म्हणा, वस्तू म्हणा, स्तुती म्हणा, प्रेम, आदर, जिव्हाळा, कधी कधी टीकासुद्धा. पण याच लोकांमुळे आपण आपल्याही नकळत अनुभवसंपन्न होत असतो, आयुष्य जगायला शिकतो, यांच्यापैकीच कोणाच्या तरी सदिच्छा संकटकाळी आपले मनोबल वाढवत असतात, पण रोजच्या धबडग्यात आपल्याला यापैकी कोणाची साधी आठवण काढायलाही सवड मिळत नाही. आपल्या मनात या सर्वाबद्दल आत्मीयता, कृतज्ञता जरूर असते. फक्त आपण ती बोलून दाखवत नाही. मी म्हणते, जे आपल्या पोटात आहे ते ओठांवर यायला काय हरकत आहे? मी अगदी ठरवून मला आठवत असतील, नसतील त्या सर्वाना या ‘थँक्स गिव्हिंग डे’च्या निमित्ताने दरवर्षी ‘थँक्स’ देते.

आपले आईबाबा, भावंडे, मुलंबाळं या जिवाभावाच्या माणसांबद्दलही आपल्याला आदर, माया, कृतज्ञता सर्व काही वाटतं, पण का कुणास ठाऊक, ते बोलून दाखवायला मात्र आपण कचरतो, कदाचित इथेही आपण त्यांना गृहीतच धरतो बहुतेक, तोंडभर हसून, यांच्यापैकी प्रत्येकाला प्रेमाने जवळ घेऊन ‘थँक्स’ दिलेत तर कौतुक, आपुलकी सगळं सगळं त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट उमटलेलं दिसेल तुम्हाला. ‘थँक्स गिव्हिंग डे’ झाला असला  म्हणून काय झालं? थँक्स केव्हाही म्हणता येतं. अगदी केव्हाही. काहींचं म्हणणं असतं, आपल्या संस्कृतीत हे नाही. आपण कृतीतून व्यक्त करतो. बोलून दाखवत नाही. परंतु कृतीतून प्रत्येक वेळा आपल्या भावना तशाच्या तशा समोरच्या पर्यंत पोहोचतीलच असं नाही. म्हणूनच माणसंच नाहीत तर अवतीभवतीच्या सर्वच गोष्टींचे मनापासून आभार मानायला हवेत ज्यांनी आपल्याला समृद्ध आयुष्य दिलं त्या सर्वाचे.

अगदी फुलाचंच उदारहण घेऊ, कोरांटीपासून सूर्यफुलापर्यंत, खरं तर आपल्या नकळत्या वयात, रंगांची ओळख आपण फुलांकडे पाहूनच तर शिकतो. मला चांगलं आठवतंय, आपण शिशू वर्गात असताना मुळाक्षरांच्या तक्त्यात पिवळ्या रंगासाठी पिवळेधम्मक सूर्यफूल असायचे, लालचुटूक जास्वंदी असायची, तजेलदार गुलाबाचे फूल असायचे, हळूहळू आपलं वय वाढलं पण या फुलांनी मूकपणे आपल्याला साथ देणं काही सोडलं नाही. अजूनही जाता येता प्राजक्ताच्या किंवा मोगऱ्याच्या वासांची मंद झुळूक आपल्याला सुखावतेच, आपल्या मनातल्या हळुवार प्रेमाचा इजहार लाल गुलाबाच्या साक्षीनेच खुलतो, ‘मदर्स डे’ असेल नाहीतर ‘व्हॅलेंटाइन्स डे’ फुलांशिवाय आपलं पानही हलत नाही. मग ही रंगीबेरंगी फुलं निर्माण करणाऱ्या निसर्गाचे क्षणभर उसंत घेऊन ‘थँक्स’ मानायला नको का? आपल्याला त्याने किती भरभरून दिलं हे आपल्याला कधी जाणवतं तरी का?

फुलांइतकंच नैसर्गिक आणि अमूल्य असतं ‘स्मितहास्य.’ जे काम हजार शब्दांनी होणार नाही ते एका साध्याशा स्मिताने पार पडतं. खरंच आपल्या केवळ दर्शनानेही जिवलगांच्या चेहऱ्यावर उमटणारी  हास्यरेषा आपल्याला किती शांतवते त्याला तोड नाही,  चेहऱ्यावरचं स्मितहास्य, आपल्या मनाला इतका गारवा देत असेल तर विचार करा मनापासून ओठांवर आलेलं खळखळून हसणं किती आनंददायी असेल? गाडीतल्या गर्दीत, उन्हाने बेजार झालेल्या अवस्थेत, कुठल्यातरी कोपऱ्यातून सात मजली गडगडाटी हास्य आपल्या कानावर येतं आणि संबंध नसतानाही क्षणभर सगळी मरगळ विसरून आपल्याही चेहऱ्यावर हसू उमटतं, ‘लाफ्टर इज कंटेजियस’ म्हणतात ते खरंच आहे. सध्याच्या काळातलं उत्तम स्ट्रेस बस्टर म्हणजे आपलं हसू, तेही पूर्णत: मोफत. त्या हास्याला धन्यवाद द्यायचे म्हणजे हसत रहायचं.

आणखी एका गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी ती निरपेक्ष मदतीची. आपल्या रोजच्या धावपळीत, कोणतीही अपेक्षा नसताना एखादी अनोळखी व्यक्ती, जी पुन्हा कदाचित भेटणारही नसते, निरपेक्ष मदत करते. बँकेत पैसे भरायला आपण जातो खरे पण पेनच न्यायचे विसरतो, रांगेतलीच एखादी व्यक्ती आपली अडचण ओळखून पेन पुढे करते, कधीतरी धावत पळत आपण चालती बस नाहीतर गाडी पकडायला जातो आणि अचानक गाडीच्या किंवा बसच्या दरवाजातून अनोळखी हात पुढे येतो आणि आपल्याला आत खेचतो किंवा एखादा आपल्याला बसायला त्याची जागा देऊ करतो. रस्त्यावरच्या तहानलेल्या मजुराला पाणी पाजणं असो की कुठल्याही वयोवृद्धाला अडचणीत मदत करणं असो, लहानशीही मदत त्यावेळी मोलाची असते. कोणतीही अपेक्षा नसताना केल्या गेलेल्या या माणसातल्या संवेदनशीलतेला कोरडे नाही अगदी मनापासून ‘थँक्स’ म्हणायलाच हवेत.

असं म्हणतात, आनंद इतरांबरोबर साजरा केला तर वाढतो आणि दु:ख सांगून मोकळं केलं तर ते कमी होतं. आपणही अनुभवतो अनेकदा. अडचण कोणाला तरी सांगितली की मनाला हलकं वाटतंच ना? माझे सगळे दु:खद आणि सुखद क्षण मी माझ्या आई-वडील आणि कुटुंबीयांबरोबर वाटून घेते आणि त्यांच्याही सुख-दु:खांना समजून घेते. थोडा वेळ काढायलाच हवा तुमच्या आप्तांना समजून घ्यायला आणि तुम्हालाही मोकळं व्हायला. शेअिरगमध्ये ती ताकद आहेच. फक्त जाणीवपूर्वक वाढवायला हवी ही सवय.

फक्त सजीवच कशाला अगदी निर्जीव वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला जगण्याची उमेद देतात, आपल्या घराचंच उदाहरण घ्या ना, आपली राहती जागा किती का लहान असेना तरी आत राहणाऱ्या माणसांच्या मायेची ऊब त्या निर्जीव वास्तूला ‘घरपण’ देते, जगात असे कितीतरी अभागी जीव असतील ज्यांच्या नशिबी असं आपलेपणाचं कोंदण असलेलं घर नसेल, सुख-दु:ख वाटून घ्यायला आणि लांबच्या दौऱ्यावरून आल्यावर स्वत:च्या हाताने खायला करून घालणारी प्रेमळ लेक नसेल, हे सगळं पाहिलं की मला माझाच हेवा वाटतो आणि माझ्या ‘घरा’लाच मला ‘थँक्स’ म्हणावंसं वाटतं. आजघडीला मी जिवंत आहे, श्वास घेते आहे, ही मला माझ्या आरोग्याने दिलेली ‘गिफ्ट’ वाटते. आणि म्हणूनच रात्री झोपताना आपण उद्या उठणार आहोत, याची मला खात्री असते. पण पुढचा श्वास आपण घेणार आहोत, याची खात्री किती जणांना असते? म्हणूनच निरोगी शरीराचे आभार मानतानाच त्यांचा सांभाळ करणं ही आपली जबाबदारी आहे हेही लक्षात ठेवायला हवं, केवळ आपल्यासाठी नव्हे तर आपल्या जवळच्यांसाठीसुद्धा.

निसर्गाने आपल्याला पुरेसं अन्न उपलब्ध केलं आहे. आपल्याला जगवणाऱ्या अन्नाविषयी कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी, नाही तर नुसत्या रुपयांच्या थप्प्या असून काय फायदा? सध्या तो अनुभव आपण घेतच आहोत. विमुद्रीकरणाच्या परिणामांना रोज सामोरे जात आहोत. पाहा ना, एका क्षणाचा अवकाश, आपण प्राणापलीकडे सांभाळून ठेवलेल्या महागडय़ा नोटा, शब्दश: मातीमोल झाल्या, पण त्याच वेळी आपल्यातले नातेसंबंध, आपल्या प्रियजनांचा सहवास या गोष्टी अमूर्त असल्या तरी आजही शाबूत आहेत.

पैशाने मिळणारे सुख अशाश्वत आहे, शाश्वत आहे ते माणूसपण, तेव्हा पैशांपेक्षा माणसं जोडण्यातच खरं शहाणपण आहे. त्या सगळ्यांमध्ये गुंतवणूक करा जो तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचं भान देतो, आनंद देतो. त्यांच्याप्रति कृतज्ञ राहा.. कायमच.

कृष्णा दत्ता – datta.krishna@gmail.com

अनुवाद – गीता सोनी