‘वूऽह््हूऽऽ फायनली आय गॉट इट’. काही तरी भलं मोठं घबाड हाती लागल्यासारखा आनंद समीधाच्या चेहऱ्यावर होता. याच आनंदाला जगजाहीर करण्यासाठी तिने लगेचच एका स्क्रीनशॉटसह स्टेट्स अपडेट केलं. तिला ‘पोकेमॉन’ मिळाला होता. लहानपणी कार्टून पाहताना ‘पिका पिका’ असं करणाऱ्या पिकाचूचा काही तरी संदर्भ असणारा हा गेम नक्की आहे तरी काय? असं विचारणाऱ्याला इन्स्टॉल करून बघा मग कळेल, अशा शब्दांत एकदम ऐटीत उत्तर देत समीधा ऑफलाइन गेली. पोकेमॉन गो या लोकेशन बेस्ड ऑगमेंटेड रिअॅलिटी गेमनं सध्या जगभरात अनेकांना वेड लावलंय. जीपीएस सुरू ठेवून स्क्रीनवर बघत रस्त्यावरून पोकेमॉन हुडकण्याचा हा खेळ. ‘कॅण्डीक्रश’, ‘टेम्पल रन’ यांसारख्या गेम्सचं खूळ डोक्यातून उतरतंय ना उतरतंय तोच आता स्मार्टफोनधारकांमध्ये पोकेमॉनला शोधण्याचे वारे वाहू लागले आहेत. एखाद्या शोधमोहिमेवर रुजू असलेल्यांप्रमाणे चौकस नजर ठेवत रस्त्याने चालताना अनेक जण पोकेमॉन शोधताना दिसतात.

‘पोकेमॉन गो’ हा गेम सध्या बराच लोकप्रिय झाला आहे. पोकेमॉन शोधण्यासाठी अनेक कुरापती केल्या जाताहेत. यामुळे परदेशात काही जणांना जिवाला मुकावं लागलंय, तर काही जण अनवधानानं देशाची सीमा ओलांडायला लागले आहेत. पण या खेळाचं खूळ काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये.

कुणाला कुठल्या पार्कात पोकेमॉन सापडले हे कळल्यावर तिकडे झुंबड उडते तर कुणाला समुद्रकिनारी. स्मशानभूमीत पोकेमॉन असल्याची खबर मिळताच तरुणाई तिथेही धावताना दिसतेय.
पोकेमॉन खेळता खेळता नकळत कॅनडाची सीमा ओलांडून अमेरिकेच्या हद्दीत दोन मुलं गेल्याचं नुकतंच उघड झालंय. न्यूझीलंडच्या एका तरुणानं १५१ पोकेमॉन पकडायचं उद्दिष्ट ठेवलंय आणि त्यासाठी खुळा चक्क नोकरी सोडून बसलाय. हे किस्से माध्यमांतून उमटत असताना आपल्या आसपास नजर टाकली, तर तिथेही या गेमनं आणलेल्या धुंदीचे किस्से बघायला मिळतात.
मित्र-मित्र भेटल्यानंतर हल्ली ‘मी एवढे पोकेमॉन मिळवले, तुझं काय?’ अशा प्रश्नाने सुरुवात होते. ‘काय राव कसं काय?’ची जागा ‘किती लेव्हल पार केल्या?’ने घेतली आहे. लहानपणी ‘पोकेमॉन’ हे कार्टून लागलं की, त्यातल्या विविध पोकेमॉन्सची नावं, त्यांची पॉवर या साऱ्याची सारासार माहिती ठेवणारी पिढी आता मोठी झाली असली तरी या गेमच्या रूपाने त्यांचं बालपणच त्यांच्यासमोर पुन्हा उभं राहिलं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. मुंबईच्या लालबाग भागात राहणारा विवेक सावंत पोकेमॉन शोधत शोधत फाइव्ह गार्डन परिसरात आला, तेव्हा त्याला तिथे पोकेमॉन भेटला. हा अनुभव सांगत असताना, ‘पोकेमॉन शोधण्यात एक वेगळीच मजा आहे, पण या पोकेमॉनच्या नादात रस्त्यात काही जणांना नकळत माझा धक्का लागल्यामुळे त्यांच्या रागाच्या नजराही माझ्यावर रोखल्या होत्या’, हे सांगायलाही विवेक विसरला नाही.

पोकेमॉनच्या शोधात निघालेल्या अशाच एका मैत्रिणीला सुप्रसिद्ध ‘विरार लोकल’च्या गर्दीत भाईंदरच्या खाडी परिसरात एक पोकेमॉन मिळाला. ट्रेनमध्येच तिनं जल्लोष केला. परिमलला मात्र या गेमची प्रचंड चीड आहे. कारण पोकेमॉन शोधण्याच्या नादात त्याची गर्लफ्रेंड त्याच्या फोनला कधी कधी उत्तरही देत नाही. स्टेशन, मार्केट, एसटी स्टॅण्ड, अगदी रुग्णालयांमध्येही हे पोकेमॉन दडलेले आहेत. खरंच पोकेमॉन गोचं हे वादळ आता एवढं वाढलं आहे, की कॉलेज बंक करून मुलं रस्तोरस्ती फिरताना दिसताहेत. काही जणांना पोकेमॉन पटापट मिळतात म्हणून फार आनंद वाटत आहे, तर बऱ्याच जणांच्या हाती निराशा आल्यामुळे ‘यार.. आम्ही काय पाप केलंय? आम्हाला का नाही मिळत पोकेमॉन..?’ असा त्रागा ऐकू येतोय. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा सोशल नेटवर्किंग साइट्सवरही हॅशटॅगची जोड देत ‘पोकेमॉन गो’चा ट्रेंड गाजतो आहे. हा खेळ खेळताना मुलं रस्ता चुकतील, भरकटतील, अपघात होईल म्हणून सुरक्षा यंत्रणाही सजग झाली आहे. आपल्या विधानसभेतही पोकेमॉनची चर्चा झाली. या जपानी पोकेमॉननं जगाला वेड लावलंय हे खरं!

– सायली पाटील