गेली हजारो वर्षे माणूस निसर्गावर कुरघोडी करण्याच्या अथक प्रयत्नांत मग्न आहे. त्यात त्याला बऱ्याच प्रमाणात यशही मिळालं आहे. त्यामुळे त्याला असं वाटत असावं, की मी माझ्या बुद्धीने, कौशल्याने आणि हुशारीने निसर्गाला नमवलं आहे.. वश करून घेतलं आहे. परंतु निसर्गाचा एखादा फटकासुद्धा मानवाचा हा दुरभिमान धुळीला मिळवण्यास पुरेसा ठरतो. मात्र, त्याने जाग येईल तर तो माणूस कसला! त्याच्या उन्मत्तपणाला, लोभाला आणि महत्त्वाकांक्षेला अंतच नाही. परंतु या अविचाराचे दुष्परिणामसुद्धा त्यालाच भोगावे लागत आहेत. कुठे अवर्षण, कुठे पूर, वाढत चाललेली जागतिक तापमान समस्या. माणसाच्या या चढाओढीने संवेदनशील, जाणती मनं विषण्ण होत आहेत. आपल्या पुढील पिढीपुढे काय वाढून ठेवलं असेल या भीतीने धास्तावत आहेत.

परंतु समोर असा काळाकभिन्न अंधार असावा आणि अचानकपणे रूपेरी, शीतल चंद्रकिरणांनी आसमंत उजळून निघावा, तसा काहीसा अनुभव अगदी अनपेक्षितपणे आला.

त्याचं असं झालं.. आमच्या एका छोटय़ा ग्रुपने ऑस्ट्रिया- क्रोएशिया या देशांत फिरायला जायचं ठरवलं. हे दोन्ही युरोपातले देश. परंतु क्रोएशियाबद्दल तशी फारशी माहिती नव्हती. मग या सहलीमध्ये कुठल्या कुठल्या स्थळांना भेटी द्यायच्या वगैरेबाबत खलबतं होऊ लागली. आणि एक दिवस माझ्या मुलीने एक लिंक पाठवली. ती होती- झादर या ठिकाणच्या ‘सी ऑर्गन’बद्दल! त्याला लेकीची तळटीप होती- ‘A must see!’ प्रत्येकाने यू-टय़ूबवर जाऊन ती लिंक पाहिली. सोबतची माहिती वाचली. समुद्रकिनाऱ्यावर लाटा आणि वाऱ्याने संगनमत करून वाजवलेला नैसर्गिक ‘सी ऑर्गन’! ही कल्पनाच एवढी विलक्षण होती, की एकमताने वाट वाकडी करून या ‘सी ऑर्गन’ला भेट द्यायचं आम्ही ठरवूनच टाकलं.

एका प्रसन्न आणि थंडगार सकाळी खास गाडी करून आम्ही निघालो झादरला. साधारण चार- साडेचार तासाच्या प्रवासानंतर एकदाचं आमचं ठिकाण आलं. ती होती युरोपातील कुठच्याही देशात दिसणारी एक सर्वसामान्य गल्ली. आजूबाजूला इमारती. समुद्राचं नावनिशाणही नव्हते. आमचा वाहनचालक आम्हाला एका रस्त्याकडे बोट दाखवून म्हणाला, ‘इथून सरळ जा.’ आम्ही निघालो. चालता चालता हळूहळू आमच्या कानावर अतिशय सुमधुर, गंभीर, शांतवणारे स्वर येऊ लागले. आम्ही अविश्वासाने एकमेकांकडे पाहिलं. आणि नकळतच आमची पावलं भरभर पडू लागली. शेवटी शेवटी तर आम्ही जवळ जवळ धावतच सुटलो म्हणा ना! अचानकपणे आमच्यासमोर तो विलक्षण नजारा उलगडला आणि आम्ही जणू स्तब्ध झालो. आमच्यासमोर होता अफाट निळाशार समुद्र. सुंदर निरभ्र आकाश. त्याला लागून अतिशय सुबक, देखणा असा पांढराशुभ्र संगमरवरी किनारा.. ज्यावर आम्ही उभे होतो. आणि साथीला ते पियानोचे सुरेल सूर- जे आता स्पष्ट आणि छान ऐकू येत होते. आमचा आमच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नव्हता. त्या विशुद्ध, सुंदर अशा संगीतमय चित्राचा आम्हीही एक भाग बनलो होतो.

पहिला अतीव आनंदाचा गोड धक्का ओसरल्यावर आम्ही किनाऱ्यावर फिरू लागलो. अर्थात आम्ही उत्सुकतेपोटी गृहपाठ करून गेलो होतोच. त्यामुळे आम्हाला हे माहीत होतं की, हा किनारा समुद्रात उतरत जाणाऱ्या सात रुंद आणि दहा मीटर लांबीच्या पायऱ्यांनी बनला आहे. या पायऱ्यांची रचना एका विशिष्ट प्रकारे केलेली आहे. त्यांना पियानोच्या कीज् असतात तशी आयताकृती छिद्रं आहेत आणि सर्वात वरच्या पायरीवर ठराविक अंतरावर गोलाकार वर्तुळे आहेत. या वेगवेगळ्या उंचीवरच्या समुद्रात उतरणाऱ्या पायऱ्यांच्या आतून ३५ पाइप वळवले आहेत. हे पाइपसुद्धा वेगवेगळ्या लांबी-रुंदीचे असून त्यांची रचना संगीत वाद्याप्रमाणे वैशिष्टय़पूर्ण आहे. लाटांचं पाणी आणि वारा यांच्या खोडकर खेळाचे सुस्वर नाद सर्वात वरच्या पायऱ्यांवर असलेल्या वर्तुळांतून वातावरणात एक स्वर्गीय असं संगीत निर्माण करतात. समुद्राची भरती-ओहोटी, वाऱ्याचा दिवसभरातील वेगवेगळ्या प्रहरांतील वेगवेगळा वेग, पायऱ्या आणि त्यातील पाइपची रचना या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घटकांमुळे त्यातून निर्माण होणारं संगीतही कायम एखाद्या कॅलिडोस्कोपच्या दृश्याप्रमाणे वैविध्यपूर्ण असतं. आणि पुन्हा तुम्ही ज्या पायरीवर आणि ज्या ठिकाणी उभे असता त्या जागेसाटी ते संगीत एकमेव असतं. म्हणजे तुम्ही तुमची जागा बदलली की संगीताचे स्वरही बदलतात.

कल्पना करा- समोर पसरलाय भव्य, विशाल, निळाशार अ‍ॅड्रिअ‍ॅटिक समुद्र. इतका निळा, की जणू काही त्याच्या पाण्यात ओंजळी भरून भरून निळा रंग टाकला असावा. नाहीतर इतका निळाशार समुद्र? सळसळता, चकाकता, चैतन्यपूर्ण. त्याला सुरेख, निरभ्र निळ्या रंगाच्या आकाशाचं कोंदण. दूरवर दिसणारी डोंगरांची रांग आणि शेजारची बेटे. अधूनमधून डोकावणाऱ्या- अगदी चित्रातल्याच जणू अशा बोटी.. आणि त्यावर बांधलेला हा २३० फुटी सुंदर, सुबक पांढराशुभ्र संगमरवरी पियानो! पण हे अप्रतिम आणि अलौकिक चित्र नि:शब्द मात्र नाही. त्यातला समुद्र नाचरा आणि हसरा आहे. वारा लाटांचा हात हातात घेऊन त्याच्या लहरीप्रमाणे खोडकर धावपळ करतो आहे. आणि या स्वप्नील वातावरणात सर्वदूर भरून राहिलेत स्वर्गीय सूर! हे सूर कधी मंद आहेत, कधी तीव्र; पण सुमधुर. अगदी सतत कानावर पडणारे. वातावरण भारावून टाकणारे. येणारे-जाणारे पुन: पुन्हा वेडावल्यासारखे पायऱ्यांवरून खाली-वर करताहेत. (त्यात अर्थातच आमचाही समावेश आहे.) आणि मग लक्षात येतं, की सगळ्यात वरच्या पायरीवर जे वर्तुळाकार गोल आहेत, त्याला जर कान लावला तर हेच संगीत आणखी स्पष्ट आणि जवळून ऐकू येतं. अशा एकापुढे एक अशा वर्तुळांना कान लावून एका कुशीवर झोपलेल्या रसिकांची रांग मोठी मजेशीर दिसते आहे. आम्हीही सर्वजण लगबगीने एकेक वर्तुळ काबीज करतो आणि त्या स्वर्गीय लहरींवर स्वार होण्याचा आनंद लुटतो.

तर असा हा झादरचा जगप्रसिद्ध ‘सी ऑर्गन’! झादर हे अ‍ॅड्रिअ‍ॅटिकसमुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं एक द्वीपकल्प. २७०० वर्षांपूर्वी वसलेल्या या गावाने अनेक युद्धे पाहिली. अनेक राज्यकर्ते आले आणि गेले. परंतु प्रत्येक वेळेला झादरवासी पुन्हा ताठपणे उभे राहिले. इथला सुरेख समुद्रकिनारा आणि अप्रतिम सूर्यास्त झादरवासीयांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. पण दुसऱ्या महायुद्धात झादर हे जर्मन सैन्याचे मुख्यालय बनले आणि त्यावर तब्बल ७२ वेळा अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिकांनी बॉम्बफेक केली. त्यामुळे या शहराची जबरदस्त हानी झाली. त्यातून उभं राहिलं सीमेंटचं जंगल आणि तुटकाफुटका असा विद्रुप समुद्रकिनारा. सरकारने प्रख्यात स्थापत्यविशारद निकोल बेसिक याच्याकडे या समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम सोपवले आणि त्याच्या कल्पकतेतून हे विलक्षण निसर्गशिल्प साकारलं. आज क्रोएशिया आणि झादरचे ते अभिमानबिंदू बनलं आहे.

दिवसाच्या कोणत्याही वेळेला तिथे जा आणि निसर्गाच्या लहरीप्रमाणे त्याचा आनंद लुटा. इथे तुम्हाला निसर्ग थेट भेटेल, दिसेल आणि ऐकूही येईल. कधी रौद्र, कधी सौम्य. कधी हसणारा, कधी उदास, तर कधी शांतवणारा. संध्याकाळचा सूर्यास्त तुम्ही इथे उभं राहून पाहाल तर निसर्गतत्त्वाशी विलीन होण्याचा एक विलक्षण अनुभव तुम्ही घ्याल. तुमचं आयुष्य तो अविस्मरणीय क्षण उजळून टाकेल.

२००५ साली निकोल बेसिक या स्थापत्यकाराने हे अद्वितीय व अलौकिक असं शिल्प बनवलं. त्याला त्याबद्दल स्थापत्यशास्त्रातील अनेक सन्मान प्राप्त झालेच; शिवाय अत्यंत प्रतिष्ठेचा ‘सवरेत्कृष्ट युरोपीयन पब्लिक स्पेस’चा सन्मानही २००६ साली मिळाला. हा सन्मान प्रदान करताना पुरस्कार समितीने म्हटले होते की, ‘हा पुरस्कार देण्याचे कारण म्हणजे या भव्य आणि आदर्शवत जागेवरून अप्रतिम सुंदर असा सूर्यास्त पाहणे, आजूबाजूला धूसर होत गेलेल्या बेटांच्या रूपरेषा पाहणे आणि साथीला साक्षात् समुद्राने वाजवलेले संगीत ऐकणे, हा एक अत्युच्च आणि उत्कट असा अनुभव आहे.’

परंतु निकोल बेसिकची सर्जनशीलता इथेच थांबली नव्हती. त्याने इथून जो अप्रतिम सूर्यास्त दिसतो, त्या सूर्यदेवाला सलाम करण्यासाठी ‘सन सॅल्युटेशन’ नावाची एक सुंदर रचना केली. ‘सी ऑर्गन’साठी बांधलेल्या संगमरवरी समुद्रकिनाऱ्यावरच त्याने एक २२ मीटर परिघाचं आणि ३०० पदरी काचांचं वर्तुळ बांधलं. या वर्तुळात त्याने सौरऊर्जेच्या असंख्य पट्टय़ा बसवल्या. या पट्टय़ा दिवसभर सूर्याची ऊर्जा साठवतात आणि सूर्यास्त झाला की या वर्तुळातून असंख्य रंगांची उधळण होऊ लागते. त्यावर विवक्षित अंतरावर असणारी ग्रहमालासुद्धा उजळून निघते. इतकेच नव्हे तर सबंध किनारपट्टीवर जागोजागी लावलेले दिवे प्रकाशमान होतात आणि मग सुरू होतो- निसर्ग आणि मानवाच्या सहयोगाने आपल्यासाठी खास पेश केलेला ‘Light And Sound Show.’ समोर आकाशात सूर्यदेवाने उधळलेला लालिमा.. जो लाटांवर स्वार होऊन हेलकावत आपल्याकडे सरकतो आहे. किनारा असा प्रकाशमान झालेला.. सुखद गार हवा आणि साथीला समुद्रदेवाने वाजवलेला एखादा धीरगंभीर आणि काळजाला भिडणारा मुखडा! तो क्षण नितळपणे जगावा, आपल्या अंगांगात भिनवून घ्यावा आणि शांतपणे घरची वाट धरावी. निसर्ग आणि मानवाच्या मैत्रीचा अत्युच्च, उत्कट अनुभव देणारा असा हा आविष्कार!

सुजाता नरसाळे