शहराच्या दगदगीपासून लांब गावात जाऊन सुट्टय़ांमध्ये धमाल करायला सगळ्यांनाच आवडतं. गावाची शांतता, तिथल्या लोकांचा आपलेपणा सगळंच कसं अगदी छान वाटतं. सुट्टय़ा संपल्या की, आपण परत शहरातल्या दगदगीत आणि गर्दीतल्या एकाकीपणात येतो आणि गाव आठवत राहतो. गावाची आठवण हळूहळू रुटीनमध्ये हरवत जाते आणि पुन्हा पुढच्या सुट्टीतच आपल्याला गाव आठवते. या हरवत चाललेल्या गावाच्या संस्कृतीला जिवंत करण्याचं काम करत आहेत ‘फोक टॉकीज’चा ग्रुप.

भारताच्या ग्रामीण संस्कृतीला जगापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेलं एक यूटय़ूब चॅनल म्हणजे फोक स्टुडियो. भारतातील अशा काही कला किंवा ग्रामीण भारतातील काही तथ्य, वैशिष्टय़ं जी विस्मृतीत गेली आहेत, त्यांना जिवंत करण्यासाठी फोक टॉकीजची सुरुवात करण्यात आली आहे. फोक टॉकीज हे चॅनेल मॅरियड आर्ट्स ग्रुप आणि इव्हेंट कारखाना या दोन्ही ग्रुप्सच्या एकत्र प्रयत्नांतून सुरू झालेलं चॅनेल आहे.

याबद्दल मॅरियड आर्ट्सचे प्रमुख आणि फोक टॉकीज संकल्पनेचे जनक श्रेयस देसाई सांगतात, मी गेल्या १० वर्षांपासून फोक आर्ट्सच्या क्षेत्रात आहे. तेव्हापासूनच भारतीय लोककलेला जगापर्यंत पोहोचवण्याची इच्छा मनात होती आणि म्हणूनच सुरुवात झाली फोक टॉकीजची. फोक टॉकीजच्या माध्यमातून केवळ परफॉर्मिग आर्ट्सच नाहीत तर इतरही लोककलांवर लक्ष देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लोककलांचा प्रसार आणि लोककलाकारांना ओळख मिळवून देणं हाच आमचा मुख्य अजेंडा आहे.

फोक टॉकीजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये नाशिकच्या वासुदेववाडी या गावातील खऱ्या वासुदेवांची कहाणी सादर करण्यात आली आहे. वासुदेव ही महाराष्ट्रातील जुनी ग्रामीण प्रथा आहे. पण काळाच्या ओघात तिचा विसर पडत गेला. अशा वासुदेववाडीत राहणाऱ्या वासुदेवांची कहाणी किती बरं लोकांना माहीत असेल? जगाला विसर पडलेल्या या वासुदेवांच्या उपजीविकेचाही प्रश्न मोठा होता. अशा वासुदेवांची कहाणी जगाला कळावी म्हणून फोक टॉकीजच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला आहे. असंही श्रेयस यांनी सांगितलं.

अशा वेगवेगळ्या विषयांवर फोक टॉकीजच्या पहिल्या सीझनमध्ये आठ एपिसोड येणार आहेत. त्यानंतर फोक टॉकीज महाराष्ट्राबाहेर पडणार आहे, असे श्रेयस सांगतात. ‘एक सीझन हिट झाल्यावर महाराष्ट्राबाहेरच्या लोककलेला जगासमोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्ही डिसेंबरनंतर गोवा, राजस्थान, ओरिसा आणि गुजरातचा दौरा करत तिथल्या लोककलांचे एपिसोड्स शूट करणार आहोत. ही काही वेब सीरीअल नाही, तर ही खऱ्या भारताची एक छोटी सफर आहे. फोक टॉकीज हे यूटय़ूब चॅनेल नुकतंच सुरु झालं आहे. फोक टॉकीजच्या टीझरला काही हजार व्ह्य़ूज मिळाले आहेत आणि पहिला एपिसोडही लोकांना आवडलेला दिसतोय. एक वेगळी संकल्पना घेऊन आलेल्या या फोक टॉकीजच्या टीममध्ये सगळेच यंग आहेत. म्युझिक देणारे परम आणि अर्जुन, दिग्दर्शक अजिंक्य माडगुट आणि फोक टॉकीजचे जनक श्रेयस देसाई अशी सगळी यंग टीम आहे. पहिला सीझन महाराष्ट्रापुरता असला तरी व्हीडिओ हिंदीत भाषेत करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील लोककला जगभरात पोहोचवण्याचा हा एक युनिक आणि वेगळा मार्ग आहे.

एका महिन्यात या चॅनलवर दोन एपिसोड येणार आहेत. यामध्ये लोकनृत्यापासून ते वासुदेवाची कला, वारली पेंटिंग, हस्तकला यांच्यासह अनेक कलांचा समावेश आहे.

वाढत्या वेस्टर्नायझेशनमध्ये मध्ये झुंबा शिकत असताना कधी कधी लावणीची मजाही घ्यावी, मॉडर्न आर्टच्या एक्झिबिशनमधून एखादं चित्र खरेदी केलं तरीही गावातल्या माणसांनी काढलेली वारली चित्रसुद्धा घराच्या भिंतीवर सजवावी, बादशाह आणि हनी सिंगचे रॅप ऐकत असताना वासुदेवाची मधुर गाणीही माहिती असावीत, असा संदेश देणाऱ्या या चॅनलला प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मिळेल असं दिसतं.

– निहारिका पोळ