ऑनलाइन शॉपिंग करणारी तरुण पिढी वाढत चालली आहे, तशी ऑनलाइन शॉपिंगमध्ये वेगवेगळ्या सुविधाही येऊ लागल्या आहेत. ऑनलाइन शॉपिंगमध्ये वस्तू ट्राय करता येत नाही, हा सगळ्यात मोठा तोटा. पण टेक्नॉलॉजीच्या मदतीने आता त्यावरच मात करण्यात आली आहे. ट्राय बिफोर यू बाय म्हणत लाँच झालेल्या काही नव्या ऑनलाइन अ‍ॅप आणि सुविधांविषयी..

आजच्या तरुणाईला दहा दुकाने फिरून खरेदी करायला मुळात वेळ मिळत नाही आणि जेव्हा निवांत वेळ मिळतो तेव्हा त्यांच्या धावून धावून थकलेल्या जिवाला आराम हवा असतो. त्यात आता लग्नसराईच्या या गर्दीत बाजार फिरायला अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग चलतीत आहे आणि हळूहळू तो एक ट्रेण्ड होत चालला आहे.
पुस्तके, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, चपला ऑनलाइन खरेदी करणे ही आता सवयीची गोष्ट झालेली आहे; मात्र आता मेकअप, अ‍ॅक्सेसरीज अगदी सोन्याचे दागिनेदेखील ऑनलाइन खरेदी करता येताहेत आणि तेही विथ ट्रायल! सर्व प्रसिद्ध ज्वेलरी ब्रॅण्ड्सच्या स्वत:च्या वेबसाइट्स आहेतच. त्यावरून ऑनलाइन शॉपिंगचा पर्यायही काहींनी खुला करून दिला आहे. ‘पीएनजी’च्या ऑनलाइन शॉिपग सेक्शनमध्ये ऑनलाइन ट्राय ऑनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचं औपचारिक उद्घाटनही नुकतेच झाले. ऑनलाइन ट्राय-ऑनची जोड दिल्यामुळे आता फक्त तुमच्या कॉम्प्युटरचा वेबकॅम किंवा मोबाइलचा फ्रंट कॅमेरा वापरायचा आहे. ‘टर्न युअर सेल्फी इन्टू अ ‘ज्वेल्फी’ असं आम्ही याला नाव दिलंय. घरबसल्या तुम्ही दागिने ट्रायदेखील करू शकता आणि खरेदीही!’. असे ‘पीएनजी’च्या सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. ऑनलाइन ट्रायल रूम्ससोबतच मल्टिचॅनल शॉपिंगदेखील अनेक दागिन्यांच्या ब्रॅण्ड्सनी खुलं केलंय. पीएनजी व्यतिरिक्त कल्याण, तनिष्क अशा ज्वेलर्सनी मल्टिचॅनेल ई- शॉपिंग खुलं केलं आहे. त्यांचे दागिने अ‍ॅमेझॉन, इबे सारख्या वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत.
लग्नसराईच्या या दिवसात कपडे, दागिने यांसोबतच मेकअप किट, काजळ, लिपस्टिक्स, नेलपेंट इत्यादी सौंदर्यप्रसाधनांच्या खरेदीलादेखील जोर येणार. ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपल्याला या गोष्टींचीदेखील खरेदी करता येणार आहे. जबाँग, अ‍ॅमेझॉन यासारख्या आघाडीच्या साइट्सवर ब्युटी प्रॉडक्ट्सवर घसघशीत डिस्काउंट जाहीर झालाय, शिवाय ‘कॅश ऑन डिलिव्हरी’सारख्या सुविधादेखील उपलब्ध आहेत.

हेअर सलाँदेखील ऑनलाइन
सुंदर दिसण्यासाठी सतत काही तरी नवीन ट्राय करून बघणं, हा तरुणाईचा स्वभाव आहे. थोडय़ा थोडय़ा काळाने हेअरकट्स, ड्रेसिंग स्टाइल, अ‍ॅक्सेसरी स्टाइल बदलून आपल्याला नेमकं काय शोभून दिसतं हे शोधून काढण्याच्या प्रयत्नात अनेक जण असतात. हेअरकटच्या बाबतीत जर एखादी स्टाइल सूट झाली नाही तर तो सगळ्यांच्या चेष्टेचा विषय बनतो आणि ओरिजिनल लुक परत येईपर्यंत तीच स्टाइल सांभाळावी लागते. सलाँमधला कॅटलॉग बघूनही आपण कसे दिसू याचा स्पष्ट अंदाज येत नाही. टेक्नॉलॉजी इथेही आपल्या मदतीला धावून आलेली आहे. आपल्या सौंदर्यात भर घालणाऱ्या मेक-अप आणि हेअरस्टाइलसारख्या गोष्टींनीदेखील ऑनलाइन व्हच्र्युअल विश्वात पदार्पण केले आहे. हेअरस्टाइल आणि हेअरकट्सदेखील आपल्याला ‘मॉडीफेस’च्या ‘अल्टिमेट हेअरस्टाइल ट्राय-ऑन’ या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून ट्राय करून बघता येणार आहेत आणि स्वत:साठी हेअरकट्स स्वत: डिझाइनही करता येतात.
हौसेने विकत घेतलेल्या लिपस्टिकचा रंग आपल्याला चांगला दिसत नाही म्हणून वापरता येत नाही, परतही करता येत नाही आणि पैसे वाया घालवले म्हणून घरच्यांची बोलणीही खावी लागतात. या सगळ्यावर सोपा उपाय म्हणजे ‘ट्राय बीफोर यू बाय’! आपण कपडे ट्राय करतो, चपला ट्राय करतो पण मेकअप..तो कसा ट्राय करणार? याचं उत्तर प्ले स्टोअरकडे आहे. ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘लॅक्मे’ने ‘लॅक्मे मेकअप प्रो’ हे अ‍ॅप उपलब्ध करून दिलेले आहे. बाजारात असलेली लॅक्मेची सर्व प्रॉडक्ट्स त्यावर ट्रायलसाठी उपलब्ध आहेत. व्हच्र्युअल मेकअपच्या माध्यमातून आपल्या चेहऱ्याला साजेशी प्रॉडक्ट्स शोधून काढण्यास मदत होते. बाजारात नुकतीच नवीन आलेली प्रॉडक्टस्देखील व्हच्र्युअली वापरून बघता येतात. इतकंच नव्हे तर मॉडेल्सना मेकअप करून नवशिक्या ब्युटिशियन्सना सरावही करता येऊ शकतो. आपल्या सौंदर्याला ‘फिनिशिंग टच’ देण्यासाठी आता टेक्नॉलॉजीही पुढे सरसावली आहे..सो यूज युअर स्मार्टफोन्स फॉर स्मार्ट शॉपिंग..!
‘टर्न युवर सेल्फी इंटू अ ज्वेल्फी’ या नावानं ‘पीएनजी’च्या वेबसाईटवर ‘ट्राय ऑन’ची सुविधा देण्यात येतेय. अभिनेत्री रवीना टंडनच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. अशा सुविधा देणारी अ‍ॅप्स मेक-अप, दागिने, अ‍ॅक्सेसरीज विकणाऱ्या इतर शॉपिंग साईट्सनेही देऊ केली आहेत.

viva.loksatta@gmail.com