पाश्चिमात्य खाद्य संस्कृतीमध्ये फूड पेअरिंगचं शास्त्र सध्या चलतीत आहे. कुठल्या पदार्थाबरोबर कुठली वाईन हवी, याचेही नियम असतात. आपल्याकडे मात्र ऋतूनुसार हे असं ‘फूड पेअरिंग’ होतं. म्हणजे – बाहेर पडत असणारा अखंड पाऊस, कुंद वातावरण असलं की या पावसाचा सदासर्वकाळ सोबती चहा. या चहाबरोबर संध्याकाळी गरमागरम भजी हवीतच. पावसाळ्यातल्या फूड पेअरिंगचा हा भरभरून रसास्वाद!

बाहेर सुरू असणारा मुसळधार पाऊस.. खिडकीतून घरात बसून पाहिलं तर बाहेर भिजायला जावंसं वाटतं आणि बाहेर असलं तर भिजण्यापासून वाचावंसं वाटतं. दोन्ही परिस्थितींमध्ये मनात उकळ्या फुटायला लागतात. मग घरात असलो तर चहाचं आधण ठेवलं जातं आणि बाहेर असलो की टपरीकडे पावलं वळतात. कानात आणि मनात पावसाची गाणी वाजत असताना त्या आल्हाददायी चहाचा एक भुरका स्वर्गसुख देतो, घशाला कोमट दिलासा मिळाल्यावर जीभ तृप्त होण्यासाठी हट्ट धरते. आता चहा उकळण्याऐवजी तेल उकळत असतं आणि मुलतानी मातीचा फेसपॅक लावल्यासारखा चण्याचं पीठ ल्यालेला कांदा तेलात उडी घेतो.. चुरचुरीत कांदाभजी व्हायला..! मग त्यासोबत पुन्हा चहाचं आधण उकळतं.

संततधार बरसणारा पाऊस, सोबत कांदाभजी आणि चहा असं त्रिकूट जमून आल्यानंतर समर्थाच्या ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे?’ या प्रश्नाचं उत्तर ‘हे त्रिकूट जमवून आणणारे सारे लोक’ असं द्यावं लागतं. या सगळ्या पदार्थाची युती होणं, हा काही योगायोग नाही, ते एक प्रकारचं शास्त्र आहे. ‘फूड पेअरिंग’ नामक प्रकार हे सगळं घडवून आणतो. हे एक प्रकारचं खवय्यांचं शास्त्र असलं तरी बराचसा परिस्थितीच्या गुणधर्माचा आणि खाद्यघटकांच्या रसास्वादाचा भाग यात येतोच! आपल्या सर्वसामान्यांच्या ऐकीव माहितीनुसार परदेशात प्रचंड थंडी असल्याने लिकर प्यावीच लागते असा नैसर्गिक (गैर)समज आहे. पण त्या लिकरसोबत काय पदार्थ खावेत किंवा खाल्ले जातात, याचेही नियम आहेत. कुठल्या खाद्यपदार्थाबरोबर कुठली वाईन प्यावी, कुठल्या चीजसोबत कुठली लिकर चांगली लागते याचं शास्त्र म्हणजेच हे फूड पेअरिंग!

आता हे आपल्याकडेही अ‍ॅप्लिकेबल आहे बरं का! म्हणजे बघा ना.. पाऊस पडत असताना आपल्याला काहीतरी गरम पदार्थाची आवश्यकता भासते. आपल्या शरीराचं तापमान मेंटेन करायला वगैरे ही दुय्यम गोष्ट.. पण तरीही गरमगरम खावं प्यावसं वाटतं. म्हणून मग चहा आणि त्यातही चहासोबत भजी! हे जे चहासोबत भजी असणं आहे त्याला फूड पेअरिंग म्हणता येईल की! अस्सल देसी फूड पेअरिंग!
भारताचं राष्ट्रीय पेय म्हणजे चहा. खरंतर ‘चहा’ नाही.. ‘चाय’ ! सगळीकडे चहाचे वेगवेगळे प्रकार असतात, त्याचप्रमाणे चहासोबत जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थही वेगवेगळे असतात आणि ते ऋतूप्रमाणे बदलतात. उदाहरणार्थ, पावसाळ्यात आपल्याला चहासोबत तळलेलंच लागतं – म्हणजे कांदाभजी, मूगभजी, असं काही. हिवाळ्यात चहासोबत बेकरी उत्पादनं खाण्यावर जास्त भर दिला जातो. म्हणजे जिरा बटर, टोस्ट, खारी, मस्का बटर असं सारं. उन्हाळा जितका कडाक्याचा असेल तितकाच कडक चहा असणं, हे भारतीय आपलं ‘खाद्य कर्तव्य’ मानतात. आता प्रदेशानुसार ठिकठिकाणी थोडय़ाफार प्रमाणात फूड पेअरिंग बदलून या चहासोबत काही वेगळं ट्राय करतीलसुद्धा, पण मग ते या शास्त्रातलं सामान्य माणसाने केलेलं अतिसामान्य संशोधन मानता येईल. देशभर चहाचं वर्चस्व असलं तरी विभागानुसार चहा तितकाच बदलतो. दिल्लीचा गुलाबी चहा वेगळा, काश्मीरमधला मसालेदार ‘काहवा’ वेगळा, मध्य भारतातली गूड की चाय वेगळी, उत्तर भारतीय ‘चाय’ची चव कुल्हडमुळे वाढते. मुंबईच्या टपरीवरचा गरमागरम चहा पुण्यात गेल्यावर ‘अमृततुल्य’ होऊन जातो!
बाकी सगळं कितीही शास्त्र किंवा सवयीचा भाग असला तरी पावसाचं आणि चहाचं एक आंतरिक नातं आहे असं वाटतं. पावसाचं पाणी मातीत मिसळून त्याचा जो रंग तयार होतो, तो चहाच्या रंगाशी तंतोतंत साधम्र्य जुळवतो की! त्या पावसाचं आणि चहाचं छुपं काँट्रॅक्ट असावं.. पहिलाच मुसळधार पाऊस पडावा आणि टपरीचा धोधो धंदा व्हावा, असं काहीतरी! बाहेर धोधो पाऊस पडून पहिल्या पावसाचा मातीचा दरवळ पसरलेला असावा आणि धुक्यासारखी भासणारी उकळत्या चहाची वाफ अलगद गालांना स्पर्शून नाकाजवळ रेंगाळावी.. यासारखं जगात सुख नाही!
जेव्हा कधी हा ‘अमृततुल्य’ योग जुळून येईल तेव्हा माणसाने रसनेंद्रियांवर अजिबात नियंत्रण वगैरे न ठेवता तात्पुरता तोल सुटू द्यावा आणि एक प्लेट एक्स्ट्रा भजीसकट चहाचा एक घोट अधिक घेतला जावा.. तरच पावसाला पण तो बरसल्याचं समाधान वाटून तुमचं कौतुक करण्यासाठी त्याचा एक पाण्याचा थेंब तुमच्या खिडकीतल्या वाफाळत्या चहाच्या कपात पडेल.. तुम्हाला पूर्ण तृप्त करण्यासाठी!

– सौरभ नाईक