तुम्ही जरा तिला सांगा समजावून. नुकताच दहावीचा निकाल लागलाय तिचा. तिच्या मैत्रिणी जाताहेत सायन्सला म्हणून तिला सायन्स घ्यायचंय. ती म्हणते की असं मुळीच नाहीये, मला विज्ञानामध्ये सगळ्यात जास्त गुण आहेत मग मी का नाही सायन्स घ्यायचं? तिचे वडील सीए आहेत. मीही बँकेत कामाला आहे. तिने कॉमर्स घेतलं तर तिला खूप सोपं जाईल. तिने सायन्स घेतलं तर आम्ही तिला मुळीच मार्गदर्शन करू शकणार नाही. दुसरं म्हणजे तिला विज्ञान विषयाची मुळीच आवड नाही. दहावीत गुण मिळाले त्यावर जाण्यात अर्थ नाही. दहावीत हल्ली सगळ्यांनाच चांगले गुण मिळतात. तेही शेवटी तिने अभ्यासात जोर मारला म्हणून शक्य झालं. तेही मैत्रिणींच्याच प्रभावामुळे. आम्हाला तिचे विज्ञानातील गुण पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. अगदी शाळेतल्या अखेरच्या परीक्षेपर्यंत तिला विज्ञानात ठीकठीकच गुण होते. आमचं म्हणणं हेच की मैत्रिणींच्या नादाने तू तुझं सगळं आयुष्य थोडंच जगणार आहेस? आमचे वाद होताहेत घरात यावरून.’ आई आपली कैफियत खरोखरच कळकळीने मांडत होती.

मुलीचा चेहरा थोडासा नाराज होता. ‘मला नाही कॉमर्स घ्यायचं. आईबाबा सक्ती करताहेत माझ्यावर. त्यांचा विषय आहे म्हणून.’

‘तुला विज्ञानात चांगले गुण मिळाले. पण मला एक अगदी खरं सांग. तुला विज्ञान मनापासून आवडतं का?  दुसरं, तू पुढे काय करणार?’

‘अं.. मी इंजिनीअरिंग करायचं म्हणतेय. खरं म्हणजे मला फिजिक्स आणि केमिस्ट्री अजिबात आवडत नाहीत. बायोलॉजी त्यातल्या त्यात आवडते. गणित मला फारसं आवडत नाही. गणिताची मला थोडीशी भीती आहे म्हटलं तरी चालेल.’

‘म्हणजे सायन्समधल्या चार मुख्य विषयांपैकी तीन तुला आवडतच नाहीत. त्यातही इंजिनीअरिंगचे तिन्ही विषय तुला आवडत नाहीत असं दिसतंय. अकरावीत गेल्यावर अभ्यासाची पातळी उंचावते. विज्ञानासारखे विषय खोलातून शिकण्यासाठी अभ्यास करण्याची तयारी लागते. तुला जे विषय मनापासून आवडत नाहीत ते दोन वर्षे सतत तू कितीही रेटा लावलास तरी करू शकशील का? रडतखडत कसातरी अभ्यास करून पुढे जरी इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश मिळाला तरी न आवडणाऱ्या विषयात पुढची चार वर्षे तू कसा टिकाव धरणार आहेस? असे निर्णय घेतल्यामुळे दु:खी झालेले, अगदी नैराश्यापर्यंत गेलेले अनेक विद्यार्थी मी रोज बघतो.’

‘म्हणजे मी कॉमर्सच घेऊ असं तुमचं म्हणणं आहे?’

‘असं माझं म्हणणं मुळीच नाही. पुढचा प्रश्न, तुला अगदी मनापासून काय करायला आवडतं?’

‘मला लिहायला आवडतं. माझ्या भाषा खूप छान आहेत. मला वाचायला आवडतं. माझी चित्रकला खूप छान आहे. चित्रकलेच्या परीक्षांमध्ये मला ए ग्रेड्स आहेत.’

‘अरे वा.. म्हणजे तुझ्यात जे चांगलं आहे ते तू वापरणार नाहीस आणि जे फारसं चांगलं नाही ते चाबूक मारून मारून पुढे रेटणार आणि दु:खी होणार. हे तुला योग्य वाटतंय का? तू कलाक्षेत्राचा विचारच केला नाहीयेस. मला वाटतं की, कलाक्षेत्राशी निगडित अनेक वेगवेगळ्या शाखांबद्दल तुला विचार करता येईल. त्यासाठी तू एखाद्या व्यवसाय मार्गदर्शन करणाऱ्या समुपदेशकाची मदत घ्यावीस.’

दहावीचे गुण फसवे असतात. त्या एकमेव निकषावर पुढची शाखा निवडण्यात धोका असतो. क्षमता आणि आवड यांची सांगड घालून पुढच्या क्षेत्राची निवड करावी. आपण निवडलेलं क्षेत्र हे आपल्या कपडय़ासारखं असतं. ते आपल्या अंगावर नीटपणे घेऊन वापरता यायला हवं. दुसऱ्या कुणाच्यातरी मापाचा कपडा आपण घ्यायचा आणि त्यात स्वत:ला कोंबू पाहायचं हे जितकं विसंगत आहे तितकंच आपल्याला आवडत नसलेल्या किंवा नीट येत नसलेल्या विषयातील शाखा अभ्यासासाठी निवडणं आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनो आपापल्या मापाचे कपडे शिवा!

drmanoj2610@gmail.com