ट्रेकर’ हा मुळात एक स्वभाव आहे. कुठल्याही लौकिक संकटावर मात करून, त्यावर पाय रोवून सह्य़ाद्रीसारखीच भक्कम उभी राहणारी व्यक्ती म्हणजे ‘ट्रेकर’. तरुणाईला सह्य़ाद्रीच्या कुशीत का भटकावंसं वाटतं, याचं उत्तर या स्वभावात आहे.

निदान महाराष्ट्रामध्ये पावसाची मनापासून प्रतीक्षा करणारे प्रामुख्याने तीन जीव आढळून येतात. पहिला म्हणजे ज्याला भारतातील कवींनी नावारूपाला आणलं तो चातक पक्षी, दुसरा जगाचे पोट भरणारा- अन्नदाता शेतकरी आणि तिसरा सह्य़ाद्रीच्या मनापलीकडे प्रेमात पडलेला खरा ‘ट्रेकर’!
खरंतर शेकडो तरुण ट्रेकिंग या एका कारणासाठी पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहताना दिसतात आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अशा ट्रेकप्रेमींचा टक्का दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर काही ग्रुप्स केवळ याच कारणासाठी बनवले जातात आणि इतर वेळी कोमात असलेले हे ग्रुप्स नवसंजीवनी मिळावी तसे या काळात चुरूचुरू बोलायला लागतात. ट्रेकिंगला जे अद्याप परिचित नाहीत अशांची कधी स्वत:हून तयारी दिसते तर काहींची मनधरणी करावी लागते (खरं तर ते आधीच मनातून तयार झालेले असतात, फक्त त्यांना आपल्याला कुणी किंचित आग्रह करावा असं वाटत असतं.) आणि मग अशा नवजात ट्रेकर्ससाठी अगदी ‘सोप्या’ श्रेणीतला एखादा राजमाची किंवा लोहगडासारखा किल्ला ठरवला जातो आणि एकदा का तो ट्रेक सुफळसंपन्न झाला की हेच नवजात ट्रेकर्स ‘पुढचा ट्रेक कधी?’ म्हणून मागे लागताना दिसतात.
ट्रेकिंग हा एक संस्कार आहे असं कधी कधी वाटतं. टीम बिल्िंडग, एकमेकांना ‘निरपेक्ष’ केली जाणारी मदत, आहोत त्या परिस्थितीत आनंद साजरा करणं अशा शेकडो गोष्टी तुम्ही घरी येताना आपल्या अनुभवांच्या चोपडीतून सुरक्षित आणत असता. अशा ट्रेक्सच्या निमित्ताने गडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावातील लोकांच्या ओळखी होतात. त्यांचा दानशूरपणा, आपणहून मदत करण्याची वृत्ती, आपण किती खुज्या दिलाने जगतो याचा प्रत्यय देते. अशातच त्या गावातील एक वाटाडय़ा आपण आपल्या सोबतीला घेतो आणि त्याच्याकडून गडाचा एक एक कोपरा माहिती करून घेताना आपण स्तिमीत होत जातो, त्याची चपळाई बघून आपल्या भीतीने थरथरणाऱ्या पायांची आपल्याला लाज वाटू लागते. मनातल्या मनात आपण त्याला ‘मान गये बॉस’ अशी शाब्बासकीही देतो. कधी तरी त्याची बरोबरी करायचा आपण आगाऊपणा करतो आणि धाडदिशी एखाद्या दगडावर आपटतो. हासुद्धा एक अनुभव मानून आपण ट्रेक सुरूच ठेवतो हे विशेष!
थकून-भागून किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर घामाने चिंब झालेल्या शरीरावर शाब्बासकीसारखा थंड वाटणारा तो सुखद वारा आपल्याला धुंद करतो. नंतर एखादी गुहा, लेणी, मंदिर, आदिवासी कुटुंबाचं एखादं घर, पडकंमंदिर किंवा सरळ सरळ सोबत आणलेला तंबू योग्य ती जागा बघून आपण उभारू लागतो. आपण काही क्षण विसावा घेऊ म्हणतो पण ते शक्य नसतं. कारण पोटातले मावळे एल्गार करत असतात. चार सुकी लाकडं, तीन भक्कम दगड शोधून अनुभवी ट्रेकरकडून चूल मांडली जाते, ग्रुपमधली सगळी मंडळी (अगदी घरी जे स्वयंपाकघरात फक्त जेवणापुरता जातात तेसुद्धा) आपणहून सुरीने भाजी, कांदा कापू लागतात आणि अशातच त्या मंद ओल्या वातावरणात आपल्याचपैकी कुणी बनवलेल्या अन्नावर आपण ताव मारतो (भूकच अशी सणकून लागते की चवीकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं).
अशातच रात्री गप्पा, गाणी, टिंगल, मस्करी यात वेळ कसा निघून जातो कळत नाही. रोज मऊ गाद्यांवर निद्रा घेणारे जीव आज खडकाचीच शय्या करतात. एखादी चटई किंवा तत्सम गोष्टीवर अंग टाकतात आणि केव्हा झोपेच्या कुशीत सह्य़ाद्री त्यांना कधी घेऊन जातो हे त्यांच्याही लक्षात येत नाही. सह्य़ाद्रीतले अनेक तगडे किल्ले अनुभवी ट्रेकर्सना खुणावतात. आणि अशात जर एखादा नवखा ट्रेकर गेला तर आयुष्यात तो ट्रेकिंगच नाव काढत नाही.
गावाकडे एकटे राहणारे आजोबा शाळांना सुट्टी लागल्यानंतर जशी नातवंडांची वाट बघतात, तसा कधी कधी हा सह्य़ाद्री जाणवतो. महाराजांनी याच सह्य़ाद्रीच्या कुशीत बांधलेले असेच शेकडो किल्ले म्हणजे या आजोबांची खाऊची पिशवी भासते, ज्यातून ही ट्रेकर्स मंडळी मनसोक्त आनंदाचा मेवा लुटतात आणि जमिनीवरच्या लोकांना सांगण्याकरिता हजारो अनुभव घेऊन परत येतात. ‘ट्रेकर’ हा मुळात एक स्वभाव आहे. कुठल्याही लौकिक संकटावर मात करून, त्यावर पाय रोवून सह्य़ाद्रीसारखाच भक्कम उभा राहणारा व्यकती म्हणजे ‘ट्रेकर’. अशा या अवलियांसाठी आजचा दिवस ‘गेट सेट’ होऊन सुसाटपणे ‘गो’ होण्याचा आहे, यात शंका नाही.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत