01tejaliजसा माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्याप्रमाणेच त्याने निर्माण केलेल्या कलादेखील एकमेकांशी संलग्न असतात. कुठलीच कला इतर कलांपासून पूर्णपणे स्वतंत्र नसते, तर ह्य कला एकमेकांना पूरक असतात तेव्हाच अप्रतिम कलाकृती साकार होते!! पूर्वीच्या काळी ‘नाटय़’ ह्य नावामध्येच गायन, वादन, नर्तन यांचा समावेश केला जात असे. ‘नाटय़ शब्दे रसोमुख्ये रसाभिव्यक्तीकारणम्!’ असा उल्लेख ‘नाटय़शास्त्र’ या ग्रंथामध्ये आढळतो. म्हणजेच ‘नाटय़ामध्ये’ रसांची अभिव्यक्ती, रसनिर्मिती, अभिनय, भावभावनांचे प्रस्तुतीकरण याला विशेष महत्त्व दिले आहे. आणि ह्य सर्वच गोष्टी नर्तन, गायन अशा कलाप्रकारांचा प्रमुख भाग आहेत. नंतर नर्तन, वादन, गायन इत्यादी कलांना स्वतंत्र स्थान मिळाले, पण तरीही त्याचा मूळ गाभा मात्र तसाच आहे. आणि म्हणूनच मूलतत्त्व समान ठेवून आधुनिक काळात विविध कलांच्या मिलापाने केलेले विविध प्रयोग प्रेक्षकांना आणि कलाकारांना विशेष भावले, असं पाहायला मिळतं. ‘नृत्यनाटिका’ हादेखील ह्यच विविध सृजनशील कलाप्रकारांमधील एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे!! नृत्य आणि नाटक ह्य दोन्ही प्रकारांत विषय, कथा, भावनांची मांडणी, अभिनय अशा बऱ्याच गोष्टी समान असतात; परंतु सादर करण्याचे माध्यम वेगळे असते. नर्तनात मोहक शारीरिक हालचाली, केवळ शरीर व चेहऱ्याच्या हावभावातून लोकांपर्यंत भावना, कथा पोहोचवली जाते; तर नाटकात संवादातून, हालचालीतून कथा रंगमंचावर जिवंत उभी केली जाते. दोन्ही कलांच्या सक्षम बाजूंचा संगम घडवून तयार केलेला ‘नृत्यनाटिका’ हा प्रकार मात्र एकाच वेळेला नर्तन आणि नाटक ह्य दोन्ही कलाप्रकारांतून घडणाऱ्या अनोख्या कलाविष्काराचा प्रत्यय देतो.
खरेतर जुन्या काळात कथकली, मणिपुरी, रास, कुचीपुडी, यक्षगान अशा सर्वच नृत्यशैली नृत्यनाटिकांनी युक्त असत. कथक हा शब्ददेखील ‘कथा कहे सो कथक’ ह्य वाक्यावरूनच जन्माला आला आहे. म्हणजेच सर्वच ह्य सर्वच नृत्यप्रकारांचा उगम नृत्यनाटय़ाच्या परंपरेतून झाला आहे असे दिसते. परंतु विसाव्या शतकापासून ज्या प्रकारच्या नृत्यनाटिका सादर करण्यास सुरुवात झाली, त्यावर पाश्चिमात्य देशांतील ‘डान्स बॅले’चा प्रभाव दिसून येतो. बरेच लोक नृत्यनाटिका आणि ‘डान्स बॅले’ हे समानार्थी म्हणून वापरतात, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मांडणीत फरक दिसून येतो. बहुतेक करून डान्स बॅलेमध्ये वाद्यवृंदाचा वापर केला जातो तर विशेषत: भारतीय नृत्यनाटिकांमध्ये काव्य, चालबद्ध केलेले गद्य किंवा पद्य, आणि पाश्र्वसंवाद यांचा नर्तनाबरोबर वापर केला जातो. भारतात ‘डान्स बॅले’चे जनक म्हणून उदय शंकर यांचे नाव आणि काम निश्चितच मोठे आहे, त्यावरूनच प्रेरणा घेऊन अनेक युवा कलाकारांनी डान्स बॅले व नृत्यनाटिका निर्माण करण्यास सुरुवात केली. ‘उदय शंकर’ ही जणू भारतात आधुनिक नृत्यशैलींमधील एक शैली म्हणून गणली जाऊ लागली. बदलत्या काळाप्रमाणे मात्र नृत्यनाटिकांमध्ये अनेकविध प्रयोग होऊ लागले. आध्यात्मिक, पौराणिक कथांप्रमाणेच आधुनिक, सामाजिक विषयांवरसुद्धा नृत्यनाटिकांद्वारे भाष्य होऊ लागले. आणि प्रेक्षकांमध्ये हा प्रकार लोकप्रिय ठरू लागला.
भारतात दिल्ली येथील ‘श्रीराम भारतीय कला केंद्र’ या संस्थेचे नाव ‘नृत्यनाटिकांसाठी’ खूप प्रसिद्ध आहे. केवळ पौराणिक कथांवर नृत्यनाटिका ही संस्था करते, व १९५२ पासून अनेक चांगल्या दर्जाच्या नृत्यनाटिकांची निर्मिती त्यांनी केली आहे. ‘रामलीला’, ‘मीरा बाई’, ‘मेघदूत’, ‘कृष्णावतार’, ‘गीतगोविंद’ अशा कित्येक नृत्यनाटिका त्यांनी प्रस्तुत केल्या आहेत आणि ‘पं. बिरजू महाराज, सुंदर प्रसाद, शंभू महाराज’ अशा अनेक दिग्गजांनी या संस्थेबरोबर काम केले आहे. तसेच ‘नृत्यनाटिका’ शिकवणाऱ्या भारतातील काही निवडक संस्थांमध्ये ह्यचा उल्लेख आवर्जून केला जातो. मराठीमध्ये ‘आविष्कार’ने केलेली, कै. गुरुवर्य आचार्य पार्वतीकुमार, पुरव सर यांनी नृत्यदिग्दर्शन केलेली ‘दुर्गा झाली गौरी’देखील प्रेक्षक पसंतीस उतरली होती. चेन्नई येथील भरतनाटय़मचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कलाक्षेत्र’च्या नृत्यनाटिकादेखील खूप लोकप्रिय आहेत, रवींद्रनाथ टागोरांच्या ‘चित्रांगधा’, ‘श्याम’, ‘शापमोचन’ ह्य नाटिकादेखील उल्लेखनीय आहेत. नृत्यनाटिकांमध्ये नर्तन, नाटय़ यांबरोबरच वेशभूषा, रंगभूषा, नृत्यसाहित्य या सर्व गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. नाटिकेमधील पात्राला अनुसरून ह्य गोष्टी ठरवल्या जातात, जेणेकरून पात्र, कथा आणि आशय लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकेल. काही नृत्यनाटिकांमध्ये कलाकार नर्तनाबरोबर स्वत:च संवाद, कथानक, मोठय़ाने बोलतात; त्यामुळे नृत्यनाटिका करताना नर्तकाला अभिनय आणि नाटकाचीदेखील जाण असणं आवश्यक ठरतं.
नृत्यनाटिका या प्रकाराकडे कलाकार पुन्हा वळू लागले आहेत, आणि विविध प्रयोगांतून ह्य प्रकाराला अधिक खुलवत आहेत, ह्यत काही शंका नाही. नृत्य आणि नाटक यांचा अनोखा कलासंगमही प्रेक्षकांमध्ये ह्य प्रकाराबद्दल रुची निर्माण करत आहे. जुन्या गोष्टींकडे परत जाताना त्यातील मूळ सत्त्व टिकवून त्यात नावीन्य आणि विविधता आणण्याचा नृत्यनाटिकाकरांचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे!! अशाच अनेक नृत्यनाटिकांची निर्मिती होऊन हा प्रकार अधिक लोकांपर्यंत पोहोचावा अशी आशा आहे.
तेजाली कुंटे response.lokprabha@expressindia.com