‘अंगदेशाचा राजा : मेंदू, अंगदेशाचा वजीर : जनुकं आणि अंगदेशाच्या लढाया : रोगप्रतिकारशक्ती’ हा मनोविकास प्रकाशनने प्रसिद्ध केलेला डॉ. बाळ फोंडके यांच्या तीन पुस्तिकांचा संच म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील या तीन संकल्पनांची ज्ञानेश्वरी ठरावी, इतक्या या पुस्तिका प्रभावीपणे लिहिल्या आणि मांडल्या गेल्या आहेत. खरे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात पहिल्या वर्षांपासून आम्ही या तीन गोष्टी शिकत आलेलो आहोत. तरीही रुग्ण व नातेवाईकांना त्या मायबोलीत नेमक्या कशा समजावून सांगायच्या, हा प्रश्न नेहमीच पडे. या पुस्तिकांनी हा प्रश्न निकाली काढला आहे.

‘मेंदू’ या भागात अगदी पहिल्या प्रकरणात आम्हा डॉक्टरांनाही समजायला आणि लक्षात ठेवायला अवघड जाणारी मेंदूची रचना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. पुढे चेतापेशी आणि मज्जासंस्था समजावून सांगताना, या पेशी जशा शरीरात पसरतात आणि शरीराचा ताबा घेतात, तसेच हे पुस्तकही वाचकाचा ताबा घेते. ज्ञानाची साठवण कशी केली जाते, आणि सगळ्यात महत्त्वाचा डावा-उजवा मेंदू कसा आणि कुठल्या गोष्टींसाठी काम करतो, हे समजावून घेणे आणि त्या गोष्टी विकसित करणे, हे खरे तर आपल्या प्रत्येकाला समृद्ध आयुष्य जगण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मेंदूची संगणकाशी तुलना तर खूपच चपखलपणे जमून आली आहे. यातील संगणक एक वेळ बंद करता येतो, पण मेंदू अगदी झोपेतही अविश्रांत कार्यरत असतो, ही गोष्ट ध्यानाचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित करणारे आहे. ब्रोकाज आणि वेरनीकेज एरिया या भाषावहनाच्या काम करणाऱ्या दोन भागांचे वर्णन रंजकपणे व वाचकाला सहज कळेल आणि लक्षात राहील असे केले गेले आहे. आपल्या भावविश्वातील सिरोटोनिन, डोपामिन या द्रव्यांची उलाढाल वाचून वाचकांना आपल्या शरीरात नेमके काय घडते याबाबतचे कुतूहल बऱ्याच प्रमाणात शमेल. ‘निद्रापुराण’ या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे, मेंदूत निर्माण होणाऱ्या लहरी या वैद्यकीय क्षेत्रातील अनेक गोष्टी समजून घेण्यास उपयुक्त आहेत. स्मृती व वेदना या दोन गोष्टींचा मेंदूशी असलेल्या संबंधांचे आलेले वर्णन मेंदूबद्दलची माहिती पूर्णत्वास नेते.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
National Medical Commission, Denies Approval for New Medical Colleges, Medical Colleges and Seat Increase, 2024 2025 Academic Year, medical students, medical seats in india, medical seats
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले?
Haryana school bus accident,
VIDEO : शाळेच्या बसला भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

या संचातील दुसरे पुस्तक जनुकांविषयीचे आहे. आनुवंशिक आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचे महत्त्वाचे कारण- जनुकांबद्दलचे अज्ञान. पण हे पुस्तक आपल्याला जनुकसाक्षर करून सोडते. यात अगदी आपल्या कुटुंबातील दिसण्यातले व स्वभावातले साम्य या गोष्टींचा वैज्ञानिक गाभा आपल्या लक्षात येतो. गुणसूत्रे म्हणजे नेमके काय, याचे उत्तर आम्हाला वैद्यकीय शिक्षण घेत असताना तोंडी परीक्षेतही नीट समजावून सांगता यायचे नाही. पण हे पुस्तक वाचल्यावर वाचक ते कोणालाही सहज समजावून सांगू शकेल. डीएनएची सापशिडी या पुस्तकात अगदी सरळ करून आतून- बाहेरून उलगडून दाखवली आहे. त्यामुळे ‘डीएनए’वरचे हे प्रकरण विज्ञानवाचनाच्या शिडीचेच कार्य करते. मायटोसीस आणि मियोसीस या दोन पेशीविभाजनाच्या संकल्पना अगदी सोप्या करून सांगितल्या आहेत. एरवी चार शिंगांचे प्राणी, बारा बोटांची माणसे, सहा पायांची गाय अशा बातम्या वर्तमानपत्रांत मनोरंजक म्हणून छापल्या जातात. पण हे पुस्तक त्यांच्याकडे जनुकांच्या चष्म्यातून आणि वैज्ञानिक दृष्टीने बघायला शिकवते. आपल्या डीएनएच्या ठशांबद्दल समजावून सांगत, हे पुस्तक वाचकाला त्याची नवीन ओळख करून देते. ‘जनुके अभियांत्रिकी’ आणि ‘ुमन जीनोम’ या संकल्पना शालेय विद्यार्थ्यांच्या वाचनात येणे खूप गरजेचे आहे. यातून एखाद्या विद्यार्थ्यांची जिज्ञासा चाळवली जाऊन एखादा जनुक-वैज्ञानिक निर्माण करण्याची क्षमता या प्रकरणांमध्ये आहे. मेंडलचे ‘वाटाण्याचे प्रयोग’ परीक्षेत अनेकदा लिहिले असले तरी ते या पुस्तकात वाचताना या प्रयोगांची वेगळी अनुभूती देते. प्रथिनांच्या निर्मितीत जनुकांचा सहभागही समजावून सांगितला आहे.

संचातील तिसरे पुस्तक रोगप्रतिकारशक्तीवर आहे. हे पुस्तक तुम्हाला थेट शरीरातील युद्धभूमीवर नेऊन पोहोचवते आणि शरीरात लढल्या जाणाऱ्या संसर्गाविरुद्धच्या युद्धाचे साक्षीदार बनवते. यात रोगप्रतिकारशक्तीसाठी शरीरात पेशींची तटबंदी कशी असते, हे उदाहरणांसह समजावून सांगितले आहे. या युद्धातील विलक्षण स्मरणशक्तीबद्दल विशेष उल्लेख आहे. लसीकरण समजावून सांगताना डॉक्टरांना या गोष्टींचा उल्लेख नियमित करावा लागतो. हेच ज्ञान ‘डॉ. बुंद जिंदगी’ या प्रकरणात करून हे पुस्तक रेंगाळलेल्या लसीकरण मोहिमेला हातभार लावते. ‘अ‍ॅलर्जी’ या प्रकरणात अ‍ॅलर्जीला जबाबदार कोण, हे कळते. ‘अवयवरोपण’ या प्रकरणात अवयवदान यशस्वी किंवा अपयशी का होऊ  शकते, ते समजते. ‘बबल बेबी’ म्हणजे फुग्यातील मुलाची रंजक कथाही वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. ‘ऐकावे ते नवलच’ या भागातील आश्चर्यजनक गोष्टी आणि शेवटी मवी मलीन, जेन्नर आणि पाश्चर या थोर शास्त्रज्ञांचा उल्लेख व त्यांच्या कर्तृत्वकथा रोगप्रतिकारशक्तीची संकल्पना अधिक प्रभावीपणे समजावून सांगते. मुलांची अभिरुची समजून घेऊन या पुस्तकाची भाषा, चित्रांची अतिशय विचारपूर्वक आणि प्रभावी मांडणी केली गेली आहे.

‘अंगदेशाचा राजा : मेंदू’, ‘अंगदेशाचा वजीर : जनुके’, ‘अंगदेशाच्या लढाया : रोगप्रतिकारशक्ती’

– बाळ फोंडके, मनोविकास प्रकाशन,

पृष्ठे- प्रत्येकी ३२, मूल्य- प्रत्येकी ९० रुपये.

डॉ. अमोल अन्नदाते amolaannadate@yahoo.co.in