मराठी मालिकांच्या वेशभूषेचं, दागिन्यांच्या स्टायलिंगचं अनुकरण प्रेक्षकांकडून अनेकदा होतं. मात्र त्याचं अधिकृत र्मचडायजिंग होताना दिसत नाही. हल्ली सोशल मीडियामुळे यामागचे कलाकार हळूहळू प्रकाशात येऊ लागले आहेत.

‘‘अगं, मला ना त्या मानसीचे अनारकली कुर्ते खूप आवडतात. मला अगदी अशाच स्टाइलचा कुर्ता घ्यायचाय. कुठे मिळेल काही आयडिया?’’

‘‘शनायाचे वनपीस कसले कुल असतात ना!’’

‘‘अंजलीचं ब्रेसलेट किती छान आहे नाही..’’

‘‘ट्रॅडिशनल वेअरवर ती बानूसारखी नथ घाल. फार ट्रेण्डिंग आहे सध्या.’’

या संवादांमध्ये चर्चा चालेल्या मानसी, शनाया, अंजली, बानू या कुणी खऱ्याखुऱ्या व्यक्ती नाहीत, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल. ही मालिकांमधील पात्रं आहेत. मालिका, चित्रपट यातून दिसणारी फॅशन फार लवकर जनमानसात रुजते. प्रेक्षकांना त्या पात्रांची स्टाइल आवडते आणि त्यांचे दागिने तसे कपडे हवेहवेसे वाटतात. मालिकेतील पात्रं तर आपल्याला अगदी आपल्याच घरातली एक झालेली असतात. मराठी चित्रपटांमधली फॅशन फारशी फॉलो केली जात नसली तरी मालिकांमधील फॅशन थोडय़ा कालावधीतच आपल्या आजूबाजूला दिसायला लागते. चित्रपट हे एका अर्थाने फॅशनबद्दल प्रेरणा देणारे असतात; पण मालिकेतली पात्रं ही प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटत असल्यामुळे त्याची जीवनशैली प्रेक्षक आत्मसात करू पाहतात.

‘जान्हवी’चं मंगळसूत्र, ‘बानू’ची नथ, ‘म्हाळसा’च्या हेअर अ‍ॅक्सेसरीज किंवा याआधी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधल्या ‘राधा’ची नोजपिन त्या त्या व्यक्तिरेखांच्या नावाने विकल्या जाणाऱ्या या वस्तू आहेत. ग्राहक दुकानांमध्ये आवर्जून या व्यक्तिरेखांच्या नावानेच या गोष्टींची चौकशी करतात. मालिकेतील नायिकांच्या साडय़ा तर त्यांच्या नावाची पट्टी लावून विकल्या जातात, पण या सगळ्या प्रचार- प्रसारात मालिकांच्या कर्त्यांचा किंवा त्या त्या वाहिनींचा किती सहभाग असतो याबद्दल शंका आहे. अद्याप मराठी मालिकांसाठी तरी असं रीतसर र्मचडायजिंग केल्याचं ऐकिवात नाही. एवढी तुफानी लोकप्रियता असूनदेखील र्मचडायजिंग का होत नाही, हे एक कोडंच आहे.

प्रेक्षक फार बारकाईने मालिका पाहत असतात. घरांच्या सेटमध्ये होणारे बदल, पात्रांची वेशभूषा, केशभूषा याकडे त्यांचं लक्ष असतं. याबद्दल हिंदी मालिका- चित्रपट निर्मात्या आणि लोकप्रिय वाहिन्यांच्या क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केलेल्या अश्विनी यार्दी सांगतात, ‘‘मालिकांमध्ये त्या पात्रांनी नेसलेल्या साडय़ांची चौकशी होते. आम्हाला तर सोफ्यांच्याही ऑर्डर्स आलेल्या होत्या. तुम्ही सेटवरच्या भिंतीवरचं पेंटिंग जरी बदललं तरी लोकांचा फोन येतो की, तुम्ही पेंटिंग का बदललं? काल भगव्या रंगाचं होतं, आज ते निळ्या रंगाचं आहे, अशी चौकशी सातत्याने केली जाते. मालिकांचा प्रेक्षकांवर खूप प्रभाव पडतो. त्यामुळे त्यांची जीवनशैली बदलते.’’

फ्रेण्ड्स, डिस्नेच्या अ‍ॅनिमेटेड मालिका अशा लोकप्रिय इंग्रजी टीव्ही मालिका स्वत:च्या प्रचार, प्रसिद्धीसाठी आणि त्यातून व्यापारसंधी शोधण्याच्या उद्देशाने र्मचडाइज्ड उत्पादनं स्वत:च बाजारात आणतात. या मालिकांची अधिकृत वेबपेजेस तयार करून त्यावरून मालिकांमधील पात्रांचे कपडे किंवा इतर फॅशन अ‍ॅक्सेसरीजची विक्री केली जाते. त्यावर त्यांचे कॉपीराइट असतात. असंच पोटेन्शियल मराठी मालिकांच्या पात्रांच्या वेशभूषेतदेखील दिसून येतं. मात्र त्यातून र्मचडायजिंग अद्याप केलं जात नाही. केवळ नायिकांच्याच नाही, तर नायकांच्या स्टाइलदेखील प्रेक्षकांना भावतात आणि त्यांच्यासारखे कपडे, हेअरस्टाइल्स करायची त्यांची इच्छा असते. नुकत्याच सुरू झालेल्या ‘दिल दोस्ती दोबारा’मधून साहिलचे टी-शर्ट हल्ली अनेकांचं लक्ष वेधून घेताहेत. काहीसे हटके आणि कुल वाक्य, ग्राफिक्स असलेले अमेय वाघ रंगवत असलेल्या साहिलचे टी-शर्ट मुला-मुलींमध्ये लोकप्रिय आहेत. आणि करा काम’ असं लिहिलेलं असेल किंवा ‘क ख ग’ खालोखाल ‘आ गा ऊ ’ लिहिलेल्या टी-शर्टने तर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्याबद्दल आता विचारणा होऊ  लागली आहे. याबद्दल मालिकेच्या वेशभूषाकार पूजा कामत यांना विचारलं असता, ‘मालिकेच्या कथानकानुसार त्या पात्रांची योजना आहे आणि त्या पात्रांची व्यक्तिमत्त्व त्यांच्या वेशभूषेतूनही अधोरेखित व्हायला हवीत, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे भूमिकांचा विचार करूनच यातील नायकांची वेशभूषा ठरवली जाते. तो कसा असेल, काय करत असेल, कसा वागत असेल या दृष्टिकोनातून मग त्याची कलर स्कीम ठरते, तो कोणत्या प्रकारचे कपडे घालू शकतो याचा विचार केला जातो. साहिल या पात्राकडे थोडा सारकॅझमदेखील आहे.  यानुसार आम्ही ठरवलं की, त्याला प्रिंटेड टी-शर्ट देऊ या. मालिकेच्या लेखकांनी मला काही ओळी दिल्या ज्या आम्ही टी-शर्टवर वापरल्या. त्याचं डिझायनिंग करून आम्ही त्याचं स्क्रीन प्रिंटिंग करून ते टी-शर्ट तयार केले. ‘दिल दोस्ती दोबारा’ ही मालिका तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे, मग त्यांना काय आवडेल या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांची वेशभूषा केली जाते. यातील पात्रांच्या फॅशन अ‍ॅक्सेसरीजदेखील आम्ही विचारपूर्वक स्वत: बनवल्या आहेत. त्यामुळे एक वेगळा लुक दिसलेला आहे,’’ असं त्या म्हणाल्या.

यापूर्वी ‘का रे दुरावा’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘१०० डेज’ या मालिकांसाठी वेशभूषेची जबाबदारी पूजा यांनी पार पाडली आहे. ‘दिल दोस्ती दोबारा’मधील साहिलच्या टी-शर्टबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी हे कुठे मिळतील याची विचारणा केली. याबद्दल काही टायअपचा विचार आहे का, असं विचारल्यावर पूजा म्हणाल्या, ‘‘सुरुवातीला तरी र्मचडायजिंगबद्दल विचार केलेला नव्हता, पण प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता पुढील काही काळातच ते करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. वाहिनीची धोरणं लक्षात घेऊन पुढे गोष्टी ठरवल्या जातील.’’ मराठी मालिका यानिमित्ताने स्वत:चं असं फॅशन आणि स्टाइल स्टेटमेंट घेऊन आल्या आहेत आणि असं र्मचडायजिंग झालं तर आपल्या लाडक्या कलाकारांसारखे कपडे सहज उपलब्ध होतील.

दिल दोस्ती दोबारासारखी मालिका तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे, त्यातील प्रत्येक पात्राच्या अ‍ॅक्सेसरीजदेखील आम्ही विचारपूर्वक बनवल्या आहेत. साहिलच्या टीशर्टबद्दल मला अनेकांकडून विचारणा झाली. सुरुवातीला र्मचडायजिंगबद्दल विचार केला नव्हता. पण प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. वाहिनीचं धोरण लक्षात घेऊन पुढील गोष्टी ठरवल्या जातील.   – पूजा कामत, वेशभूषाकार

 

– कोमल आचरेकर

viva@expressindia.com