हल्ली प्रत्येक नवा चित्रपट, नाटक किंवा नवी जाहिरात मोहीम एखाद्या हॅशटॅगने सुरू होते. झटपट प्रसिद्धी होण्यासाठी आणि आपल्याला हवा तो आशय व्हायरल होण्यासाठी सोशल मीडियावर हॅशटॅगचा वापर जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. हॅशटॅगच आता ट्रेण्ड बनलाय. प्रसिद्धीच्या तंत्रात हॅशटॅग व्हायरल करणं हे महत्त्वाचं सूत्र बनलं आहे.. या ट्रेण्डिंग हॅशटॅगविषयी..

यंदाच्या क्रिकेट हंगामात #नई सोच या नावाने एक हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला. एका खासगी वाहिनीने त्यांची जाहिरात मोहीम कल्पकतेने एका सोशल मेसेजभोवती आखली. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंनी ‘सन ऑफ देवकी’, ‘सन ऑफ सरोज’, ‘सन ऑफ सुजाता’ अशी आपली आईच्या नावाने ओळख सांगत ‘नई सोच’ हा हॅशटॅग फेमस केला. दुसरीकडे #मॉम बी अ गर्ल अगेन असा हॅशटॅग वापरून अमेझॉन इंडियाच्या जाहिरातीमध्ये आईसाठी सुंदर मेसेज दिला गेला. ही जाहिरात आणि पाठोपाठ हा हॅशटॅग सोशल मीडियावर फिरत होता. अशा प्रकारे जाहिरातीची टॅगलाइन हॅशटॅग म्हणून लोकप्रिय करण्याची मोहीम सध्या सगळ्याच क्षेत्रांत दिसत आहे. चित्रपट आणि नाटकांनीही जाहिरातीसाठी हा हॅशटॅगचा फंडा वापरलेला दिसतो.

हॅशटॅगिंग हा प्रकार नेटकरांसाठी नवा नाही. ट्विटरबरोबर वाढलेला हा प्रकार सोशल मीडियावर व्यक्त होताना हमखास वापरला जातो. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर तर या हॅशटॅगशिवाय कुठली पोस्ट दिसतच नाही हल्ली. आपणही #लव्ह #बेस्ट फ्रेंड #फन #पार्टी असे अनेक हॅशटॅग्स वापरत पोस्ट करतो, स्क्रोल करत असतो. हॅशटॅग हे आपल्या सोशल लाइफचा किती अविभाज्यक घटक बनले आहे हे  समजतं. दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी # संदेश टू सोल्जर नावाचा हॅशटॅग वापरून स्वत: एक सोशल मीडिया कँपेन सुरू केली आणि सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्याचा नवा मार्ग खुला झाला.

ट्विटरवर चिवचिव करता करताच या हॅशटॅगचा जन्म झाला. ख्रिस मेसिना या एका सोशल टेक्नॉलॉजी एक्स्पर्टने पहिलावहिला हॅशटॅग ऑगस्ट २००७ मध्ये वापरला. त्यानंतर ट्विटरबरोबरच इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाईक अशा सोशियल साइट्वरदेखील आनंद, दु:ख, मस्ती, मज्जा, प्रेम अशा वेगवेगळ्या भावभावनांचा पाऊस पडायला लागला सुरुवात झाली. त्यामागे हॅशटॅगही लागायला लागले. हॅशटॅगचा वापर  प्रभावी प्रसिद्धी करण्यासाठी अलीकडच्या काळात होऊ लागलाय. सोशल साइट्सवर हॅशटॅग चॅलेंजेसपण दिले जातात. उदाहरणार्थ मागच्या वर्षी आइस बकेट चॅलेंजनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर नुकतंच ‘बीट पे बुटी’ हे चॅलेंज असंच लोकप्रिय झालं. एकाने दुसऱ्याला ‘नॉमिनेट’ करत हा चॅलेंजचा खेळ पुढे चालू ठेवला जातो.

मराठी नाटक ‘अमर फोटो स्टुडिओ’ने शुभारंभाच्या प्रयोगापूर्वीच नाटकाच्या नावाचा हॅशटॅग लोकप्रिय केला होता. आपले जुने फोटो टाका, असं हे चॅलेंज #अमर फोटो स्टुडिओ या हॅशटॅगमुळे लोकांची उत्सुकता वाढवून गेलं.

आता तर हॅशटॅग हे डिझाइन एलिमेंट म्हणून रेस्टॉरंट्समध्ये वापरलं जात आहे. दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई इथे असणाऱ्या ‘सोशल’ या कॅफे बारमध्ये पाणी आणि ड्रिंक्स सव्‍‌र्ह करण्यासाठी #पाणी आणि#पौवा असं देवनागरीत लिहलेल्या ग्लासमध्ये देतात. ‘सोशल’चा हा यूएसपी समजला जातो.

२०१६ वर्षांतील काही गाजलेले हॅशटॅग :

#संदेश टू सोल्जर : सैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेली मोहीम

#मॅरीड नॉट ब्रॅण्डेड : ट्विंकल खन्नाचा ट्विटरवरचा गाजलेला हॅशटॅग.

#नई सोच : स्टार प्लसची अ‍ॅड कँपेन

#मॉम बी या गर्ल : अमेझॉन इंडियाचा जाहिरातीसाठी वापरलेला हॅशटॅग.

#बीट पे बुटी : ‘फ्लाइंग जट’ या सिनेमातील बीट पे बुटी या पॉप्युलर झालेल्या गाण्यावरून हे डान्स च्यालेंज सगळ्या सोशियल साइटवर धमाल वाजवत होतं.

#व्हॅल्यू युअरसेल्फ : हा प्रिया बापटचा वजनदार मूवीसाठी वापरलेला हॅशटॅग.