औरंगाबाद-नांदेड महामार्गावर १५० कि.मी. प्रवास झाल्यावर जिंतूर या तालुक्याच्या गावापूर्वी डोंगराच्या चढणावर डावीकडे चारठाणा थांबा लागतो. गाव नजरेत पण थोडेसे दूर. गाव तसे जुन्या वळणाचे, प्रथमदर्शनी चुकीच्या गावात तर शिरलो नाही ना अशी शंका येऊ शकते. दर्शनी कुठल्याच ऐतिहासिक खाणाखुणांचा मागमूस नसल्याने मुद्दाम शोध घ्यावा लागतो. कुणास विचारणा केली की तो दिशा दाखवून मोकळा. गावकुसाबाहेरचे जीर्णोद्धार झालेले गौरीशंकराचे मंदिर, सुरेख बांधणीची बारव. गावातून पलीकडच्या टोकाच्या चांभारवेशीकडे जाताना रस्त्यात माणसाचा राबता असलेल्या जुन्या वळणाच्या कोरीव नक्षीदार लाकडी सज्जाच्या दुमजली इमारती. वाटेत जीर्णोद्धार झालेल्या मंदिराशेजारचे संपूर्ण कळस पडलेल्या देवीच्या भग्न मंदिरात डोकावले तर अचंबित व्हाल. गाभाऱ्याच्या दगडी छतावर प्राण्यांच्या लहान-मोठय़ा खुरांच्या असंख्य कोरीव प्रतिकृती. हल्ली घरात छतास प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये विविध नक्षीकाम केले जाते तसेच हे. अलीकडे कोणीतरी त्यास राखाडी रंग फासला आहे.
पुढे थोडय़ा अंतरावर डावीकडे घराच्या ओळीत दडलेला दगडीस्तंभ तिथपर्यंत जाईतो दिसत नाही. अचानक दिसतो तेव्हा नजर स्तब्ध होते. ताशीव दगडी तीस फूट उंच, चौकोनी, दोन्ही हातांत न मावणारा घेर. विशाल चबुतऱ्यावर उभा.अप्रतिम कोरीव काम. वरच्या टोकावर पसरट दगडी चौकोनी प्लेटच्या शाबूत कोनावर छिद्रे. दीपमाळ म्हणून गावकरी संबोधित असलेला चालुक्यकालीन अंदाजे हजार-अकराशे वर्षांपूर्वीचा हा विजयस्तंभ. सभोवतालच्या गलिच्छ परिसरात चबुतऱ्यापर्यंत मातीत रुतलेला. वेरुळच्या सुप्रसिद्ध कैलास लेणीतील स्तंभासारखा.
गावाच्या विरुद्ध टोकाला असलेली मशीद ओलांडल्यावर ओढय़ाकाठी चिंचेचा अतीप्राचीन वृक्ष. त्यापासून थोडय़ा अंतरावर शिवाचे सुरेख मंदिर. त्यातील शिलालेख, परिसरात विखुरलेले असंख्य भग्नावशेष, त्यातच शेषशाई विष्णू, पट्टीवर सागरमंथन दृश्याचे छोटे कोरीव शिल्प. कधी काळी यादवाचे प्रधान हेमाडपंताची सासुरवाडी असलेल्या या गावी तीनशे साठ मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. मुद्दाम वाकडी वाट करून तेथे जावे. चारठाण्यातला हा वारसा तासाभरात पाहून होतो.
लक्ष्मण संगेवार laxman.sangewar@gmail.com

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा