‘मनाली ते लेह’ या जगातील खडतर रस्त्यांपैकी मानल्या जाणा-या मार्गावर सायकलिंग करणं हे आता प्रत्येक सायकलस्वाराचं स्वप्न झालं आहे. गेल्या दशकभरात या मार्गावरून सायकलिंग करणा-यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. येथील हवामान, रस्त्याची अवस्था, चढ-उतार, मुक्काम आणि खाण्यावर येणारी बंधनं आणि मुख्य म्हणजे उंची यामुळे प्रत्येकासाठी हा प्रवास एक आव्हान असतो. मुख्य म्हणजे भारतीयांसोबत परदेशातील सायकलस्वारांनाही या मार्गाने भुरळ घातली आहे. युथ हॉस्टेलसारख्या नामवंत संस्थेने आत्तापर्यंत तीनवेळा या सायकल मोहिमेचे आयोजन केले असून अनेक खासगी गटही या मोहिमेचे आयोजन करत असतात. एवढंच नव्हे तर अनेकजण एकट्याने किंवा साथीदाराच्या सोबतीने हा प्रवास करताना दिसतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन हा प्रवास केलेल्या जुन्या आणि नव्या सायकलस्वारांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न यावेळेच्या सायकल कट्ट्यावर होणार आहे. प्रवासाची छायाचित्रे आणि व्हिडिओची सायकलस्वारांच्या या अनुभवांना जोड असेल. त्यामुळे ज्यांना हा प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठीसुध्दा ही एक सुवर्णसंधी असेल. सायकल कट्टा सर्वांसाठी मोफत खुला असणार आहे.

कधी – रविवार, २५ सप्टेंबर २०१६
वेळ – सकाळी ९ ते दुपारी १२
स्थळ – महाराष्ट्र नेचर पार्क सोसायटी, वांद्रे-सायन लिंक रोड, धारावी बस डेपोजवळ,
धारावी – ४०००१७
संपर्क – ९८१९७४९०५० किंवा ९८९२९४२६२८