कुर्ला स्थानकाबाहेरील बजबजपुरी पाहून कोणताही माणूस त्या ठिकाणी खाण्याची हिंमत करणार नाही. पण खाबूचा यार हसन बैदा याने कुल्र्यात पॅटिस उत्तम मिळतात, असं सांगितलं आणि खाबूने कुल्र्याला उतरण्याची हिंमत केली..

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवरील प्रत्येक स्टेशन आपापलं व्यक्तिमत्त्व घेऊन उभं आहे. व्हिक्टोरिया टर्मिनस म्हटलं की, खाबूला कडक इस्त्री केलेली विजार, पांढराशुभ्र शर्ट, त्यावर कोट आणि डोक्यावर गोल हॅट घातलेला एखादा टापटीप माणूस आणि गुलाबी रंगाच्या झग्यात व डोक्यावर गुलाबी हॅट घालून उभी असलेली तेवढीच टापटीप मड्डम दिसायला लागते. चिंचपोकळी-करीरोड स्थानकांच्या मागे मळका बुशशर्ट आणि चुरगळलेली विजार घातलेला माणूस दिसतो. त्याच्या त्या मळक्या बुशशर्टामागे त्याने दिवसभर केलेली मेहनत असते. दादर स्थानक म्हणजे पांढराशुभ्र पायजमा आणि त्यावर तसाच पांढरा शर्ट, गळ्यात माळ, डोक्यावर पांढरी गांधी टोपी, कपाळावर बुक्का वगैरे लावलेला सधन भाजी व्यापारी डोळ्यासमोर यावा.. असं प्रत्येक स्थानकाचं वर्णन करता येईल. या स्थानकांमधील कल्याण आणि कुर्ला या दोन स्थानकांचा उल्लेख केल्यावर अनेक महिने आंघोळ न केलेल्या, अंगावर धुळीची पुटं चढलेल्या, केसांच्या जटा झालेल्या, डोळ्यातली चिपाडं दिसणाऱ्या आणि प्लॅटफॉर्मच्या एका कोपऱ्यात अर्धवट शुद्धीत लोळत असलेल्या भिकाऱ्याची आठवण व्हावी! हा कदाचित खाबूच्या नजरेचा दोष असेलही बापडा, पण हे असं होतं खरं..
तर अशा या कुर्ला स्थानकात अपरिहार्य कारणाशिवाय खाबू उतरतच नाही. एकेकाळी खाबूने आपल्या आयुष्यातील सोन्यासारखी दोन र्वष याच कुल्र्याजवळच्या कालिना विद्यापीठाच्या कॅम्पसवर वाया घालवली होती. त्या वेळी शहाण्या बाळासारखा खाबू दर दिवशी पाऊसपाण्याची तमा न बाळगता ३१८ क्रमांकाची बस पकडण्यासाठी कुर्ला स्थानकात उतरायचा. त्यानंतर खाबूने आपणहून काही या स्थानकावर पाय ठेवण्याचं धाष्टर्य़ केलं नाही. पण परवा खाबूचा पंटर आणि खाद्य खबरी हसन बैदा याचा फोन आला आणि त्याने खाबूला कुल्र्यात तश्रीफ पेश करायला सांगितली.
हसन बैदा हादेखील खाबूच्या अनेक पंटरलोकांपैकी मुक्त संचारी आहे. सदैव ती चौकडय़ांची लुंगी, वरती शुभ्र कुर्ता, डोक्यावर नक्षीकाम केलेली टोपी, हनुवटीखाली लोंबणारी बोकडाच्या दाढीसारखी ती दाढी, दाढीचे केस मस्त मेहेंदी वगैरे लावून चमकवलेले, डोळ्यात सुरमा, कानाच्या पाळीमागे अत्तराचा बोळा आणि तोंडात कायम कलकत्ता पान; ते नसेल, तर हातात चिलीम! फार दिवसांनी हसनने फोन केला म्हटल्यावर खाबूला कुल्र्याला उतरणं भाग होतं. मग खाबू आपली तश्रीफ घेऊन कुल्र्याला उतरला आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या तिकीट घराजवळ जाऊन हसनने सांगितलेल्या ठिकाणी उभा राहिला. कुर्ला स्थानक हा मोठा अजबखाना आहे. बीकेसीमधील चकचकीत ऑफिसांमध्ये जाणारी पॉश गर्दी, कालिना विद्यापीठात जाण्यासाठी उतरलेले विद्यार्थी, एलबीएस मार्गाला खेटून असलेल्या मोठय़ा ऑटोमोबाइल भंगार बाजारातून चीजवस्तू घेण्यासाठी उतरलेले ब्लू कॉलर्ड लोक असं खदखदं त्या स्थानकात उतरतं.
खाबू या विभिन्न गर्दीकडे बघत होता तेवढय़ात त्याच्या पाठीवर हसन बैदाची सणसणीत थाप पडली. ‘क्या खाबूमियाँ, तुमकू कित्ती बार फोनूं लगाया.. तुम्हारा अतापता नहीं,’ आपल्या अस्सल हैद्राबादी शैलीत हसनने खाबूचं स्वागत केलं आणि पुढे खाबूला काही बोलायची संधीच न देता, ‘डरनेंकू नहीं.. मेरे पिच्छू पिच्छू चलों. एकदम बढिया चीज खिलाता हूँ’ असं सांगत त्याने खाबूला त्या तिकीटघराबाहेर अक्षरश: खेचलं. स्टेशनबाहेर पडतो तोच उजव्या बाजूला एका छोटय़ाशा हॉटेलवजा ठेल्यात हसन शिरला. खाबूने मागोमाग जाताना त्या हॉटेलाचं नाव बघितलं. ‘ श्री गुरू नानक’ या नावापुढे ‘प्युअर व्हेज’ हे बघितल्यानंतर खाबू आश्चर्यचकित झाला. हसन बैदाने खाबूला एका शुद्ध शाकाहारी हॉटेलात घेऊन जाणं म्हणजे नरेंद्र मोदी यांनी ट्विटरसंन्यास घेण्याइतकीच अशक्यप्राय गोष्ट! पण खाबू बिचारा करतो काय, गपचूप आत जाऊन बसला. श्री गुरू नानक हे अत्यंत छोटेखानी हॉटेल आहे. जेमतेम पाच टेबलं आणि अंदाजे २० लोक बसू शकतील एवढीच जागा! मिळणारे पदार्थही मोजकेच आहेत. पॅटिस, दही पॅटिस, दही शेवपुरी, पाणीपुरी, दहीवडा, मिसळ पाव, उसळ पाव आणि लस्सी या एवढय़ा पदार्थामध्ये या हॉटेलचं मेन्युकार्ड संपतं. त्यामुळे इथे खायचं काय, हा प्रश्न कठीण नव्हता. हसनने एक सिंगल पॅटिस आणि एक दही पॅटिस मागवलं. खाबूने तेवढय़ात भोवतालावर नजर टाकली. खरंच एखाद्या खोपटासारखं हे हॉटेल बघून खाबूला शहापूरच्या त्या फेमस ‘भाकरी-मिसळ’वाल्या हॉटेलची आठवण झाली. भिंतींवर ‘डब्यातून खाद्यपदार्थ आणून येथे खाण्याची मुभा नाही’, ‘एकदा दिलेली ऑर्डर मागे घेतली जाणार नाही’ छाप पाटय़ा लावल्या आहेत.
हे निरीक्षण चालू असताना तिथल्या चाचाने खाबू आणि हसनसमोर त्यांच्या डिश आणून ठेवल्या. हसनने त्याला परत बोलावून मिठा चटनीं आणायला सांगितली. चहावाल्यांकडे स्टीलचे छोटे ग्लास असतात, तशा ग्लासमध्ये त्याने ती मिठा चटणी आणून ठेवली. समोरच्या प्लेटमध्ये एक पॅटिस, हसनने मागवलेला पाव, एका रकान्यात छोले आणि दुसऱ्या रकान्यात चटपटा चटणी होती. तर खाबूच्या प्लेटमध्ये पॅटिस, त्यावर टाकलेले छोले, त्यावर दही आणि त्या दह्य़ावर शेवेची पखरण होती. हसनने दोन्ही प्लेटमध्ये ती गोड चटणी थोडी थोडी ओतून खाबूला, ‘खाबूमियाँ, अब खानेकूं इंतिजार करनेंकू नय’ असं सांगत स्वत:च्या प्लेटकडे मोर्चा वळवला.
खाबूने त्या पॅटिसचा तुकडा मोडून चमच्यावर घेत त्यावर दही, शेव आणि छोले घेतले आणि चमचा तोंडात सारला. पॅटिसची कुरकुरीत चव, बटाटय़ांमध्ये टाकलेला मसाला, छोल्याचा चटपटा स्वाद, दह्य़ाची सुंदर चव, शेवेचा खारटपणा आणि गोड चटणीचा अभूतपूर्व स्वाद यांमुळे खाबूची आत्मानंदी टाळी लागली. हसनच्या प्लेटमध्ये चमचा घालत खाबूने मैत्रधर्माला जागत त्याच्या प्लेटमधलं पॅटिसही चाखून बघितलं. नुसत्या पॅटिसची चवही खूप छान होती. पुढचा काळ खाबूने आपल्या प्लेटमधून डोकं वर काढलं नाही. शेवटी तर पॅटिस संपल्यावर फक्त दही, शेव, छोले आणि चटपटा व गोड चटणी यांच्या अद्वैताचा समाचार खाबूने अगदीच आदीम पद्धतीने बोटांनी प्लेट चाटून वगैरे घेतला.
तेवढय़ात हसनने पाणीपुरी प्लेटची ऑर्डर दिली होती. वास्तविक खाबूला पाणीपुरी नेहमीच उभं राहून खायला आवडते. पुऱ्या देणाऱ्या भैयाशी शर्यत लावल्याप्रमाणे त्याची पुरी भरून व्हायच्या आत पहिले दिलेली पुरी संपवायची आणि प्लेट पुढे करायची, ही गोष्ट खाबूला खूपच आवडते. त्यामुळे टेबलावर बसून प्लेटमध्ये आलेल्या पुऱ्यांमध्ये आपलं आपणच पाणी आणि चटणी टाकून खाण्याबाबत खाबू नाराज असतो. पण इथे हसन बैदापुढे खाबूचा नाइलाज होता.
यथावकाश ती प्लेट आली. त्या प्लेटमध्ये मधोमध एक वाटी, त्या वाटीत एक पुरी आणि त्या वाटीभोवती सहा पुऱ्या सजवल्या होत्या. प्रत्येक प्लेटमध्ये ओली बुंदी आणि चाट मसाला टाकला होता. त्याशिवाय एका पेल्यात पाणीपुरीचं ते जगप्रसिद्ध पाणी होतं. खाबूने लगेचच मिठा चटनींचा ग्लास मागवला. टेबलावर बसून खाल्लेली पाणीपुरीदेखील एवढी सुंदर लागू शकते, हे खाबूला माहीत नव्हतं. त्यात त्या चटण्यांबरोबरच पुरीचाही मोलाचा वाटा होता. ही पुरी मस्त कुरकुरीत होती. अशी पुरी कमी ठिकाणी खायला मिळते, हेदेखील जाताजाता नमूद करायला हवं.
आता हे पदार्थ काही फार महागही नाहीत. सिंगल पॅटिस २७ रुपये, सिंगल दही पॅटिस ३२ रुपये, पाणीपुरी ३० रुपये असे दर आहेत. त्याशिवाय या ठिकाणी मिसळ पावदेखील मिळतो. पण श्री गुरू नानक असं भारदस्त आणि अस्सल पंजाबी नाव असलेल्या ठिकाणी जाऊन मिसळ पाव खायचा म्हणजे मोहम्मद अली रोडवर जाऊन व्हेजचा शोध घेण्यासारखं आहे. तो नाद खाबूने केला नाही. या हॉटेलातून बाहेर पडता पडता कमळ चिखलात उगवतं, या विरोधाभासावर खाबूचा पुन्हा एकदा विश्वास बसला आणि चवीचं व स्वच्छतेचं एकमेकांशी असलंच, तर व्यस्त गुणोत्तर आहे हे सिद्ध झालं. कुर्ला स्थानकातही अधूनमधून उतरायला खाबूला एवढं सुंदर निमित्त मिळालं, हेदेखील नसे थोडके! ठ

कुठे : श्री गुरुनानक
कसे जाल : कुर्ला स्थानकात उतरल्यानंतर कुर्ला पश्चिमेला एक तिकीट खिडकी आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या मध्यावर असलेल्या या तिकीटघरातून बाहेर पडल्यावर तिथे रिक्षांची रांग दिसते. अगदी दहा मीटर चालल्यावर उजव्या बाजूलाच हे श्री गुरुनानक प्युअर व्हेज हॉटेलवजा खोपटं दिसेल. हॉटेलच्या बाहेरच तव्यावर पडलेली अनेक पॅटिस दिसतील. तो गंध नाकात साठवत बिनदिक्कत आत शिरा.