मराठीतील प्रभावी लेखक आणि कवींची यादी चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभू यांच्यावाचून पुरीच होऊ शकणार नाही. खानोलकरांना जेमतेम ४२ वर्षांचे आयुष्य लाभले. पण या कालावधीत त्यांनी कादंबरी, नाटक आणि कविता या तिन्ही प्रांतांत आपला ठसा उमटवला. त्यांच्या अप्रकाशित साहित्यापैकी ‘एक लघुकादंबरी आणि काही कविता’ हे पुस्तक प्रकाशक जया दडकर यांनी प्रकाशित केले आहे.

खानोलकरांचे साहित्य मोजकेच असले तरी त्याचा प्रभाव मोठा होता. ‘रात्र काळी.. घागर काळी’, ‘कोंडुरा’, ‘त्रिशंकू’, ‘गणुराया आणि चानी’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या. त्यापैकी ‘कोंडुरा’ आणि ‘चानी’वर चित्रपटही निघाले. ‘एक शून्य बाजीराव’ आणि ‘अजब न्याय वर्तुळाचा’ ही त्यांची नाटके आजही रसिकांच्या आठवणीत आहेत. तसेच ‘जोगवा’ आणि ‘नक्षत्रांचे देणे’ हे कवितासंग्रहही! त्यामुळेच संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी पुरस्कारांनी त्यांचा उचित सन्मानही झाला. यापैकी ‘रात्र काळी.. घागर काळी’ या कादंबरीचे मूळ रूप असलेल्या ‘झाडे नग्न झाली’ या लघुकादंबरीचा या पुस्तकात समावेश आहे. तसेच काही अप्रकाशित/ प्रकाशित कवितांचा, ‘पुष्पकुमार’ या नावाने लिहिलेल्या त्यांच्या काही कवितांचाही समावेश या संग्रहात आहे.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

खानोलकरांचे लेखन सर्वसामान्य वाचकाला पचनी पडण्यासारखे नाही. तरीही त्यांच्या गूढ, माणसाचा थिटेपणा अधोरेखित करणाऱ्या लिखाणाचे आकर्षण असणारे वाचक, अभ्यासक मोठय़ा प्रमाणावर आहेत, हेही तितकेच खरे.  कोकणातल्या वास्तव्यामुळे त्यांच्या बहुतेक लिखाणाची पाश्र्वभूमी कोकण हीच राहिली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणेच निसर्ग त्याच्या लिखाणात महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु तो क्वचितच प्रसन्न आढळतो. निसर्गाच्या पाश्र्वभूमीवर माणसातला विखारीपणाच त्यांच्या लेखनात जास्त उठून दिसतो. ‘झाडे नग्न झाली’ ही लघुकादंबरीही त्यास अपवाद नाही. एका छोटय़ा खेडय़ातील लक्ष्मी, बकुळ, दाजी, सदाशिव, वामन ही सगळी माणसे या कादंबरीतील पात्रे आहेत. या सगळ्यांचेच जगणे कुठेतरी एकमेकांशी जोडले गेले आहे. तरीही ते सारे एकाकी आहेत. त्यांची ही एकमेकांशी जोडली गेलेली रिती आयुष्येच त्यांना अटळ असे दु:ख भोगायला कारणीभूत ठरली आहेत. सदाशिव लक्ष्मीचा मुलगा. पण तो तिचा आत्यंतिक तिरस्कार करतो. बकुळ ही लक्ष्मीने सांभाळलेली मुलगी. तिचे लग्न वामनशी झालेय. पण ती प्रेम करते सदाशिववर. कधी कधी आयुष्यात खरे प्रेम मनुष्याला साद घालते, पण ते स्वीकारायचे धारिष्टय़ त्याला होत नाही. तेच सदाशिवचे झाले आहे. बकुळचे प्रेम समजून-उमजूनही तो नाकारतो. आणि मग अटळ नाशाच्या वाटेने जातो. कादंबरीतील सगळीच पात्रे नियतीच्या हातची खेळणी असल्यासारखी भासतात. त्यामुळे त्यांचे विधिलिखितही ठरलेले आहे. गुंतागुंतीचे नातेसंबंध, अगम्य शक्ती असल्याचा विश्वास, उदास वातावरण ही सगळी खानोलकरांची लेखनवैशिष्टय़े इथेही दिसतात. योग्य आणि चपखल शब्दांचा वापर अचूक वातावरणनिर्मिती करतो.

या संग्रहातल्या कविता आरती प्रभूंचा वेगळा बाज घेऊन येतात. ‘घोषणांनो सिद्ध व्हा ग रिक्त ओठांच्या पूजेला, काळजाची मात्र ज्वाळा वाहू दे काळ्या दिशेला’ या कवितेच्याच मार्गाने जाणाऱ्या ‘उठ जरा, उठ जरा’ ,‘दमलेल्या आशांनो’, ‘पुढची स्वप्ने’ या कविता. यातून अपेक्षाभंगाचे दु:ख तर आहेच; पण त्याच्यावर मात करायचा, हवे ते मिळवायचे प्रयत्न करायचा ध्यासही दिसतो. निसर्ग हा आरती प्रभूंच्या सगळ्याच साहित्याचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाची भव्य, उदास, भीतीदायक, सौंदर्यपूर्ण वर्णने त्यांनी केली आहेत. या संग्रहातल्या काही कवितांमधून हा निसर्ग फुलून आला आहे. ‘बहरा आला पंगारा, कमल-कोमल ,रुधिर लाल.. जणू जिभाच फुटल्या अंगारा’ हे ‘पंगारा’मधील वर्णन असो, किंवा ‘मन झुंजुमुंजु’मधील ‘चांदणे होऊन मन झुंजुमुंजु, कधी पिसाळून बघे झुंजूपिंजू’ या ओळी असोत; आरती प्रभूंना ‘शब्दप्रभू’ का म्हटले जाते हे या कवितांवरून कळावे, इतक्या अर्थपूर्ण, नादमयी शब्दांचा वापर त्यांनी या कवितांतून केलेला आहे. मराठीत इंग्रजीइतके रंगछटा दाखवणारे शब्द नाहीत असे म्हटले जाते. परंतु अशा छटा पाहायच्या असतील तर चिं. त्र्यं.ची ‘श्यामजांभळ्या मनी’ ही कविता वाचायलाच हवी. या कवितेत निळ्या रंगाच्या छटांसाठी इतके सुंदर शब्द कवीने वापरले आहेत! ‘अळुमाळू’, ‘झिळमिळ्या’ हे त्यांचे खास शब्द मोहकपणे या कवितांमध्ये येतात. ‘कुठे कलाबूती रेघ झगमग, विरत्या मेघात मिटे लगबग’ म्हणत लुभावून टाकणारी ‘थांबे सांजतारा’ ही कविता मुळातूनच वाचायला हवी.

आरती प्रभूंच्या कवितेतली गेयता आपण अनुभवली आहेच. मग ती ‘येरे घना’मधली असेल किंवा ‘तू तेव्हा तशी’मधली. या संग्रहातही ‘तुझिया स्पर्शाने मौनही झंकारे’ असे  ‘रत्नांच्या नशेत’ले वर्णन आहे. ‘तुझी माझी गाठ पडली’, ‘तुझ्या पहिल्याच आतिथ्याने’ या प्रेमकविताही वेगळ्या! पण त्या अपवादानेच आहेत. एरवी गंभीर, अर्थवाही, पण एकाकी, काहीशा गूढ कविता हे त्यांचे वैशिष्टय़ या संग्रहातही दिसते. ‘पिशी’, ‘उधळण-गंधा’, ‘माझ्या आर्ताचा उद्गार’, ‘दीपछिन्नी’ या कविता याच वाटेने जातात. ‘जळगौरी’ आणि ‘कवितेची कथा’ या कविताही उल्लेखनीय. ‘कवितेची कथा’ आणि ‘सारंगी’ याच शीर्षकाच्या दोन कविता संग्रहात आहेत. कदाचित जुन्या -नव्या दोन्हींची सरमिसळ असल्याने हे घडले असावे.

सतीश भावसार यांचे मुखपृष्ठ या संग्रहाचा नेमका भाव टिपणारे आहे. प्रकाशक जया दडकर यांनी आपल्या ‘भूमिके’त स्पष्ट केल्याप्रमाणे, खानोलकर यांच्या वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी त्यांच्या लिखाणाची सारी वैशिष्टय़े घेऊन आलेला हा संग्रह निश्चितच मोलाचा ठरावा.

एक लघुकादंबरी आणि काही कविता

चिं. त्र्यं. खानोलकर,

पृष्ठे- १३८, मूल्य- २५० रुपये.

 

– सीमा भानू