‘फलेन फलितं सर्व, त्रलोक्यं सचराचरम्..’ या मंत्रोच्चाराबरोबर गणपतीच्या पूजेच्या वेळी आपण प्रथम नारळ व त्याचबरोबर केळी, पेरू, डाळिंब, सफरचंद, पेर, पपनस अशा फळांनी भरलेले ताट नैवेद्य म्हणून समोर ठेवतो. दीड दिवसांपेक्षा, गौरी गणपतीच्या सात दिवसांत घरी फळांची रेलचेल जास्त असते. हल्ली माव्याच्या मिठायांपेक्षा प्रसादासाठी फळेच आणणे पसंत केले जाते आणि एका अर्थी ते चांगलेही आहे. पण मग या दिवसांमध्ये गणपतीला दिलेल्या या फळांचे करायचे काय, हा एक मोठा प्रश्न असतो. मोठय़ा कुटुंबात ठीक आहे, अन्यथा ही फळे खाऊन संपवायची म्हणजे बरेच दिवसांचे काम असते, त्यात ही फळे खराब होण्याचीही शक्यता असते. मग त्या सर्व फळांचे फ्रूट सॅलड बनवले जाते. त्यात दूध, कस्टर्ड, साखर, बेदाणे, काजू वगैरे घालून ते संपेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवले जाते. खूप छान लागते म्हणून काही वेळा थंडगार सॅलडवर जेली किंवा आइस्क्रीम घालून बरेच दिवस सकाळी, दुपारी, रात्री आणि विशेषत: जेवणानंतर खाल्ले जाते. नाहीतर त्या फळांपैकी काहींचे रस काढून प्यायले जातात आणि इथेच सगळी गडबड होते. ती गडबड आपण नंतर पाहू, तत्पूर्वी प्रसादासाठी आणल्या जाणाऱ्या काही मुख्य फळांचे गुणधर्म पाहू.

गणपती हे पावसाळ्यात येतात. या ऋतूत शरीरामध्ये वात व कफ दोष वाढलेले असतात. ऋतुमानामुळे पचन कमी झालेले असते. त्यामुळे हिरव्या सालीचे केळे, संत्र, पेरू, पेर, कलिंगड, पपनस, अननस ही फळे या ऋतूमध्ये टाळावीत. ज्या फळांमध्ये खूप रस असतो जशी संत्र, मोसंबी, कलिंगड अशी फळे जास्त प्रमाणात खाल्लय़ास सर्दी कफ यांचा त्रास होतो. मुलांची प्रकृती जात्याच कफाची असल्याने वेलची केळे, सफरचंद, डाळिंब या व्यतिरिक्तची सर्व फळे त्यांना यातूत देणे शक्यतो टाळावेच. फळांचे रस काढून तर मुलांना देऊच नयेत.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

सर्व फळे शक्यतो चावूनच खावीत. चावताना तोंडातील लाळ मिसळून ती पोटात गेल्यास त्यांचे जठरातील मुख्य पचन व्यवस्थित होते. सकाळचा काळ हा कफाचा असल्याने दमट हवामानात, सर्दी कफाच्या रुग्णांनी सकाळी उठल्यावर लगेच किंवा न्याहरीला फळे खाऊ  नयेत. दुपार, संध्याकाळी चालतील.

जेवणानंतर फळे खाऊ  नयेत. पोटभर जेवून नंतर फळे खाल्ली की ती पचत नाहीत. त्याने अपचन आणि अधोवायू होण्याची प्रवृत्ती वाढते. न्याहरी व दुपारचे जेवण याच्यामध्ये किंवा संध्याकाळी मधल्या वेळी फळे खावीत. चार घास कमी जेवून मगच जेवणानंतर फळे खावीत.

ऋतूनुसार वेगवेगळी फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकर आहे. पण प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे असल्यामुळे ती सर्व फळे एकाच वेळी खाऊ  नये. केळे, पपनस थंड आहेत. ती पपई, अननस यासारख्या उष्ण फळांसोबत खाऊ  नयेत. दूध व केळ्याचे शिकरण, सुरुवातीला सांगितलेले फ्रूट सॅलड किंवा मिल्कशेक यांना आयुर्वेदामध्ये ‘विरुद्धाहार’ असे म्हटले जाते. फळे उत्तम आहेत तसेच दूधसुद्धा गुणकारी आहे. पण ते एकत्र केल्याने होणारा नवीन पदार्थ हा रोगकारक आहे, असे मिश्रण पोटात पचत नाही. त्या मिश्रणाच्या पचनामध्ये निर्माण होणारा आहाररस- जो नंतर संपूर्ण शरीराचे पोषण करतो तोच मुळात विकृत बनल्याने या दूधफळांच्या एकत्रित व नियमित सेवनाने अनेक प्रकारचे विकार (खोकला, दमा, अनेक त्वचाविकार) निर्माण होतात. असे अनेक विरुद्धाहार शरीराला ‘आत्मसात’ होत नाहीत.

फळे खातानाही आपल्याला काय चालते ते पाहावे. इतर लोकांचे किंवा परदेशीयांचे अंधानुकरण नको.

केळे

सर्वाना आवडणारे फळ! हिरव्या सालीचे आणि वेलची केळे हे दोन्ही प्रकार सर्वानाच आवडतात. केळी गुणांनी थंड असतात म्हणूनच ती कफ करणारी असतात. केळे पचायला थोडे जड आहे. वेलची केळे हे त्या मानाने मुंबईसारख्या किंवा दमट हवामानाला पचायला हलके  किंवा हिरव्या सालीच्या केळ्यापेक्षा जास्त गुणकारी असल्याने आबालवृद्धांना खाण्यासारखे आहे. ज्याला केळे पचते, त्याच्यासाठी ते खूपच गुणकारी आहे. याने भूक भागते. पौष्टिक असल्याने तब्येत सुधारते, वजन वाढते. पावसात होणाऱ्या जुलाबांवर उपाय म्हणून पूर्ण पिकलेल्या केळ्यात साखर व जायफळ पावडर एकत्र करून खाल्ले जाते. जेवणात केळे खायचे असेल तर ते तुपासोबत खावे म्हणजे ते पचते.

पपनस

संत्र-मोसंबी यांसारखे हे एक रसदार फळ आहे. मुंबईपेक्षा कोकणात याचा उपयोग जास्त करतात. तापात जसे मोसंबी, डाळिंब ही फळे पथ्य किंवा पौष्टिक म्हणून देतात तसेच पपनसही देतात. सप्टेंबरमध्येच ही फळे पिकून तयार होत असल्याने ती गणपतीत दिसू लागतात. पपनस शक्तिवर्धक, तहान कमी करणारे, पाचक व पित्तशामक आहे. थंड असल्याने कफ करणारे आहे.

डाळिंब

डाळिंब हे उत्तम पित्तशामक आहे. डाळिंबाच्या रसात खडीसाखर घालून खाल्लय़ास पोटात आग होणे, अंगाची आग, मूत्रमार्गिका-शौचमार्गाची जळजळ, आम्लपित्त अशा अनेक आजारांवर उपयोगी पडते. तेलकट, मसालेदार जेवणानंतर पत्री खडीसाखर व डाळिंबाचे दाणे हे सुपारी किंवा बडिशेपऐवजी चावून खावे. (मोदकांच्या जेवणानंतरही हे उपयोगी आहे) अतितहान, घसा सुकणे, भूक व चव न लागणे, जुलाब होणे, पोटात मुरडून आव पडणे यात डाळिंबाचे दाणे उपयोगी आहेत. डाळिंब हे हृदयाला बल देणारे असल्याने हृदयविकार असलेल्यांनी रोज अर्धेतरी डाळिंब खावे. उलटी थांबवण्यासाठी, मधुमेही लोकांची साखर अचानक कमी होते त्यासाठी, छातीत धडधडणे, आवाज-प्रकाश सहन न होणे यासाठी डाळिंबाचे दाणे चघळून खाल्लय़ाने खूप फायदा होतो.

सफरचंद

जेवल्यावर अन्न घशाशी येणे, चुळा सुटणे, आंबटपाणी वर येणे अशा अपचन किंवा आम्लपित्ताच्या व्यक्तींना सफरचंदाचा उपयोग होतो. फक्त हल्लीची सफरचंदे पाहता त्या सर्वाची साले काढूनच खावीत, असे मला वाटते. भूक लागत नसेल किंवा ज्या आजारात अन्नच पोटात राहत नसेल, अशावेळी सफरचंद खायला द्यावे. वारंवार जुलाब होणाऱ्यांना किंवा पित्तविकारी, अंगात कडकी (उष्णता) असलेल्यांनी रोज अवश्य सफरचंद खावे. पावसाळ्यात आमवातासारखे विकार बळावतात. सर्दी, ताप, आमवात या विकारात इतर सर्व फळे अपथ्यकर असली तरी डाळिंब व सफरचंद खाल्लेली चालतात.

पेअर

पेअर किंवा नासपत हेही एक पौष्टिक फळ असून त्यात भरपूर तंतू असल्याने याचा पोट साफ होण्यासाठी चांगला उपयोग होतो. हे बलवर्धक आणि बुद्धिवर्धकही आहे. याच्या नियमित सेवनाने त्वचा तजेलदार होते. यात ‘क’ जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम भरपूर असल्याने आबालवृद्ध सर्वानाच उपयोगी आहे. सफरचंदाप्रमाणेच हेही पित्तशामक आहे.

पपई

अजीर्ण, भूक न लागणे, अपचन या विकारात जरी पपई उपयोगी असली तरी ती खूप उष्ण आहे. जेवणानंतर फळे खाणे आयुर्वेदाला संमत नाही. पण ज्यांची पचनशक्ती चांगली आहे किंवा ज्यांचे जेवण लवकर होते (अन्न  पचण्यास पुरेसा वेळ असतो) अशांना जेवणानंतर इतर फळांपेक्षा पपई खाणे चालू शकते. गजकर्ण, खरूज, नायटा यांसारख्या त्वचाविकारात पपई खाण्याचा उपयोग होतो. मासिक पाळी येत नसेल किंवा अंगावर कमी जात असेल तर पपईचा उपयोग स्त्रीवर्गाला माहीत आहेच!

वैद्य राजीव कानिटकर kanitkarrajeev@gmail.com