lp29‘‘श्रावण मासी हर्ष मानसि हिरवळ दाटे चोहिकडे’’ किती योग्य वर्णन केलंय बालकवींनी श्रावणाचं. एरव्ही रूक्ष वाटणाऱ्या डोंगरदऱ्या हिरव्या रंगांनी फुलून गेलेल्या असतात. रंग तरी किती? गर्द हिरवा, शेवाळी हिरवा, चटणी हिरवा, पोपटी हिरव्या रंगाच्या कितीतरी छटा पाहायला मिळतात. त्यावर येणारी फुले पिवळी, निळी, जांभळी, गुलाबी, लाल, पांढरी, अबोली. मन अगदी प्रसन्न होते. हे झाले फुलांचे रंग, पण पानेसुद्धा किती वेगवेगळ्या आकाराची. काही लहान बाळाच्या जावळासारखी मऊमुलायम, हळुवार हात फिरवावा असे वाटणारी, तर काही हात लावल्यावर मिटणारी, तर काही खराटय़ासारखी.
श्रावणातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. त्याचं काही महत्त्व असतं म्हणून साजरा केला जातो. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असतं.
श्रावणातला सोमवार शिवाचा. त्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुली शंकराला शिवामूठ वाहतात. त्या धान्याचेसुद्धा महत्त्व असते. दिवसभर सर्व जण उपास करतात व संध्याकाळी सोडतात. शाळा अर्धा दिवस असतात. जेवायला केळीच्या पानावर वाढतात. मजा वाटते. नेहमीपेक्षा वेगळं.
मंगळवारी मंगळागौर. नटून थटून बायका-मुली खेळतात. खूप गंमत येते.
गुरुवार बृहस्पतीचा म्हणजे विद्येचा. त्यादिवशी देवाला गूळ-तुपाचा नैवेद्य दाखवतात व मुलांना वाण देतात. चांगली बुद्धी देवानं द्यावी म्हणून प्रार्थना करतात.
शुक्रवारी जिवतीची पूजा. हा वार खास आई व मुलांचा. मुलांना आमच्याकडे वाण दिले जायचे. आई चांदीच्या ताटात देवाला नैवेद्य दाखवून तेच ताट आम्हा मुलांच्या हाती लावत असे. आम्हा मुलांना नमस्कार करी. फारच मजा वाटायची. आम्ही मुलंही मग तिला आशीर्वाद वगैरे देत असू. त्या दिवशी मुलांना देवीचं रूप मानलं जाई.
शनिवार शनीचा. अंगाला तेल लावून अंघोळ. जेवायला माठाची भाजी व भाकरी. हे सर्व शनीदेव प्रसन्न व्हावा, मुलांना धन, संपत्ती, मिळावी म्हणून. आमच्याकडे त्याकाळी (५०-६० वर्षांपूर्वी) सुद्धा मुलींना ही सर्व वाण देत असत. मुलींना पण पैसे, बुद्धी, विद्या, आरोग्य मिळणं अत्यंत महत्त्वाचं अहे असं आजीचं मत होतं. म्हणून आई आम्हाला म्हणजे मला व बहिणीला वाण देत असे.
याव्यतिरिक्त नागपंचमी, शीतलासप्तमी, नारळी पौर्णिमा, कृष्णजन्म असे अनेक महत्त्वाचे सण या महिन्यात साजरे केले जातात. त्यामुळे या महिन्यात एक प्रकारचे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. खाण्यापिण्याची चंगळ असते. एकंदरच सर्व वातावरण जरा हटके असते.
माझ्या लहानपणीचा हा काळ फार रम्य होता. प्रत्येक गोष्टीत देव बघण्याचे, चांगुलपणाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे संस्कार आपोआपच मिळत गेले.
दररोज आई आम्हाला प्रत्येक दिवसाचं महत्त्व समजावून देणारी कहाणी देवाजवळ बसून सांगत असे. ‘आटपाट नगर होतं’ इथपासून सुरू झालेली कहाणी! उतू नकोस मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस.. सुफळ संपूर्ण प्रत्येक कहाणीत एखादं जीवनाचं रहस्य असे. कसे वागावे, पैशाची किंमत, दुसऱ्या माणसाचे मन जपावे, शक्य ती मदत करावी व जीवन सुफळ संपूर्ण करावे.
या कहाण्यांत मला आवडणाऱ्या दोन कहाण्या- एक सोमवारची खुलभर दुधाची व दुसरी शुक्रवारची.
देवाला प्रसन्न करायला हंडाभर दूध नाही, तर सगळ्यांची नड-गरज पूर्ण करून खुलभर (चमचाभर) दूध परत पैशाचं महत्त्व विषद करून सांगणारी शुक्रवारची कहाणी. ‘जग में सबसे बडा रुपय्या’ हे सहज मनावर ठसविणारी.
मी हे सर्व माझी मुले व नातवंडे साधारण ९-१० वर्षांची होईपर्यंत केलं, नंतर त्यांना शिंगं फुटल्यावर सोडून दिलं. पण तेवढय़ा काळात ते संस्कार नकळत झाले.
श्रावण महिना म्हणजे रोजच्या जीवनाचा कलह अर्थशून्य वाटण्यापासून वाचवणारा, त्याचा सोहळा करणारा.
उषा परांजपे